Friday, March 21, 2014

लोकशाहीला राष्ट्रउभारणीचे स्वप्न हवे!

                          आपला भारत हा जर एक स्वतंत्र देश आहे तर तो एक राष्ट्र आहे की  नाही?देश म्हणजे फक्त भूगोल असतो का?ते सर्वांचे एकत्र  जगणे नसते का?इथे जनगणमन हाच भारत भाग्य विधाता आहे ना?हे जनगणमन फक्त निवडणुकीपुरतेच बघायचे का?की नित्याच्या जगण्यातही अनुभवायचे ?India is not a Nation ,She is only a Population--भारत हे राष्ट्र नाही .फ़क्त लोकसंख्या आहे ,असे विषादाने का  म्हणावे लागते बरे ?परिवर्तनवादी चळवळीला सुद्धा असा प्रश्न विचारायला हवा की  जर तुम्ही सतत "आम्ही कधी एक समाज ,एक लोक नव्हतोच. हे राष्ट्र आमचे नाही " असे म्हणत राहणार असाल ,तर या देशाच्या उभारणीचा पाया तुम्हाला कुठे आणि कसा सापडणार?
                               राष्ट्र हे नवनिर्मितीचे, सर्व भारतीयाना  जोडणारे एक विशाल स्वप्न असते. ते शून्यामधून राष्ट्र  उभे करते . शिवरायांनी आपल्या गडांना दिल्लीदरवाजे दिले . हे दिल्ली दरवाजे दिल्लीकडे बघत असतात . महान हिंदवी साम्राज्याचे स्वप्न आपल्या डोळ्याना दाखवत राहतात . मलेशियाच्या पायथ्याशी असलेला भूप्रदेशाचा एक इवलासा ठिपका म्हणजे सिंगापूर !सिगापूर म्हणजे सिंहपूर!भव्य काळ्या आयाळीच्या पराक्रमी सिंहाची नजर उसळत्या समुद्र लाटांकडे आणि समुद्र गर्जनेकडे असायची . तोही गर्जना करायचा . समुद्रातली सुंदर जलपरी सिंहाच्या प्रेमात पडली आणि  त्यांच्या पोटी एक मत्स्यसिंह -Merlion जन्माला आला . सिंहाचे मुख आणि माशाचा देह !हा मत्स्य सिंह सिंगापुराचे  जागते दैवत आहे . या मर्लिऑनने ली क्वान यू (Lee Kuan Yew)नावाचा  आकाश झेलून धरणारा राष्ट्रप्रमुख सिंगापूरला दिला . ली क्वान यू ने सिंगापूर या चिमुट भर  बेटाला  ३६००हून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गजबजलेले जागतिक दर्जाचे शहर बनविले आहे . मलेशियाने सिंगापुरावर स्वातंत्र्य लादले . शेती नाही . फलोद्याने नाहीत . दूध दुभते ,पाणीही नाही . ते मलेशियाच्या जोहोरमार्गे नळ टाकून आणलेले. पण आज ऐंशी टक्के नागरिक स्वतःच्या मालकीच्या घरात राहतात . स्वीडनच्या बरोबरीने वार्षिक उत्पन्न मिळवतात . आवाजात सिंहाची गर्जना आहे . ली क्वान यू म्हणाले "आमचे नेते कधीही स्वार्थी व आत्मकेंद्री बनूच शकत नाहीत . हा आमच्या राजकीय संस्कृतीचा विशेष आहे . राज रत्नम हे पूर्वीचे तमिळ भाषी उपपंतप्रधान म्हणाले "सिंगापूर हे सशाचे नेतृत्व लाभलेले सिंह प्रजेचे राष्ट्र नाही .कि सशाचे नेतृत्व मिळालेल्या सशांचा देश नाही . या सिंहपुरात सिंह नेतृत्व करील आणि तो सिंह प्रजेचे नेतृत्व करील "सिंगापुरात विविध देशांचे प्रतिनिधी आलेले . तेथे भारत विरोधी वक्तव्य  पाकिस्तानी प्रतिनिधीने सुरु केले मात्र . ली क्वान यू  ताडदिशी उठले आणि पाकिस्तानी प्रतिनिधीच्या बकोटीला  धरून खाली बसविले !
                                        विधायक नवनिर्मितीचे कार्यक्रम नसतील तर केवळ आंदोलने करणे हिंसा पेरणारेच  ठरते . केवळ भ्रष्टाचाराविरुद्ध दांडे किंवा झाडू घेऊन उभे राहिले तर हताश, पीडित नागरिकांच्या झुंडी कदाचित तुमच्या मागे आवेगाने धावत राहतील . सतत घोषणा देत राहतील . निवडणुकीने हाती सत्ताही देतील . पण "मी आता पुढे काय करू ? "या प्रश्नाला जमावाकडे उत्तरे नसतात . मग पक्षाला जाहीरनामा उरत नाही . फक्त राजिनामा राहतो . अरविंद केजरीवाल यांनी ग्रीस देशाच्या अथेन्स नगरीतील 'थेट लोकशाही -Direct Democracy प्रकाराचा एक प्रयोग दिल्ली या नगर राज्यात केला . अथेन्स च्या भर चौकात हजारो नागरिक जमा होत . निर्णय घेत . तथापि हे हजारो लोकही काही प्रमाणात लोकप्रतिनिधी होतेच. व्यक्ती आणि जमाव किंवा  झुंड यातील फरक शासनाने दुर्लक्षून चालत नाही . Aristotle या ग्रीक तत्त्वचिन्तकाने लोकशाहीला  झुंड शाही -Mobcracy असे म्हटले आहे . येथे डोकी फक्त मोजली जातात . डोक्यांच्या आत काय आहे हे  पाहिले  जात नाही . लोकशाहीला गुणशाही - Meritocracy भेटायला हवी . रवींद्रनाथ म्हणाले होते की - "माणूस दयाळू   आहे पण माणसे क्रूर असतात "झुंडीला  संयम ,विवेक नसतो .ज्युलिअस सीझरला ठार करणारा  असतो ब्रुटस ! त्याच्या विजयाच्या घोषणा देणारा जमावच Antony या सीझर मित्राच्या भाषणा नंतर  ब्रुटस ला ठार मारायला धावू लागला . उद्या केजरीवाल यांचा पण ब्रुटस होईल काय ?केवळ अरविंद केजरीवाल यांच्याच मागे  नाही तर पश्चिम  महाराष्ट्रातील  आबा  ,राज ,राजू , तात्या ,दादा यांच्या मागे टोल पेटवू ,उस जाळू  झुंडी कशा धावत आहेत ,त्यांच्या धावण्यामागे कोणते हिशेब आहेत हे पाहा! खरेच ,आपण लोकशाही म्हणून  जी जोखीम पत्करली आहे ,तिचा आता शांतपणे विचार करायला हवा !"चला निघूया सरसावोनी ,देशाच्या  उद्धरणी" असा वसा नसेल ,"बलसागर भारत होवो " ही  साने गुरुजींची अंतरी तळमळ नसेल तर आपली  लोकशाही एक वग  ठरेल . महाराज दरबारात येऊ लागले आणि सेवक वराडला "हिप हायणेस ! फलाणे फलाणे  म्हाराज  आ राहे हय !अपना अपना खिसा पाकीट संभालो !!  
 
       पानवाला !

Sunday, February 17, 2013

स्त्रीची गुलामगिरी !

