Sunday, September 23, 2012

बाप्पा मोरया ,यावे ताराया !

          विठूरायाला उराउरी भेटायला माणसे पंढरीला जातात. गणरायाला मात्र  कडेखांद्यावरून नाचत बागडत घरी आणतात. विठूरायाची वारी तशी गणरायाची सुद्धा वारीच! वारे घेऊन वारी निघते. विठूराया आणि गणराया हे दोघेही उंच पिकातून डोलत असतात. पेरणीचा हंगाम आणि सुगीचा हंगाम विठूरायाच्या भेटीला नेतो. श्रावणाने राने हिरवी हिरवी गार केलेली असतात. ही फुललेली राने वने पर्णसंभार घेऊन गणरायाला भेटायला येतात. गणपती बसतो त्यावेळी त्याला मधुमालती, माका, बेल, धोत्रा, आघाडा, पिंपळ, जाई, केवडा सारे सारे येतात भेटायला! कोकणात माटव नावाची चौकट असते गणरायापुढ़े! त्यावर नारळ, बेडे तर असतातच पण त्याहीपेक्षा लडिवाळपणे येतात ती हरणे नावाची नाजुक पिवळी पिवळी गवतफुले! हिरव्या हिरव्या गवत पानासह! कोकणात पूर्वी पिवळी, लाल रंगाची मातीही मिळायची. रंगीत मातीतून गणराया प्रकट व्हायचा. हिरवा रंग हवा ना? कारल्याची हिरवीचार पाने पायरीवर वरवंटा घेऊन वाटायची. वाटीत रस भरायचा. भिंतीवरील चित्रामध्ये, गणरायाच्या गात्रावर हरितसृष्टी खुलायची. रानातून, मातीतून गणराया येणार. विसर्जन जलप्रवाहात! गणपतीचे नाते भूमीशी, मातीत राबतात त्या दोन्ही हातांशी, गाळला जातो त्या घामाशी!! पार्वतीने अंगावरील मळ थोपटून गणेशबालक जन्माला घातले. घामावर मातीचा थर जमतो तेव्हा मळ तयार होतो. गणपतीचा उल्लेख गणपती अथर्वशीर्षामध्ये व्रातपती असा येतो. नमः व्रातपतये । व्रात म्हणजे अंगमेहनतीने उदरनिर्वाह करणारा समुदाय! भूमी पिकवणारे, घाम गाळणारे. या श्रमवीरांचा म्हणजे व्रातीनांचा प्रमुख तो गणपतीराया!

                  विठोबा आणि गणोबा  हे अवतार नव्हेत. त्यांची जीवनगाथा नसते. ते नित्य असणे, सर्वत्र वसणे आहे. उराउरी भेटणे आहे. श्रमाला नित्य भेटतात ते विठोबा आणि   गणोबा! खेड्यात बघा, पुरुष माणसे एकमेकाना बहुधा विठोबा आणि गणोबा असे हाकारतात. मारुतराया, विठूराया आणि गणूराया ही लोकप्रतिभेतून उत्पन्न झालेली विलक्षण महाकाव्ये आहेत. ती मिथके -Myths आहेत. किती त्यांची दर्शने म्हणावीत? मूर्तीकार, चित्रकार, कवी यांना गणोबा - विठोबा म्हणजे एक अखंड प्रेरणा आहे. अरुण दाभोळकरानी गणरायाची हजारो विविध दर्शने  कुंचल्यातून साकारली आहेत. विठुराया - गणरायाचे अद्वैत अरुण दाभोळकर यांच्या प्रतिभेला खुणावू लागले आणि मग विठू-गणरायाचे विलक्षण रंग रेखावतरण झाले. विठू म्हणून ध्यान कटीवर हात ठेवून उभे तर त्या ध्यानाचे मस्तक आहे गणरायाचे. नीलवर्णी मुख .डोळे खोल चिंतनात उतरलेले - जणू डोहच! सोंडेला शेवटी पीळ घातलेला. मस्तकावर अर्धचंद्राकृती अरुणरंगी  चन्दन लेपी तृतीय नेत्र! कुंचल्याची पूजाच करावी!! भारतीय मनाला सुचलेले गणपती हे जे भावप्रतिक आहे, जी एक archetypal मिथक निर्मितीची प्रतिभाशक्ती आहे, ती  आपण सतत समजून घ्यावी असा आग्रह प्रा .रा .ग .जाधव यानी धरला आहे.