स्त्रियांना वाली उरला आहे का? श्री.म.माटे यांनी कळवळून लिहिलेल्या एका लेखाचे हे शीर्षक आहे.१९५०च्या मानाने लिहिलेल्या निबंधाची शाई आज पुरती  वाळून गेली असली तरी अक्षरातील आग अजून धगधगत आहे.'हाय ए नारी! अजब तेरी कहानी --आंचलमे है दूध और आंखमे है पानी 'ही  व्यथा मांडणारे मैथिलीशरण जाऊनही दशके उलटलीत.पण नारीचे भय इथले संपत नाही.वीरभोग्या वसुंधरा तशा बलात्कारभोग्या नारीच्या डोळ्यातील जलधारा !
                                             ज्या क्षणी निसर्गाने स्त्रीच्या पोटात गर्भ ठेवला ,त्या क्षणी स्त्रीची गुलामगिरी सुरू  झाली .तिची देहरचना भुरळ घालणारी ठेवली.पण,शरीर हतबल राखले.बाईवर पुरुष बलात्कार करू शकतो.पण,सूड म्हणून बाई पुरुषावर बलात्कार करू शकत नाही.निसर्गाने स्त्रीवर क्रूर अन्याय करून ठेवलाय.तिला भोगदासी बनवली.कोणत्याही अर्थाने ती कामवालीच!सभ्य ,सुसंस्कृत पुरुषमन स्त्रीच्या मनाचा  विचार करू शकते.पण अस्मिता,अभिमान,चैतन्य यांनी बहरून ,फुलून येणारे स्त्रीमन कामांध बैलाना का म्हणून उलगडावे?
                                            स्त्री आणि पुरुष यांचे परस्पराबद्दलचे अनिवार आकर्षण ही  वस्तुस्थिती आहे.जगातल्या सर्व स्त्रिया नाहीशा झाल्या तर पुरुषांनी जगायचे तरी कशासाठी? असा प्रश्न पु.भा.भावे यांनी विचारला .तो विचारताना त्यांच्या डोळ्यासमोर प्रभावतीबाई होत्या.ग्रीक पुराणकथेनुसार प्रथम स्त्री आणि पुरुष अशी दोन भिन्न शरीरे नव्हती.एकच मोठया चेंडूच्या आकाराचा माणूस होता.चार हातांचा आणि चार पायांचा!प्रचंड ताकद होती त्याला.देवाने माणसाला मधोमध कापले ते भीतीपोटी!तेव्हापासून स्त्री आणि पुरुष हे मानवी शरीराचे दोन्ही भाग अनिवार ओढीने एक होऊ पहातात.पण,आज प्रश्न स्त्री-पुरुष आकर्षण हा नाही.पुरुषाने स्त्रीच्या जगण्याचा चोळामोळा ,चिखलगोळा करून आपल्याच माणूसपणाचा नरक बनवला आहे.नरेचि केला हीन किती नर!हा प्रश्न प्राचीन काळापासून समाजातील विचारवंताना पडलेला आहे.
                                            स्त्री-पुरुष देहरचना ,अनिवार कामप्रेरणा ,बाराही महिन्यांचा हैदोस या सर्व वास्तवामधूनच मला वाटते ,'मानवी मूल्य 'नावाची औषधी माणसाला सापडली असावी.पशू  कधीही बलात्कार करीत नाहीत.त्याना प्रणयाराधनाने संमती मिळवावीच लागते.शिवाय त्यांचे ठराविक हंगाम असतात.माणसाला मग आपल्या जगण्यावर आपणहून निर्बंध आणावेच लागतात.फाशी किंवा लिंगविच्छेदन  ही भीती तकलादू असते. जयवंत दळवी यांच्या 'पुरुष' नाटकातील अंबिका आपटे हि तडफदार बंडखोर स्त्री मात्र   आपल्यावरील बलात्काराचा सूड म्हणून गुलाबराव जाधवाचे लिंगविच्छेदन घडवून आणते.बंडा नावाच्या जहाल तरुणाची तिला साथ मिळते.तरीपण विदारक इतिहास असा आहे की माणसे सातत्याने सर्वसंहारक युद्धावर जात राहिली.युद्धकाळातच जेत्याचे सैन्य जित  राष्ट्रात घुसते तेव्हा सैनिक कुठल्याही देशाचे असोत,ते बंदुका बाजूला ठेवून विजारीची बटणे सोडू लागतात.दुसरे महायुद्ध घ्या!पराभूत झालेल्या जर्मनीतील स्त्रिया असोत,व्हिएतनाममधील अमेरिकेचे भक्ष्य ठरलेल्या स्त्रिया असोत,जपानी सैनिकांचे भीषण बलात्कार असोत सर्वत्र स्त्रिया कामवासनेच्या भयानक बळी ठरल्या आहेत.भारताच्या फाळणीवेळच्या कथा तर आजही 'जळो जळो जिणे,  लाजिरवाणे' करून  सोडतात.
                                                 जे मानवी आहे ते सारे मानीव आहे.नर आणि मादी ही   दोनच नाती निसर्ग जाणतो. आई,बाबा,भाऊ,ताई ही नाती माणसाने निर्माण केली आहेत.जगण्याला सुगंध आणला आहे.वासनांचा दर्प घालवला. देहभाव ही  प्रकृती.देहाची दादागिरी रोखण्यासाठी येतो तो देवभाव.त्याला संस्कृती म्हणायचे.संस्कृती  म्हणजे माणसानेच आपल्या जगण्याला दिलेला आकार.ज्याला कुठे आणि कसे थांबावे हे कळते  त्यालाच चालण्याचा आणि धावण्याचा अधिकार असतो.गाडी चालवायला शिकणारा जो त्याला भरधाव गाडी कोठे  कशी कचकन थांबवायची हे शिकावे लागते.हे थांबणे आपल्या आणि  इतरांच्या हिताचे असते.मनाला ब्रेक नाही ही  आजची शोकांतिका आहे. माझे 'अस्तित्व 'ही एकच  गोष्ट मला पक्की ठाऊक आहे.त्या  अस्तित्वाला कुठे न्यायचे ,कसे बदलायचे,सजवायचे हे सारे माझे मी ठरवीन.तुम्ही कोण सांगणार?नाहीतरी  सामान्य माणसाचे जगणे म्हणजे श्री.ना. पेंडसे यांच्या 'गारंबीच्या बापू' मधले व्याघ्रेश्वराचे देऊळच !आण्णा खोतांच्या प्रणयलीला व्याघ्रेश्वराला साक्ष ठेवूनच होणार.असा एक हताशपणा साहित्यामधून रोजच्या जगण्यात  उतरतो आहे.पण,माझे 'अस्तित्व'निश्चित झाल्यावर त्या अस्तित्वाच्या अर्थपूर्णतेचा विचार नको का? ही  मानवी मूल्ये सांगणारी कथा महाभारतात आहे.रामायणात आहे.श्री.म.माटे सांगतात 'स्त्रीचे अपहरण करणारा  जो त्याला देहांताचे शासन करणे हे रामायणाचे सारसर्वस्व आहे.द्रौपदीचा अवमान आणि आणि त्यासाठी  श्रीकृष्ण भगवानांनी घडवून आणलेले भारतीय युद्ध हीच महाभारताची मध्यवर्ती कल्पना आहे. महाभारताची मुख्य निशाणी  द्रौपदीच्या मानभंगाचा सूड ही आहे'.माणूस हे नुसते जगत राहणे नाही.ते सतत घडत  राहणे असते.माणूस बनण्यासाठी ती उमेदवारी असते.
                                                     आज तरुणाई भरकटत आहे.तरुणांच्या जगण्यापुढे सुंदर सुंदर स्वप्नेच नाहीत."जीवनदीप जले ऐसा --सब जगको ज्योति  मिले'हे गीत त्यांच्या कानावर पडत नाही.मोठी माणसे माती पिकवत नाही. फक्त खात राहतात.आणि रानटी कुत्री शिकार शोधण्यासाठी रानभर झुंडीने धावत राहतात.शिकार खाली पडायच्या  आधीच निम्मी खाऊन टाकतात.असेच सावज परवा दिल्लीत खाल्ले गेले.गल्लीतही वेगळे  घडणार नाही.
                                                एक अस्वस्थ करणारी बाब म्हणजे शाळा, महाविद्यालये यामधील पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांसाठी जी मराठी, इंग्रजी पाठ्यपुस्तके तयार होताहेत त्यातील मजकूर.त्याचे कठोरपणे  परीक्षण करायला हवे. धड्यांचे गाभे न्याहाळले पाहिजेत.परिवर्तनवाद, दलितवाद यांच्या नावाखाली  नको ते साहित्य मुला-मुलीपुढे येते  आहे का ते पाहणे गरजेचे आहे.मुलाच्या ठायी आईबद्दलचे सुप्त लैंगिक  आकर्षण म्हणजे इडीपस कॉम्प्लेक्स .इडीपस हा राजा होता.दलित जीवनाची या देशांतील उपेक्षा असह्य  आहे.पण एक दलित कवी लिहितो "हे भारतमाते !मी इडीपस बनून तुझ्या कुशीत शिरलो तर काय करू?"ही  कविता पाठ्यपुस्तकात आली तर कळण्याचे तारतम्य मुलाना आणि शिकवण्याची पुरती पक्वता शिक्षकांना  असेलच का? कुसुमाग्रजांनी एक कथा सांगितली .बकाल चाळीतल्या बेकार मवाल्यांनी आवारातली  एक कोंबडी चोरून कापली.शिजवली.ताटे मांडून सारे खायला बसले.तेवढ्यात उघड्या दरवाज्यातून  कोंबडीची सात पिले आत आली.चिव चिव करीत पातेल्याभोवती फिरू लागली.मवाल्यांच्या डोळ्यातही पाणी आले.ते ताटे टाकून  निघून गेले.हा साहित्यातला परतत्त्वस्पर्श  पाठ्यपुस्तकामधून घडवायला  हवा की  नको? स्वातंत्र्यदेवीची हीच विनवणी आहे --
                                  "'तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी
                                                   करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळू नका!"
 पानवाला.   

Monday, December 17, 2012

गुलामांची मुक्ताई हेरिएट टबमन !

रेड इंडियन माणसांची भूमी आणि त्यावर नीग्रो गुलामानी  फटके खात गाळलेला घाम ,सांडलेले रक्त यामधूनच आजची अमेरिकन श्रीमंती उभी राहिली आहे।श्वेत माणसांचा हा अश्वेत इतिहास आहे.इ.स.१४०० ते १८०० या कालखंडात पश्चिम आफ्रिकेच्या किनारा पट्ट्यातून नीग्रो मानवमेंढरे-स्त्री -पुरुष ,कच्ची बच्ची लेकरेसुद्धा फटके खात ,उपाशी पोटी,ओंडक्याप्रमाणे जहाजात आडवी रचून अमेरिकेत ओतली जाऊ लागली."अनंत अमुची ध्येयासक्ती -अनंत अन आशा "गाणारे कोलंबसाचे गर्वगीत असंख्य निरपराध ,लाचार माणसांच्या थडग्यावर नाचत राहिले .
                                               पण छळाला बळ येतेच.दुःखाला वाचा फुटतेच.अमेरिकेत "Uncle Tom's Cabin"ही अक्षरदाह घेऊन कादंबरी आली.Harriet Stoveच्या घळघळत्या लेखणीमधून.या कादंबरीने गुलामगिरी प्रश्नावर अमेरिकेत 'नागरी युद्ध '-Civil War पेटवले.आजही 'रूट्स 'ही नीग्रो कुटुंबाची मरणगाथा वाचा.Alex या कृष्णवर्णीय लेखकाने लिहिलेली ही ' पापाची मुळे 'वाचलीत तर "जळो जळो जिणे लाजिरवाणे "असे होऊन जाईल .अमृतातेही पैजा जिंकणारी अक्षरे ज्ञानोबानी आणली.मरणातेही खाली मान घालायला लावणारी अक्षरे Alex यांनी जगभरच्या मनाना दाखवली.नीग्रो मनात खदखदणारा  लाव्हा रस जोरदार फवारा टबमन या कृष्णवर्णीय गुलाम स्त्रीच्या रूपाने जमिनीतून वर आला.पण हा लाव्हा जमिन जाळणारा नव्हता.टबमनला "मोझेस 'हा किताब माणसांनी दिलेला.टबमन येशूच्या हाकेने भारावलेली होती.येशूने हिब्रू लोकाना स्वतः  स्वातंत्र्याच्या मुलखात आणले होते. म्हणून येशु होता 'मोझेस'.टबमननेही नीग्रो लोकांच्या असह्य वेदनांना मुक्तीच्या वाटा उघडून दिल्या.म्हणून ती 'मोझेस'.
                                                   टबमन अमेरिकेच्या डॉरचेस्टर परगण्यातील Mary Land मध्ये १८२०या वर्षी जन्माला आली .बाप रिट ग्रीन आणि आई बेन रॉस .दोघेही घनघोर गुलामगिरीत रुतलेले.मालकीण होती मेरी ब्रोडेस .गोरी वतनदारीण ,जमीनदारीण ,लागवडदारीण ,आणि गुलामांची हाडवैरीण!Madison आणि Maryland जवळून वाहते त्या नदीचे नावच पडले 'Black Water' या नदीचा काठ गुलामांच्या रक्त आणि घामात भिजायचा. पाच वर्षांची टबमन एका नर्सच्या हाताखाली तान्ह्या मुलाना सांभाळण्यासाठी नेमलेली.मुले रडू लागली की टबमनच्या पाठीची कातडी काढली जायची.कुठून कुठून चिंध्याचिरगुटे गोळा करून अंगाला लपेटून घ्यायची. एकदा गुदामाजवळून मालकाचे न ऐकता निघून जात होता एक गुलाम.त्याच्या डोक्याचा नेम धरून  मालकाने जड गोळा फेकला.तो लागला टबमनला .डोक्याची कवटी फुटली.मेंदू कायमचा आजारी बनला.फिट्स  यायच्या.बेशुद्ध अवस्थेत छोटी टबमन पडून राहायची.नाही अन्न,नाही दवापाणी !मेंदूच्या दुखण्यातून  टबमनला आकाशातला बाप भेटला.तिला दृष्टांत होऊ लागले.अंधारातून रस्ता दाखवणारा,मानवमुक्तीचे  स्वप्न पेरणारा 'प्रभूचा आवाज'टबमनला जन्माची साथ करीत राहिला.टबमन हाच एक चमत्कार आहे.
                                             अशक्त ,आजारी टबमन काय कामाची ?तिची विक्री करण्याची धडपड सुरू झाली.१८४९ मधील गोष्ट.टबमनने  ठरवले की आपण पळून जायचे.स्वातंत्र्याच्या मुलखात पोचायचे.दोन भावाना घेऊन रात्रीचे  तिने केलेले पलायन फसले .भाऊ कच खाऊन गुलामगिरीत परतले.पळून गेलेल्या गुलामाना  पकडून आणण्यासाठी गुंडांच्या टोळ्या मागे लागत आणि बक्षिसे कमावत.भयंकर शिकारी कुत्री हुंगत हुंगत  झाडाझुडपातून त्तपास करायची. टबमनच्या स्वातंत्र्याच्या ध्यासाने अमेरिकेत एक विलक्षण मुक्तिमार्ग  तयार केला होता.
                                        भूमिगत  रेल्वेचे अचाट जाळे (Underground Railroad). देवकीनंदन कंसाच्या तावडीतून  सोडवण्यासाठी यमुनेने रस्ता खुला केला.यशोदेच्या कुशीत गोपाळाला पोचवले.तसेच गुलामीच्या नरकयातना  भोगणारे गुलाम अभागी जीव याना विशेषतः दक्षिण अमेरिकेतील टेनेसी वगैरे कर्दनकाळ मुलखामधून  लपतछपत ,ओसाड पडक्या घरातून ,गोठ्यातून एका रात्रीचा मुक्काम करत ,अर्धपोटी ,पायाच्या  चिंध्या करीत  कॅनडा देशाच्या मुक्त प्रदेशात पोचवणारी एक अनौपचारिक संघटना होती.तिलाच म्हणायचे 'भूमिगत रेल्वेमार्ग'  काही धनिक,उदारमतवादी गोरे धाडसी नागरिक आपला भक्कम आधारही उभा करायचे.त्याना म्हणत  Quacks. एरवी या शब्दाचा अर्थ आहे दांभिक वैद्य.पण तो शब्द दाम्भिकाविरुध्द उठणारा  असा अर्थगौरव घेऊन उठला.पसार झालेले गुलाम पकडले गेले तर हातपाय तुटणे ,प्रसंगी शिरच्छेद्सुद्धा ! नायगरा धबधबा ,बफेलो शहर ,ईरी कालव्याभवतालचे लॉकपोर्ट  येथेही आजही भूमिगत रेल्वेमार्गाचा  इतिहास बोलला जातो,लिहिला जातो.
                                         या भूमिगत रेलमार्गाने टबमन मुक्तियात्रेला  निघाली.पूर्ण खबरदारीने. Delaware मार्गे  उत्तरेला पेन्सिल्वानिया ,फिलाडेल्फिया  वगैरे गुलामी बेकायदेशीर मानणारा नव्वद मैल दूरवरचा प्रदेश गाठण्यासाठी  टबमनने तीन आठवड्यांची तंगडतोड केली.वाटेत निबिड अंधार.वरून केवळ उत्तरेची  तारका करणार  दिशेचे मार्गदर्शन!चिडीचिप जायचे.पुढेही गप्पच राहायचे.फिलाडेल्फियात टबमन येऊन पोचली.प्रभूचा बळकट  हात पाठीवर होता!
                                             आता कुटुंबीय ,परिवार आणि गुलामीत खितपत पडणारा नीग्रो माणूस याना स्वातन्त्र्याचा  प्रकाश भेटवायचा होता.पेनसिल्वानिया,फिलाडेल्फिया वगैरे गुलामी बेकायदेशीर मानणारा  प्रदेशही  '१८५०चा फरारी गुलामांच्या अटकेचा कायदा'उगारून ऊग्र झाला.फरारी नीग्रो गुलाम पकडून देणे हे सरकारी अधिकारीपदाचे  कर्तव्य ठरले.अंधार गडद झाला.टबमनची हिम्मत खचली नाही.
                                         सतत अकरा वर्षे टबमन वारंवार Marylandच्या भागात येत राहिली.तेरा मोहिमामधून  तिने ७०गुलामाना मुक्तिधाम मिळवून दिले.विलक्षण व्यवहारचातुर्य अंगी!धैर्य अपार!!.हातात पिस्तुलही  असायचे.गुंडांच्या टोळ्या,शिकारी कुत्री यांच्यासाठी ते पिस्तुल होते.कचखाऊ गुलामाना प्रसंगी प्राणांची  भीती घालून टबमनने कॅनडात पोचविले.जॉन ब्राऊन  या सशस्त्र क्रांतिकारक मानवताभक्ताच्या बाजूने टबमन उभी राहिली.जॉन ब्राऊन रण हरला.फासावर चढला.
                                       नागरी युद्धात  उतरली रणरागिणी !
                      गुलामीच्या प्रश्नातूनच  अमेरिकेत नागरी युद्ध पेटले.दक्षिणेकडील राज्ये गुलामगिरीची कडवी समर्थक होती. अमेरिकेची एकात्म संघराज्याची मागणी अब्राहम लिंकनच्या नेतृत्वाखाली झालेली होती.गुलामीच्या  निर्मूलनाला कटिबद्ध झालेल्या अब्राहम युनियन आघाडीच्या बाजूने ताठ उभी राहिली टबमन !पोर्ट रॉयल येथे शुश्रूषा केंद्रात सेवाभावी काम करू लागली.युद्धहेर  म्हणून तिचा वावर असायचा.भुयारी मार्गांनी  टबमन सर्वत्र फिरलेली होती.नागरी युद्धात रणांगणी वावरणारी टबमन ही  पहिलीच स्त्री! कुम्बी नदीवरील हल्ल्यात टबमनच्या सहभागाने सातशेहून अधिक गुलामांची मुक्तता साधली.नागरीयुद्ध नागरी स्वातंत्र्याच्या  बाजूनेच संपले.टबमन शांतपणे Auburnला  एका छोट्या गावातील छोट्या निवासात परतली.
                        पण छळ  संपला नव्हता.नागरी युद्ध लढून रेल्वेने न्यूयॉर्कला परत जात होती रणरागिणी!पण उन्मत्त  रेल्वे कंडक्टरने  तिच्या दंडाला धरून तिला बाजूच्या भंगार डब्यात फेकून दिले.हाड मोडले.युद्धकाळात  तिला  नियमित पगारही मिळायचा नाही. १८९९पर्यंत पेन्शनचा सुद्धा पत्ता नव्हता.निग्रोद्वेष  रोमारोमात भिनलेली  गोरी माणसे सर्वत्र असायची.
                          Auburnला इवलेसे स्वतःचे घर होते.निर्वाहाला पैसे कुठून आणणार ?आयुष्यभर कफल्लक!मग टबमन हलकीसलकी कामे करू लागली.दोन संभावितानी सोन्याच्या लगडीचे आमिष दाखवून उसने  पैसे उभे करायला टबमनला लावले.टबमनने उधारउसनवार केली.पैसे लुबाडून ,टबमनला बेशुद्ध होईपर्यंत  मारझोड करून संभावित पळून गेले.संध्याछाया उतरू लागल्या.टबमनने स्त्री-पुरुष समानतेचे व्रत घेतले.परिषदांना  जायचे तर रेल्वेला पैसे नसायचे.एकदा आपली गाय विकून तिकिटाला पैसे उभे केले.पण हातपाय  गाळले नाहीत.
                     आपले घर चर्चला टबमनने देऊन टाकले."निर्धन काळ्या वृद्धाना राहायला जागा द्या"ही अटही चर्चने  मानली नाही.१९११मध्ये टबमनचे थकलेले शरीर विश्रामधामात ठेवले."एका व्याधिग्रस्त आणि कफल्लक  टबमनला मदत करा"हे वृत्तपत्रांचे पब्लिकला आवाहन!
                  न्यूमोनियाने ग्रासले. काही मित्र आणि कुटुंबीय यांच्या साक्षीने १० मार्च १९१३ रोजी टबमनने प्रभूच्या मुक्तिधामाचा  रस्ता धरला! "मी तुमच्याकरिता एक जागा मोकळी करून जात आहे"हे शेवटचे शब्द होते!  १० मार्च १९१३ रोजी टबमन गेली.म्हणजे १० मार्च २०१२पासून तिची पुण्याशताब्दी सुरु झाली आहे.
                                            येथे कर माझे जुळती!
             पानवाला.