                      सीता ही भूमिकन्या. गणपती हा भूमिपुत्र. पाण्यात डुम्बणारा. नदीत उतरलेला हत्ती बाहेर यायला बघत नाही. उत्सवमूर्ती म्हणून पाण्यातच विसर्जन होते. भूमीवरील सकल जगण्यावर, अंकुरण्यावर आभाळमाया पांघरत येणारा गणराया मग विघ्नकर्ता का असावा? गणपती मूळचा विघ्नकर्ता मग त्याच्या सोंडेला बिलगून, त्याच्या पायघडया उरावर घेऊन त्याला विघ्नहर्ता बनविला. गणेश पुराणात कथा आहे. पार्वतीने गुणेश  नावाच्या पुत्राला जन्म दिला. शिवाने त्याला वैनायक नावाच्या गणांचे आधिपत्य देऊन जगावर विघ्न आणायला मोकाट सोडला. विघ्नकर्ता हा त्याचा मूळ स्वभाव. विघ्नहर्ता ही माणसाने केलेली प्रार्थना!

                     आपल्याच दैवताची विघ्नकर्ता म्हणून  पूजा करणारा, त्याचे दर्शन घेणारा आणखी कुठला मानव समूह जगात नसावा.  देव जर विश्वनिर्माता आहे, विश्वचालक आहे, आणि विश्वसंहारकही आहे, तर माणसाला  भोगाव्या लागतात त्या आपत्ती, क्लेश, फरफट, उपासमार, पारतंत्र्य त्यानेच आणले असणार हे उघड  आहे की नाही? विघ्ने तर येतातच. शोक, निराशा, हताशा यांचे अस्तित्व कुणी नाकारलेले नाही.  सारे क्षणिक आहे. शोकपूर्ण आहे. असे भगवान् बुद्ध सांगत फिरले. उपाय सांगत  राहिले. ' सुख पाहता जवापाड़े - दु:ख पर्वताएवढे ' असे तुकोबा सांगत होतेच की! जगभरची धर्म संस्थापक मंडळी माणसातूनच  फिरली. विव्हळ माणसाच्या जगण्यावर उपाय शोधायला निघाली. भ्रमण करीत निघालेल्या समर्थांचा जीव सैरभैर झाला. विवेकानंद स्वामींचा प्रवास हाल, यातना यांचे त्याना दर्शन घडवणारा होता. 'बुडती जन न देखवे डोळा ' म्हणूनच कळ सोसणारे थोर आपल्या जगण्याचे रान करीत राहतात.  इतरांच्या जगण्याचे ओझे हलके करतात. आपली गोड  गोड गाणी शोकाची विराणी असतात. शेवटी दु:ख म्हणजे तरी काय? आपल्या धडपडीला, इच्छा वासनांना, सुखाच्या निवासाला, पोटभर खाण्याला, निवांत लोळण्याला सुरुंग लागणे म्हणजे दु:ख ना? शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापना करू देणे म्हणजे औरंगजेबावर विघ्ने आणणे  होते की नाही? आपल्याला हवे ते मिळत नाही म्हटले की माणसाला संकटे आल्यासारखे वाटते.

                       तरीपण हे बाप्पा गणराया, जे अन्यायी आहेत, शोषक आहेत त्यांच्यावर तू जरुर  संकटे आण. पण पापभीरू, सज्जन जीवांना, हे विघ्नहर्त्या,  तू विघ्ने आणून का बरे छळतोस? सारे कोकण गणरायाच्या उपासनेत गढ़लेले आहे. गणरायाच्या भक्तिसागराला तेथे उधाण येते. मग त्याच दक्षिण कोकणात तू रानातून, गावातून, केळीच्या लागवडीतून रानटी हत्तींची फ़ौज का म्हणून सोडलीस? असेच पिसाळलेले सत्यानाशी रानटी हत्ती सर्व भारतभर राजकारणात, उद्योगकांडात, शिक्षण खाणीत का म्हणून घुसवलेस? खाणीतला कोळसा स्विस बँका भरायला का पाठवत आहेस? श्रीखंड, आम्रखंड सोडून तू ज्याला त्याला भूखण्ड का म्हणून खायला  घालतोस? सतत रस्ते खोदून रस्त्यांची बारमाही शेती तूच सांगितलीस ना? दलितांच्या स्त्रियांना विवस्त्र करून  त्यांच्या मातृत्वाची अशी विटंबना तुला बघवते कशी? दुष्काळ पडून माणसे मरतात. कसाबाला कोट्यवधी  रुपयांचा मलिदा मिळतो. सहकारमहर्षी, शिक्षणसम्राट, धोतर फिटलेले पुढारी लक्षावधी रुपयांच्या वाढदिवस पुरवण्या काढतात. खदा खदा हसत राहतात. तुला कसे चालते हे?