Sunday, December 9, 2012

एसटीची रंगभूमी!

महाराष्ट्रातील परिवहन मंडळाने एसटी गाडयांच्या  माध्यमातून एक अभूतपूर्व संपर्कपर्व  घडवून आणले आहे.एक सामाजिक ,राजकीय,सांस्कृतिक अभिसरण आंदोलन उभे केले आहे.याची विचारवंतानी ,लेखकांनी फारशी दखल घेतलेली आढळत नाही.आज एसटी गाडया म्हणजे जणू देहातील मज्जासंस्था वा नससंस्था बनल्या आहेत.देहातील लक्षावधी पेशी जाणिवांचे दळणवळण  घडवतात.मेंदूकडे वार्ता पुरवतात.मेंदूचे संदेश गात्राना सांगतात.देहाचे स्वास्थ्य ,अस्वास्थ्य माणसाला कळत  राहते.महाराष्ट्रातील सर्व माणूसवस्त्या बहुतांशी एसटीने जोडल्यात.माणसे एकमेकाना जोडलीत.भेटवली  आहेत.उपजीविकांच्या जागा त्याना दाखवल्या आहेत.तिकडे नेले आहे.परत आणले आहे.पाठीवरची ओझी उतरून घेतलीत.यामधून कितीतरी आनंद ,धन्यता ,दुःख -दैन्य  सांगत कथा खुल्या होतात.कथा,कादंबरी,नाटक याना कथानके उपलब्ध झालीत.
                  एसटी गाडी ही  गरिबांचे प्रवाससाधन आहे. साहजिकच एसटी रंगभूमी ही  श्रमिक ,कष्टकरी ,गरीब माणसाची लोकरंगभूमी आहे.घरोघरी भरपूर स्वास्थ्य ,खुळखुळाट असणारी माणसे आज दारी दोन किंवा तीन चारचाकी वाहने बाळगून आहेत.आरामशीर,प्रचंड भाडेदर असणारी गाडी लीलया अंगाखाली घेऊन गुबगुबीत माणसे सहली,मौजमजा करायला जातात.वातानुकूल खाजगी शयनगृहे घेऊन चक्रवर्ती अप्सरा धावतात.श्रीमंतापरी गरिबा कोठे दरवळ तो सुखवितो?कच्चीबच्ची ,थाळी-चिरगुट यांच्यासह बाहेर पडतात त्याना महाराष्ट्रात फक्त एसटी गाड्यांच  कुशीत घेतात."जेथे जेथे काबाडकष्टी -तेथे तेथे धावे एष्टी "हे गरिबाचे वाहन एसटी रंगभूमीने नित्य  न्याहाळून घेतले पाहिजे.त्यामधून स्वतःची नाटके रंगभूमीला मिळतील.विषयानुसार सादरीकरणाचे आकृतिबंध (Forms)उभे करावे लागतील.रंगभूमी नित्य परिवर्तनशील ,लवचिक असते.साहित्य स्वतःचा आकृतिबंध घेऊन जन्माला येते.यासाठी एसटी श्रमिक रंगभूमीने (तिला लोकनागर रंगभूमी असेही म्हणता येईल.)एकूण लोकरंगभूमीशी गहिरे नाते जोडावे.भावना,आवेग त्यांच्या पायाखालच्या मातीची भाषा बोलतात.पूर्वीचे वग  वाचावेत.जात्यावरच्या ओव्या ऐकाव्यात.श्रावणातल्या कथा समजून घ्याव्यात.आठवडी बाजारातील घासाघीस ऐकावी.फुक्कट चौकश्या करून चालू लागलेल्या इष्टुरफाकड्याकडे  बघत पाटीवाली म्हणते "खिशात न्हाई आना  आणि म्हने पाटील म्हना !" याने एकूण मराठी रंगभूमीचाच  कायापालट होईल.
                          आज मला एसटी नावाचा जो लोकजागर दिसतोय,ऐकायला येतोय ,वृत्तपत्रातून पोचतोय त्याच्या  आधारे मराठी नाटकासाठी दोन आग्रही विषय  मला जाणवत आहेत.
                 १. कालचक्र सतत फिरते तसे महाराष्ट्राचे  दैनंदिन जीवनचक्र एसटीच्या रूपाने सतत फिरत आहे.एसटी बंद  की  महाराष्ट्रही एकदम बंद होतो.हे ध्यानात घेऊन सारे आंदोलक महाराष्ट्र बंद पाडण्यासाठी एसटी गाड्या  प्रथम बंद पाडतात.आंदोलक लगोलग बसेस फोडतात,तोडतात ,आगी लावतात.गेल्या काही महिन्यात  किती एसटी गाड्या जाळून टाकल्यात याचा हिशेब करावा.कुचंबलेली ,भ्यालेली,होरपळलेली अश्राप  माणसे डोळ्यासमोर आणावीत.महाराष्ट्रातील ही  एक सार्वजनिक शोकांतिका वरील सर्व हिंसक घटनांच्या  संवेदनशील,सूक्ष्म ,साक्षेपी ,निःस्पृह विश्लेषणातून एसटी रंगभूमीला "अग्निदाह ","अग्निदिव्य" किंवा "दाह"नावाचे ताकदीचे नाटक देऊ शकते.
                      २.एसटी कर्मचारीही श्रमिक वर्गातील आहेत.येथे पेशा महत्त्वाचा .जात ही  महत्त्वाची नाही.
     शारीरिक कष्ट करणारा बसचालक (ड्रायव्हर )हा घटक एक उदाहरण आहे.या चालकाचे गाडी चालवणे,दुरुस्त करणे, एकाग्रचित्त राहणे,मुक्काम करणे, आसरा-अन्न,संसारापासून सतत दूर राहणे,बायकापोरांची  काळजी,मुख्य म्हणजे शारीरिक आरोग्य हा विलक्षण अस्वस्थ करणारा विषय आहे.वाहनचालकाच्या  आरोग्यविषयक समस्यांचा गंभीरपणे विचार आयुर्वेदाचार्य श्री.बालाजी तांबे यांनी नुकताच  दै.सकाळच्या आरोग्य पुरवणीमधून मांडला आहे. तर या चक्रधरांच्या संसार कथा नाटकाना आशय पुरवतील. एसटी कर्मचारी कलाकार,कथाकार म्हणूनही प्रवेश करतील.पहाडी आवाजात पोवाडे ऐकवणारा एक कंडक्टर मला मिरज-बोरीवली  बसमध्ये भेटला होता.आजरा -पंढरपूर बसमध्ये माणुसकीचा गहिवर आणून सगळ्या  प्रवाशाना सांभाळत नेणारा कंडक्टर मी देखिला .बसची पंढरी झाली.या विठोबाला आणाना  रंगभूमीवर!
                         कला क्रीडा क्षेत्रात स्पर्धा घुमू लागल्यात. तिथेही जागतिकीकरण येते आहे.जागतिक पातळीवरची सुवर्ण, रजत पदके मोह घालीत आहेत.लोककलांचे श्वास घुसमटत आहेत.मातीशी नाते तुटत आहे.आईचे दूध  बाटलीत भरले जात आहे.अखिल भारतीय मेळाव्यात आमचे डफ ,झांज,तुणतुणे शहरी सोंग बनले.स्वयं  नादब्रह्मात गुंगून जाणारा जो  खग त्याला पक्षीप्रदर्शनात कंठ फुटत नाही.नाटक हे कलाकार व प्रेक्षक यांनी एकमेकाना भेटणे आहे. लोककलांमध्ये प्रेक्षकसुद्धा रंगभूमीचा एक भाग असतात.नाटक म्हणजे आपण आपल्याला  पाहणे असते. दाखवणे  कमी असते.स्पर्धा या चुरस,द्वेष, संशय वाढवतात.तडजोडी करायला लावतात.मग नाटकावरचे लक्ष उडते.कलाकाराना चिंब होता येत नाही.म्हणून स्पर्धांच्या आहारी जाणे नको. नाटकाने स्वतःची रबरी गादीवरची कबड्डी होऊ देऊ नये!महाभारतापासून कबड्डी हा सामूहिक व्यायामप्रकार  ठरला आहे. अभिमन्यू,अर्जुन कबड्डीपटू होते.कबड्डीचा सूर हा प्राणायाम आहे.शिवरायांनी मल्लखांबासारख्या व्यायामप्रकाराना खास प्रोत्साहन दिले.मातीतली कबड्डी गावोगावी आणली.गावाच्या वेशीवर मारुतीचे देऊळ आणि गावात तालीम आली की सशक्त तरुण वर्ग गावाचे रक्षण करू शकतो.रामदासाना  ही  दृष्टी होती.कबड्डी रबरी गादीवर वर मर्यादित झाली  तर छोट्या छोट्या तालमीनी काय करावे?क्रीडा संस्थांनी महागडी रबरी  गाद्या  कोठून आणाव्यात ?कबड्डी, नाटक हे बहुजनांचे जगणे आहे.तो एक जागर आहे.या दृष्टीने  स्पर्धा जरूर  करावी पण ती स्वतःशी!आपणच आपणाला सतत मागे टाकत जावे.नाटक हा प्रयोग असतो. आवृत्ती काढणे नसते.प्रत्येक प्रयोगात नाटक कलाकारांना नव्याने कळत जाते.स्पर्धांच्या जल्लोषात नाटकांचे  हे प्रयोगपण हरवणार नाही,हे आपण जरूर जरूर पाहिले पाहिजे!
 पानवाला !

Monday, November 5, 2012

कभी अलविदा ना कहना!

माणूस सतत माणसाच्या शोधात असतो.त्याला मित्र हवा असतो.संकटी धावून येतो म्हणून तो मित्र नव्हे.उपाशी मित्राला भरले ताट देणे,सणासुदीला नवीन कपड्यांच्या  घड्या उशापायथ्याशी आणून ठेवणे हा मदतीचा हात झाला.परोपकारातून मैत्री जुळत नाही.द्रौपदीला कृष्ण वस्त्रे पुरवत राहिला.त्याला द्वारकेची बाजारपेठ दाखवायची नव्हती.कृष्ण द्रौपदीचा सखा होता.त्याचे काळीज द्रौपदीच्या आभाळफाटल्या स्थितीने स्वतःच विवस्त्र होऊ पाहत होते.द्रौपदीचे मन तो जाणत होता.तिची हैराणी त्याला पुरती उमगली होती.त्याचे आणि द्रौपदीचे दुःख वेगळे नव्हतेच.एकमेकाना कडकडून भेटणे ,अंतरीचे धागे वस्त्राप्रमाणे घट्ट विणणे हे घडते तेथे मैत्री जुळते.यालाच सामाजिक मानसशास्त्र Social penetration-आतून एकमेकात भरून राहणे ,असे म्हणते.कुणीतरी मला आरपार जाणलंय,मला समजून घेतलय ,माझ्या गुणांबरोबर माझ्या दोषांचाही प्रेमाने स्वीकार केलाय,अशी अंतरी घट्ट गाठ बसली की माणसे प्रसंगी बेशक  धाडधाड भांडतात .अबोला धरतात.प्रचंड संतापाने आपल्या घरच्या कपबशांचा सेट फोडतात आणि दुसरे दिवशी नवीन सेट घेऊन मित्राच्या दारी उभी राहतात.मी आहे तस्सा मला जवळ करणारा कुणीतरी मला हवा असतो.ही काळजाची भूक अन्नाच्या भुकेपेक्षाही मोठी असते.मग मान,प्रतिष्ठा .मतमतांतरे काहीकाही आड येत नाहीत.पु.भा.भावे आणि ग.दि.माडगुळकर वेगळ्या झेंड्यांची माणसे होती.पण एकमेकावाचून त्याना चैन पडायचे नाही.गप्पा मारून एकमेकाना आपापल्या घरी पोचवत राहायचे.एके दिवशी उभयतांचे कडाक्याचे भांडण झाले.भावे तरातरा घरी गेले.दुसरे दिवशी तेच भावे निमूटपणे माडगुळकर यांच्या अंगणात तुळशीवृंदावनापाशी उभे राहिले.आण्णा माडगुळकरसुद्धा खाली मान घालून समोर उभे!भावे पुटपुटले ,"काल माझे चुकले बांडुंगबुवा!"(भावे-माडगुळकर एकमेकाना नव्या नव्या टोप्या घालायचे)माडगुळकर खालच्या सुरात म्हणाले,"मी तरी काही   कमी गाढवपणा केला नाही". एवढे म्हणायचा अवकाश ,दोघांनी शड्डू ठोकून कुस्तीचा पवित्रा घेतला.दुरून माडगुळकर यांची आई भरल्या डोळ्यांनी आशीर्वादपूर्वक हसत होती. रामाला कुणी जिवलग मित्र नव्हता.कृष्ण मात्र जगाचा सखा होता.म्हणून कृष्ण ज्याचा त्याचा मित्र ठरतो.लोकगंगेत कृष्ण      नाचतो.त्याच्या पाठीवर थाप मारून कुणालाही त्याच्याशी बोलता येते.सुदाम्याला पोह्यांची पुरचुंडी घेऊन त्याच्याकडे  जावेसे वाटले.
                                       हातचे राखून मैत्री होत नाही. अंतःकरणाचा कौल घ्यायचा असतो.भौगोलिक अंतर पडले  तरी आंतरिक नाते सुकत नाही. 'मित्र कसे मिळवावेत आणि त्यांच्यावर प्रभाव कसा टाकावा?'यावर पुस्तके आहेत. पण पोथ्या वाचून कोणी आजवर कुणावर जीवापाड प्रेम केलेले नाही. माझा सावंतवाडीचा परममित्र  रमेश चिटणीस आनंदमार्गाचा पराकोटीचा भक्त.पण मला कधीही दीक्षा द्यायला पाणी घेऊन नाही आला. कवटीनाच त्याच्या मार्गात होता म्हणे!मला कधी दिसला नाही.आनंदमार्गावर त्याने भाषणे ठेवली.आपण बोलला. एकदा मी भरसभेत त्याची टिंगलटवाळी केली."काखेतले आणि नाकातले केस काढायचे नाहीत म्हणे! कलकत्त्याला जाऊन आनंदमूर्तींकडून वेताच्या छड्या अंगभर खायच्या म्हणे!काय रे तुमचा हा आनंदमार्ग ?"मी म्हणालो.पण मित्र रागावला नाही.समारोपात माझ्याकडे वळून म्हणाला "माझ्याकडे बटाटेवडा  नव्हता म्हणून!नाहीतर याच्या तोंडात कोंबून त्याचे भाषण बंद पाडले असते!"कलकत्त्याच्या बाबांच्या  छड्या खाऊन परत येताना माझ्यासाठी मित्राने रसगुल्ले आणले.आमच्यात गैरसमजाला वावच नव्हता. मी सावंतवाडी सोडून सांगलीस कायमचा  परतण्याचा निर्णय  घेतला.माझ्याकडे मित्राने डोळ्याचे डोह करून  खूप वेळ पाहिले.स्वस्थ राहिला.घायकुतीला आला नाही.निरोप घेऊन दूर गेल्याने मैत्रीला गंज येत नाही. खलिल जिब्रान यांचा प्रेषित (Prophet)सांगतो-"तुमचा जिवलग मित्र तुमच्यापासून दूर अंतरी जातो तेव्हा  शोक करायचा नाही.उलट तुमचे त्याच्यातील ज्या गुणावर अतिशय प्रेम आहे त्या प्रेमगाभ्याचे स्वरूप तुम्हाला विरहातच  अधिक स्पष्ट दिसू लागते.पर्वतारोहण करणारा जो त्याला तो पर्वत तळातल्या सपाट मुलखातूनच चांगला स्पष्ट आणि एकसंध दिसतो!शब्दावाचुन   कळते सारे शब्दांच्या पलिकडले !
                                                    मैत्रीचे गणित नसते.कुणाशी किती  काळात,कोणत्या प्रसंगात मैत्री जुळेल याचा  मंत्र नाही.ती एक ईश्वरी देणगी आहे.तुमचे भाग्य आहे. प्रसन्नता बाळगल्याचा तो प्रसाद आहे.राजाराम महाविद्यालयात  तात्पुरत्या नेमणुकीने मी आलो होतो.पुढची खात्री नव्हती.सरकारी महाविद्यालय!त्यामुळे नेमणुकीनंतर  पगाराचा आदेशकागद कचेरीत कधी पोचणार  याची हमी नाही. पैशावाचून कसा राहणार?संसाराला  लागलो होतो.कोणी तसा ओळखीचा नव्हतां.माझ्या चेहरा पाहून माझी चिंता एका तरुण गोखले- बापट यासारख्या आडनावाच्या प्राध्यापकाने जाणली.मी मित्रप्रेम शोधतो हे त्या देवदत्त मित्राने ताडले असणार.तो माझ्याकडे आला. त्याचा पगार नुकताच झाला होता.पगाराचे अख्खे पाकीट त्याने माझ्या हातात दिले. खांद्यावर हात ठेवला."तुझा पगार होईल तेव्हा रक्कम परत कर.संसाराची काळजी घे!"एवढेच बोलून तो निघून गेला. मी नंतर पैसे परत केले.मित्राने कधीही वाच्यता केली नाही.आज तो कुठे आहे ते मला ठाऊक नाही.या मित्राला मी कसा विसरू?
                                                     परवाच मला अचानक एक फोन आला.चाळीस वर्षांपूर्वीच्या माझ्या  कॉलेज मित्राने दणकेबाज आवाजाने जणू माझे कान धरले!"भाव्या,साल्या मला विसरलास?इथे माझ्या शेतातल्या ओल्या शेंगा तुझी आठवण काढून वाळून जाताहेत.तुझा पत्ता नाही.पंढरपूरला ये.मी तिथे  आहे  .