                      यावर गणरायाचे  उत्तर ऐका! सुख, चैनीने माणसाला गुंगी येते. दारूची झिंग चढते. माणसे गटारीत लोळत राहतात. दारुची झिंग उतरायची तर  दु:ख यातना यांचा उतारा हवाच. दु:ख माणसाला जागृत, सतर्क, क्रियाशील बनवते. रानात तण  मी वाढवतो कारण मग शेतकरी ते तण जाळतो. काटेकुटे नष्ट करतो. ढेकूळ  दगड फोडतो. नांगर मारतो. त्यातून शेती फुलते. मीच जपानला भूकंपाचे धक्के दिले. सारे बरबाद करून  टाकले. पण त्या विघ्नातून जपानी माणसाचा पुरुषार्थ जागा झाला. पूर्वीपेक्षा समर्थ, सुंदर जपान उभा करायला सज्ज  झाला. कष्टाच्या जपानेच जपान देश मोठा झाला. हे जगणे माझ्या विघ्नकर्तेपणाचे एक वरदान आहे.

                   मी विघ्ने आणतो  कारण संकटानेच माणसे एकत्र येतात. संकट माणसाना आणते निकट!मग ती संकटाशी  सामना करतात. नव्या जीवनाची स्वप्ने पाहतात. कळ येणे म्हणजे कळणे आणि वळ उठणे म्हणजे वळणे. असे असते माणसाचे कळवळणे. संकटे माणसाला संकुचितपणातून, कोंझेपणातून बाहेर काढतात. आपल्या जगण्याचा सतत विचार करू लागतात. 'एकमेका सहाय्य करू -अवघे धरु सुपंथ' हे विघ्नकर्ता  मी तुम्हाला आवाहन करीत असतो. "एका आम्रतरूतळी' काय झाले?तुफान वादळ, विजांचा कडकडाट, भुई थरथरणे  रानभर उठले. एक भक्कम विशाल आम्रवृक्ष होता. त्या आम्रवृक्षाखाली हरिण, वाघ, सिंह, लांडगे, ससे, कोल्हे सारे निमूटपणे, शांतपणे एकत्र आले. विघ्नाला तोंड देवू लागले.

                        बाप्पा! आम्ही दक्ष राहू.  संकटप्रसंगी ठाम उभे राहू. पण विघ्नानी हद्द ओलांडली आहे!दैत्य तुझीच सोंड कापून टाकण्याच्या ताकदीचे आग्यावेताळ  झालेत रे! परशू घेऊन ये. जगावर जरुर विघ्ने आण . .आग  ओत. पण हे सारे संहारकार्य तिमिरासुरांचे कर. दुष्टांचा विघ्नकर्ता हो! सुष्टांचा विघ्नहर्ता हो!!

             पानवाला .

Friday, September 14, 2012

निदान पश्चात्ताप तरी हवा!

माणूस आजवर चुकतमाकतच जगत आलाय. मेंदूच्या ज्या मर्यादा त्या माणसाच्या आकलनाच्याही मर्यादा. मग काय झाले? सुख शोधत जाताना आपणच काही अन्याय, यातना निर्माण केल्या. या जगी सर्वात सुंदर आहे ते माणसाचे मन आणि सर्वात कुरूप आहे तेही माणसाचे मनच. भव्य, देखण्या व प्रचंड वास्तू मानवी प्रतिभेची उत्तुंग भरारी दाखवतात. पण प्रत्येक चिरा-वेठबिगारांचे अश्रू, घाम-रक्त यांचे गळणे, पाठफोडू फटके ऐकवत राहतात. स्वातंत्र्यामागे बलिदाने असतात. साम्राज्यामागे शोषण, लूटमार असते. नीग्रो गुलाम आणि रेड इंडियन यांच्या शोषण आणि कत्तलीमधून अमेरिकेची श्रीमंती उभी राहिली आहे.
          
मुद्दा असा की आपण चुका करीत आलो आहोत. जातपात, उच्च -नीच भाव, जवळचा-दूरचा, शत्रू-मित्रभाव या गोष्टी जीवन बकाल करीत आले. माणसातली आई, बाबा, भाऊ, लेकरु, सखासोबती आपणास नेहमीच नाही ओळखू येत! कारण आपण पुरेशा प्रमाणात आपणावरच डोळे नाही रोखत. आपणच आपले बंधू आणि आपणच आपले शत्रू आहोत हे श्रीकृष्ण बजावत असतो.

चुका करणे माणसाच्या रचनेतच आहे. चुकांची जाणीव ठेवणे. त्या पुन्हा होऊ न देणे - प्रसंगी कबुली देणे हे गंगास्नान आहे. पश्चात्ताप, प्रायश्चित्त, कबूली (Confessions) हे धर्ममार्ग अशा अर्थाने की ते माणसाला कात टाकायला लावतात. काही प्रमाणात पश्चात्तापाची, आत्मचिंतनाची, आत्मसुधारणेची ही तळमळ आज मला सर्वत्र दिसतेय का? मला समाज नावाची वस्तू  तरी दिसतेय का?