चंद्रभागेच्या वाळूत बसू..एकमेकाच्या अंगावर पाणी उडवू.शेंगा खाऊ"मला आता गोपाळ  देशमुखाची मूर्ती लख्ख दिसू लागली.कॉलेजच्या होस्टेलवर तो राहायचा.गावाहून शेंगांचे टिक्के म्हणजेच मोठे बोचके आणलेले असायचे. मी गोपाळाला  कॉटवरून उठवायचो आणि खुर्चीवर अभ्यासाला बसवायचो .आणि मग त्याच्या
कॉटवर बसून मनसोक्त शेंगा खायचो.गोपाळ प्राध्यापकांचा लाडका होता.या ना त्या समितीवर जायचा.मी म्हणायचो,"गोप्या एकदिवस तू त्या मास्तरची पोरगी पळवणार बघ ."गोप्या म्हणायचा ,"तेवढे मला  जमत नाही रे !तुला नक्की जमेल. तू अस कर.मी दाखवतो त्या मुलीवर लाईन मार!प्रेम जमव .पुरेसे प्रेम जमले की ते माझ्या  खात्यावर ट्रान्स्फर कर .शेंगा देईन खायला!" हा गोपाळ मला येथून असां बन्सीधर  दिसतोय .त्याला येथूनच मिठी मारू की  प्रत्यक्ष  भेटायला जाऊ?याचा विचार करतोय.त्यावेळचा गोपाळ मला भेटेल का?
                                                   आता पंढरी कुठली?मित्र जगभर विखुरलेत.पण त्यांनी मैत्रीचा हात उबदारपणे  जवळ केलाय.वीस पंचवीस वर्षांपूर्वी दहावीच्या वर्गातून शिकून हायस्कूलमधून बाहेर  पडलेली मुले  आणि मुली मेळावा ठरवतात.त्यांच्याकडे मोबाईल नंबर्स असतात.अमेरिकेतून मुलगा भारतात येतो.कोकणातल्या  शाळेत मित्र मैत्रिणीना भरल्या डोळ्यांनी भेटतो.गप्पा करतो.गाणी म्हणतो.समूहाचां फोटो  काळजाशी धरून रुद्ध कंठाने अमेरिकेच्या उद्योगाला परततो .काळीज झाडावर असते.उड्या  जगभर चालू राहतात.शाळेत असताना मुलींना मित्रांशी मोकळेपणाने बोलता यायचे नाही.आता त्या संसारी असतात.मैत्री आता  खळखळून निकोपपणे बोलू लागते.चार दिवसांसाठी मुलगा सातासमुद्रापलीकडून येतो.भराभरा गावातले  शाळकरी मित्र गोळा होतात .गप्पा,जेवण,आईस्क्रीम यांनी रातराणीचा गंध दरवळून जातो!कुठे संपते मैत्री? मैत्रीला अंत नाही.आपला अंत झाला तरी आपले गुण  चिरंजीव झालेले असतात.मित्रांनी त्यांना खोल  कप्प्यात जपलेले असते.लाँगफेलोची कविता सांगते--"मी एक बाण जोराने हवेत सोडला--कुठे पडला ते दिसले नाही  मी एक आर्त गाणे हवेत फेकले--कुठे गेले कळले नाही!  दिवस उलटला आणि बाण झाडाच्या खोडात रुतलेला  आढळला .आणि गाणे मात्र मला मित्राच्या काळजातून ऐकू येऊ लागले "
                                  मित्रांनी कधीही एकमेकांची रजा घ्यायची नाही..अलविदा म्हणायचे नाही .
                           दर्द जितना सह जाये उतना सहना
                            दिलको लग जाये वो बात न कहना
                            मिलते  है हमारे दोस्त बहोत कम
                            इस लिये कभी अलविदा ना कहना  !
   पानवाला
                                        

Friday, October 5, 2012

हे भाग्य फक्त शिक्षकाचे !

त्या घटनेचा गंध अजून ताजा आहे. डोळ्यांचे आभाळ भारावले आहे. माणसाच्या जगण्याची थोरवी सांगणारा असा एक क्षण आयुष्यात येतो की आपले चालणे-बोलणे, श्वास घेणेही पंढरीची वाट  चालणे वाटते. तो दिवस असा होता. मला पर्सटाईप पिशवीला चेन बसवून घ्यायची होती. म्हणून एका Paradise नावाच्या गजबज इमारतीत शिरलो. पूर्वीच्या औरस चौरस वाड्याच्या जागी हा नाना प्रकारच्या आर्थिक उलाढालींचा स्वर्ग उभा राहिला आहे. एक गाळा माझ्या परिचयाचा होता. तिथे गेलो. पूर्वीचा मालक तिथे नव्हता. हातात घेऊन वावरायच्या, काखोटीला लावायच्या रंगीबेरंगी, अंगाला लगटून न्यायच्या पिशव्या इकडेतिकडे छानपैकी लावलेल्या. समोरच्या भिंतीवरही काही काही आकर्षणे लटकावून ठेवायची सोय. तिथे शुभ्रकेशी पण खुटखुटीत शरीराचे गाळामालक पिशव्यांशी गुलूगुलू करीत होते. मी त्याना विचारले "चेन लाऊन मिळेल का हो?" शांत स्पष्ट आवाजात उत्तर आले "हो,मिळेल की !" मी त्यांच्याकडे निरखून पाहिले. चेहरेपट्टी ओळखीची होती. एक अवखळ चुणचुणीत शाळकरी मुलगा त्या चेहरेपट्टीवर दफ्तर घेऊन उभा होता. मी म्हटले "तुमची चेहरेपट्टी पाहून तुम्हाला एक विचारायचे आहे.त्याने कुतुहलाने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला "विचारा ना!" "अरे तू पटवर्धन हायस्कूलमध्ये शिकत होतास का?" थेट अरेतुरेने वर्गातला प्रश्न विचारला. तो शुभ्रकेशी, अवखळ नेत्री गाळावाला एकदम चकित! "होय की  हो? पण आपण?" त्याचे डोळे आता काही शोधू लागले. "अरे मला तू ओळखले नाहीस! पण मी तुझा शिक्षक होतो. मराठी शिकवायचो. तू पटवर्धन हायस्कूलच्या पागा चौकात नववीच्या वर्गात होतास. कमानीतून शिरताना लगेचच डाव्या हाताच्या वर्गात! एकदा तू वर्गात खूप दंगा केलास. मी तुला धपाटे घातले. वर्गातून घालवूनही दिले. तू निमूटपणे बाहेर गेलास. पण कधीही तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल राग नसायचा. मलाही अजून तुला धपाटे घातल्याचे, वर्गातून घालवून दिल्याचे दु:ख आहे रे! कारण तुझा चेहरा निष्पाप असायचा. आजही तसाच आहे!!" आता तो शुभ्रकेशी, साठी उलटलेला गाळामालक म्हणून माझ्यापुढे उभा नव्हता. तो टक  लावून माझ्याकडे बघत होता.त्याने जणू शाळेचा युनिफॉर्म अंगावर चढवला होता.आपल्या बाकावर बसून फळ्याकडे पाहात होता. सुरवातीच्या चौकशीच्या वेळातच त्याने सफाईने छानपैकी  चेन माझ्या छोट्या पिशवीवर चढवली होती. मी तरी त्यावेळी कुठे गुरुजीबिरुजी होतो? ऐन तारुण्यातला मी! उच्च शिक्षणासाठी आर्थिक तरतूद म्हणून करायची होती, म्हणून शिक्षक झालेलो! पण कामाशी  बांधिलकी होती!


मी आता Paradise मध्ये उभा होतो माझ्या विद्यार्थ्यापुढे! पुढे किती शिकलास? हा व्यवसाय  तुझ्या वडिलांकडून मिळाला का? शेती वगैरे आहे काय तुझी? मुलेबाळे किती? बायकोपण दंगा करून करून मिळवलीस  काय? किती किती प्रश्न मी विचारलेले? पूर्वीचा दंगेखोर चेहरा मी आलो त्यावेळी होता. पण आता तोच चेहरा  श्यामलवर्ण मेघासारखा झाला होता. तो बोलला "सर,कुठलं शिक्षण? दहावी झालो. वडिलांचा एक स्थिर  उद्योग असेल तर ना? गावभागात एवढ्याश्या जागेत राहणारे आम्ही कर्नाटकातून आलेलो! वडिलांकडून व्यवसाय वगैरे  काही मिळाले नाही. माझा मी प्राप्तीची साधने शोधू लागलो. सर्वत्र लक्ष्य असायचे. व्यवसाय कौशल्ये आत्मसात करण्यात मी खूप चटपटीत आहे सर! पण गुंतवणुकीला पैसा होता कुठे? छोटीछोटी  कामे करीत पण नेकीने संसार रेटत, पसारा वाढवत आज पासष्टी गाठलेला उद्योगी माणूस म्हणून मी तुमच्यापुढे  उभा आहे. मुलगे आहेत. मुली आहेत. त्या सासरी गेल्यात. मला नातवंडे पण झालीत सर!" मला त्याचे नाव आठवत नव्हते पण चेहरा चित्तात कायम कोरलेला! मी भरभरून बोलत राहिलो. आत्मीयतेने  चौकशी करीत राहिलो. पुन्हा त्याला शाळेतल्या बाकावर बसवत राहिलो. तोही कंटाळला वा उबगला नाही. इतक्या वर्षानंतर आपले सर आपल्याला आपणहून भेटत आहेत. कदाचित हजेरीपटावरचा  आपला नंबरही सांगतील. मी बोलत होतो. तो नुसते ऐकत राहिला. चेहरा बालसुलभ झाला. डोळे पाणावले आणि एकाएकी तो  हमसाहमशी रडू लागला. मी त्याच्या मस्तकावरून हात फिरवला. "तुझे अश्रू पवित्र आहेत" म्हणालो! पासष्टी गाठू पाहणारा माझा एके काळचा विद्यार्थी भावाकुल होऊन माझ्यापुढे रडत होता. मला काय करावे ते सुचेना!


आपले कर्तबगारीचे आयुष्य स्वतः कोरून, तासून उभे करणारा माझा विद्यार्थी केवळ लहानपणातील  आठवणीमुळे रडू लागला असेल काय? सरांनी आपली आठवण ठेवली. मला ते प्रेमाने भेटले. याबद्दलची ती कृतज्ञता असेल काय? शाळेतल्या आठवणी जागवण्याने एरवी आनंदच वाटला असता. माझ्या विद्यार्थ्याचे अश्रू खोटे  नव्हते. पण ते आणखी एक वेगळी कथा सांगत असावेत. त्या माझ्या विद्यार्थ्याने एकाकी  धडपडीने संसार उभवला. सर्वाना आधार दिला. पण आपण केलेले कुणाला बोलून न दाखवण्याचा त्याचा स्वभाव असणार. शक्यता अशी आहे की कोणी कधी त्याची चौकशीच केलेली नाही. मुलांनी आणि मुलीनीही कधी बाबांच्या थकल्या पायाना तेल चोळले नसेल. बायकांनी कधी नवरा म्हणून त्याच्याशी आपल्या  आयुष्याबद्दल बोलायचे नाही, असा जुना रिवाज होता. मित्र उणेदुणे तेवढे काढत बसणारे  असू शकतात. जे राबणारे त्यांनी राबत जावे. त्यांच्यापासून इतरांनी घेत जावे. अशाच एकाला विद्यार्थीदशेत रानावनातून काटेकुटे  तुडवत शहराकडे शाळेत जावे लागले. माधुकरी मागावी लागली. हेटाळणी ऐकावी लागली. पुढे कुणीही या वनवासाबद्दल विचारलेही नाही. त्याला कुणीतरी विचारले तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी आले. असेच माझ्या विद्यार्थ्याच्या बाबतीत  झाले असेल काय?


असेल असेच वाटते.कारण मी त्याला वर्गात वि.स.खांडेकरांच्या कवितेतील ओळी  ऐकवल्या होत्या.

"फुलासारखे केवळ कोमल देऊ नको रे मन मज देवा!
                                     असती सुंदर हसरी सुमने ,जग आहे परि जळता लाव्हा "

या कविता ओळीनी त्याला हलवून टाकले असणार. मला माझ्या कॉलेज जीवनात  अभ्यासलेले  My ideas of University 'विद्यापीठासंबंधीच्या माझ्या कल्पना' हे न्यूमन यांनी लिहिलेले पुस्तक आठवले. न्यूमन म्हणतात "Teacher is a living voice".  शिक्षक हा एक जिवंत आवाज आहे. त्याचा परिणाम आयुष्याची साथ करतो. Henry Adams या लेखकानेही लिहिले आहे की  शिक्षकालाच आपल्या बोलण्या शिकवण्याचे परिणाम दीर्घ काळ टिकून राहणारे असतात  याची कल्पना नसते. दोन व्यक्तित्वे जो अन्तःसंवाद करतात तो मला  ऐकायला मिळाला. मी शब्दांतून बोलत होतो. माझा पासष्ट वर्षांचा विद्यार्थी आपल्या अश्रूमधून  आपले मनोगत मांडत होता!

पानवाला.
                                                

Sunday, September 23, 2012

बाप्पा मोरया ,यावे ताराया !

          विठूरायाला उराउरी भेटायला माणसे पंढरीला जातात. गणरायाला मात्र  कडेखांद्यावरून नाचत बागडत घरी आणतात. विठूरायाची वारी तशी गणरायाची सुद्धा वारीच! वारे घेऊन वारी निघते. विठूराया आणि गणराया हे दोघेही उंच पिकातून डोलत असतात. पेरणीचा हंगाम आणि सुगीचा हंगाम विठूरायाच्या भेटीला नेतो. श्रावणाने राने हिरवी हिरवी गार केलेली असतात. ही फुललेली राने वने पर्णसंभार घेऊन गणरायाला भेटायला येतात. गणपती बसतो त्यावेळी त्याला मधुमालती, माका, बेल, धोत्रा, आघाडा, पिंपळ, जाई, केवडा सारे सारे येतात भेटायला! कोकणात माटव नावाची चौकट असते गणरायापुढ़े! त्यावर नारळ, बेडे तर असतातच पण त्याहीपेक्षा लडिवाळपणे येतात ती हरणे नावाची नाजुक पिवळी पिवळी गवतफुले! हिरव्या हिरव्या गवत पानासह! कोकणात पूर्वी पिवळी, लाल रंगाची मातीही मिळायची. रंगीत मातीतून गणराया प्रकट व्हायचा. हिरवा रंग हवा ना? कारल्याची हिरवीचार पाने पायरीवर वरवंटा घेऊन वाटायची. वाटीत रस भरायचा. भिंतीवरील चित्रामध्ये, गणरायाच्या गात्रावर हरितसृष्टी खुलायची. रानातून, मातीतून गणराया येणार. विसर्जन जलप्रवाहात! गणपतीचे नाते भूमीशी, मातीत राबतात त्या दोन्ही हातांशी, गाळला जातो त्या घामाशी!! पार्वतीने अंगावरील मळ थोपटून गणेशबालक जन्माला घातले. घामावर मातीचा थर जमतो तेव्हा मळ तयार होतो. गणपतीचा उल्लेख गणपती अथर्वशीर्षामध्ये व्रातपती असा येतो. नमः व्रातपतये । व्रात म्हणजे अंगमेहनतीने उदरनिर्वाह करणारा समुदाय! भूमी पिकवणारे, घाम गाळणारे. या श्रमवीरांचा म्हणजे व्रातीनांचा प्रमुख तो गणपतीराया!

                  विठोबा आणि गणोबा  हे अवतार नव्हेत. त्यांची जीवनगाथा नसते. ते नित्य असणे, सर्वत्र वसणे आहे. उराउरी भेटणे आहे. श्रमाला नित्य भेटतात ते विठोबा आणि   गणोबा! खेड्यात बघा, पुरुष माणसे एकमेकाना बहुधा विठोबा आणि गणोबा असे हाकारतात. मारुतराया, विठूराया आणि गणूराया ही लोकप्रतिभेतून उत्पन्न झालेली विलक्षण महाकाव्ये आहेत. ती मिथके -Myths आहेत. किती त्यांची दर्शने म्हणावीत? मूर्तीकार, चित्रकार, कवी यांना गणोबा - विठोबा म्हणजे एक अखंड प्रेरणा आहे. अरुण दाभोळकरानी गणरायाची हजारो विविध दर्शने  कुंचल्यातून साकारली आहेत. विठुराया - गणरायाचे अद्वैत अरुण दाभोळकर यांच्या प्रतिभेला खुणावू लागले आणि मग विठू-गणरायाचे विलक्षण रंग रेखावतरण झाले. विठू म्हणून ध्यान कटीवर हात ठेवून उभे तर त्या ध्यानाचे मस्तक आहे गणरायाचे. नीलवर्णी मुख .डोळे खोल चिंतनात उतरलेले - जणू डोहच! सोंडेला शेवटी पीळ घातलेला. मस्तकावर अर्धचंद्राकृती अरुणरंगी  चन्दन लेपी तृतीय नेत्र! कुंचल्याची पूजाच करावी!! भारतीय मनाला सुचलेले गणपती हे जे भावप्रतिक आहे, जी एक archetypal मिथक निर्मितीची प्रतिभाशक्ती आहे, ती  आपण सतत समजून घ्यावी असा आग्रह प्रा .रा .ग .जाधव यानी धरला आहे.

                      सीता ही भूमिकन्या. गणपती हा भूमिपुत्र. पाण्यात डुम्बणारा. नदीत उतरलेला हत्ती बाहेर यायला बघत नाही. उत्सवमूर्ती म्हणून पाण्यातच विसर्जन होते. भूमीवरील सकल जगण्यावर, अंकुरण्यावर आभाळमाया पांघरत येणारा गणराया मग विघ्नकर्ता का असावा? गणपती मूळचा विघ्नकर्ता मग त्याच्या सोंडेला बिलगून, त्याच्या पायघडया उरावर घेऊन त्याला विघ्नहर्ता बनविला. गणेश पुराणात कथा आहे. पार्वतीने गुणेश  नावाच्या पुत्राला जन्म दिला. शिवाने त्याला वैनायक नावाच्या गणांचे आधिपत्य देऊन जगावर विघ्न आणायला मोकाट सोडला. विघ्नकर्ता हा त्याचा मूळ स्वभाव. विघ्नहर्ता ही माणसाने केलेली प्रार्थना!

                     आपल्याच दैवताची विघ्नकर्ता म्हणून  पूजा करणारा, त्याचे दर्शन घेणारा आणखी कुठला मानव समूह जगात नसावा.  देव जर विश्वनिर्माता आहे, विश्वचालक आहे, आणि विश्वसंहारकही आहे, तर माणसाला  भोगाव्या लागतात त्या आपत्ती, क्लेश, फरफट, उपासमार, पारतंत्र्य त्यानेच आणले असणार हे उघड  आहे की नाही? विघ्ने तर येतातच. शोक, निराशा, हताशा यांचे अस्तित्व कुणी नाकारलेले नाही.  सारे क्षणिक आहे. शोकपूर्ण आहे. असे भगवान् बुद्ध सांगत फिरले. उपाय सांगत  राहिले. ' सुख पाहता जवापाड़े - दु:ख पर्वताएवढे ' असे तुकोबा सांगत होतेच की! जगभरची धर्म संस्थापक मंडळी माणसातूनच  फिरली. विव्हळ माणसाच्या जगण्यावर उपाय शोधायला निघाली. भ्रमण करीत निघालेल्या समर्थांचा जीव सैरभैर झाला. विवेकानंद स्वामींचा प्रवास हाल, यातना यांचे त्याना दर्शन घडवणारा होता. 'बुडती जन न देखवे डोळा ' म्हणूनच कळ सोसणारे थोर आपल्या जगण्याचे रान करीत राहतात.  इतरांच्या जगण्याचे ओझे हलके करतात. आपली गोड  गोड गाणी शोकाची विराणी असतात. शेवटी दु:ख म्हणजे तरी काय? आपल्या धडपडीला, इच्छा वासनांना, सुखाच्या निवासाला, पोटभर खाण्याला, निवांत लोळण्याला सुरुंग लागणे म्हणजे दु:ख ना? शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापना करू देणे म्हणजे औरंगजेबावर विघ्ने आणणे  होते की नाही? आपल्याला हवे ते मिळत नाही म्हटले की माणसाला संकटे आल्यासारखे वाटते.

                       तरीपण हे बाप्पा गणराया, जे अन्यायी आहेत, शोषक आहेत त्यांच्यावर तू जरुर  संकटे आण. पण पापभीरू, सज्जन जीवांना, हे विघ्नहर्त्या,  तू विघ्ने आणून का बरे छळतोस? सारे कोकण गणरायाच्या उपासनेत गढ़लेले आहे. गणरायाच्या भक्तिसागराला तेथे उधाण येते. मग त्याच दक्षिण कोकणात तू रानातून, गावातून, केळीच्या लागवडीतून रानटी हत्तींची फ़ौज का म्हणून सोडलीस? असेच पिसाळलेले सत्यानाशी रानटी हत्ती सर्व भारतभर राजकारणात, उद्योगकांडात, शिक्षण खाणीत का म्हणून घुसवलेस? खाणीतला कोळसा स्विस बँका भरायला का पाठवत आहेस? श्रीखंड, आम्रखंड सोडून तू ज्याला त्याला भूखण्ड का म्हणून खायला  घालतोस? सतत रस्ते खोदून रस्त्यांची बारमाही शेती तूच सांगितलीस ना? दलितांच्या स्त्रियांना विवस्त्र करून  त्यांच्या मातृत्वाची अशी विटंबना तुला बघवते कशी? दुष्काळ पडून माणसे मरतात. कसाबाला कोट्यवधी  रुपयांचा मलिदा मिळतो. सहकारमहर्षी, शिक्षणसम्राट, धोतर फिटलेले पुढारी लक्षावधी रुपयांच्या वाढदिवस पुरवण्या काढतात. खदा खदा हसत राहतात. तुला कसे चालते हे?

                      यावर गणरायाचे  उत्तर ऐका! सुख, चैनीने माणसाला गुंगी येते. दारूची झिंग चढते. माणसे गटारीत लोळत राहतात. दारुची झिंग उतरायची तर  दु:ख यातना यांचा उतारा हवाच. दु:ख माणसाला जागृत, सतर्क, क्रियाशील बनवते. रानात तण  मी वाढवतो कारण मग शेतकरी ते तण जाळतो. काटेकुटे नष्ट करतो. ढेकूळ  दगड फोडतो. नांगर मारतो. त्यातून शेती फुलते. मीच जपानला भूकंपाचे धक्के दिले. सारे बरबाद करून  टाकले. पण त्या विघ्नातून जपानी माणसाचा पुरुषार्थ जागा झाला. पूर्वीपेक्षा समर्थ, सुंदर जपान उभा करायला सज्ज  झाला. कष्टाच्या जपानेच जपान देश मोठा झाला. हे जगणे माझ्या विघ्नकर्तेपणाचे एक वरदान आहे.

                   मी विघ्ने आणतो  कारण संकटानेच माणसे एकत्र येतात. संकट माणसाना आणते निकट!मग ती संकटाशी  सामना करतात. नव्या जीवनाची स्वप्ने पाहतात. कळ येणे म्हणजे कळणे आणि वळ उठणे म्हणजे वळणे. असे असते माणसाचे कळवळणे. संकटे माणसाला संकुचितपणातून, कोंझेपणातून बाहेर काढतात. आपल्या जगण्याचा सतत विचार करू लागतात. 'एकमेका सहाय्य करू -अवघे धरु सुपंथ' हे विघ्नकर्ता  मी तुम्हाला आवाहन करीत असतो. "एका आम्रतरूतळी' काय झाले?तुफान वादळ, विजांचा कडकडाट, भुई थरथरणे  रानभर उठले. एक भक्कम विशाल आम्रवृक्ष होता. त्या आम्रवृक्षाखाली हरिण, वाघ, सिंह, लांडगे, ससे, कोल्हे सारे निमूटपणे, शांतपणे एकत्र आले. विघ्नाला तोंड देवू लागले.

                        बाप्पा! आम्ही दक्ष राहू.  संकटप्रसंगी ठाम उभे राहू. पण विघ्नानी हद्द ओलांडली आहे!दैत्य तुझीच सोंड कापून टाकण्याच्या ताकदीचे आग्यावेताळ  झालेत रे! परशू घेऊन ये. जगावर जरुर विघ्ने आण . .आग  ओत. पण हे सारे संहारकार्य तिमिरासुरांचे कर. दुष्टांचा विघ्नकर्ता हो! सुष्टांचा विघ्नहर्ता हो!!

             पानवाला .