दूरदर्शनवर आज मराठीतून दोन मालिका चालू  आहेत. अंतर्मुख व्हावे अशा योग्यतेच्या! महादेव गोविन्द रानडे आणि त्यांची रमाबाई यांच्या जीवनावर "उंच माझा झोका" ही मालिका आणि विखेपाटील खानदानाच्या मिशाउगारु जगण्यावर मारझोड दाखवणारी नारीछळ मालिका! दोन्ही तुलना करण्यासारख्या आहेत. न्यायमूर्ती रानडे यांचा काल -- स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाही. पुनर्विवाह, संपत्तीत वाटा  नाही. समान हक्क नाही. विकासाला वाव नाही. ही सनातनी कुबट आणि घुसमट करणारी मालिका पाहताना ब्राह्मण वर्ग अपराधी मनाने, पश्चात्तापाने  वरमलेला असतो. तिकडे विखे  पाटील दरडावून, मुस्कटात मारून, दंडुका वापरून सुनांना, मुलींना, पशूप्रमाणे छळतात, थोर कूळ आणि अस्सल रक्त सांगतात ते पाहून पश्चात्तापाने होरपळणे किती प्रमाणात घडते याचे उत्तर ज्याचे त्यानी मनाशी द्यावे. दलित स्त्रियावरील बलात्कार, घरेदारे जाळणे, जमिनी हिसकावून घेणे वगैरे अपप्रकारातील  बहुजनसमाजाचा मोठा सहभाग मान्य करुन मन खंतावते का? ब्राम्हणेतर चळवळी बद्दल केशवराव जेधे लिहितात "ब्राम्हणेतर चळवळीत राष्ट्रीय वृत्तीला  काही वाव नव्हता. बारा वर्षे मी या चळवळीत काढली पण देशाची सेवा करतो असे मला कधीही वाटले  नाही". माधवराव बागल खंत व्यक्त करतात "आज अस्पृश्यावरचे अन्याय  ब्राम्हण समाजाकडून होत नाहीत. पण आपणच मनुस्मृतीचे पुनर्जीवन करीत आहोत" (भारतीय प्रबोधन ग्रंथ पृष्ठ क्रमांक 221). पश्चात्तापाची  अशी भावना आहे आज कुठे? ब्राम्हण पुरुष कापून काढा. स्त्रियाना भोगा --असा ग्रंथ प्रसिद्ध करणारा  महामराठा पुढारी किती लोकांना पश्चात्ताप आणि शरम वाटायला लावतो?

"पालावरचे  जिणे"  हे गिरीश प्रभुणे यांचे भडभडून आणणारे पुस्तक वाचा. पारधी स्त्रियांचे जीणे  पारधी पुरुषांनीच कसे असह्य करून  सोडलय. मग भटक्या, दलित पुढारलेल्या स्त्री पुरुषांना  अपराधी वाटायला  नको काय? वाटते का तसे?  "आमच्याशी रोटीबेटी व्यवहार करा "असे म्हणणारे लक्ष्मण माने. त्यांची बायको ब्राम्हण  कुटुंबातील! तिचे सासरी स्वागत कसे झाले? बायका म्हणाल्या "लक्ष्मणाच्या +++ कड़े बघून ही या घरात  आली आहे" हे स्वागत लक्ष्मण माने याना शरम आणते का? निगरगट्टपणा पाहून निराश झालेले ना .ग  .गोरे लिहितात "राष्ट्रीय उत्थापनाची आशा बाळगण्याची हिम्मत माझ्या ठिकाणी नाही" (भारतीय प्रबोधन).

" देशाची फाळणी" ही काळजाला  घरे पाडणारी दुर्घटना नाही का? पण कोणालाही पश्चात्ताप वाटत  नाही. पु. भा. भावे  जळत जळत मरुन गेले. "हिंदू मूळचे भ्याड तर मुसलमान गुंड प्रवृत्तीचे" हे मत ठाम पणे सांगणारे गांधीजी मग मुसलमानांच्या नैतिक, शैक्षणिक सुधारणेकडे, त्यांच्या आधुनिकीकरण प्रक्रियेकडे  एवढे सुद्धा ध्यान का देत नाहीत? त्याना गुंड आणि उन्मत्त का राहू दिले? मुसलमानांच्या उद्धाराविषयी  गांधीजीना काही आस्था का म्हणून नव्हती? वाईट वाटायला नको? बलात्कारित हिन्दू स्त्रियांना गांधीजी  म्हणाले "जीभ चावा आणि मरा! आत्महत्त्या करा!!" ज्यू लोकानी सामूहिक आत्महत्त्या करावी  म्हणजे  हिटलरची जगभर निंदा होईल" हे गांधीजी सांगत  होते . याबद्दल काही पश्चात्ताप?

आक्रमक, पिसाटधर्मी वृत्तीच्या लोकांना सुसंस्कृत, राष्ट्रीय वृत्तीचे करण्यासाठी काहीच न  करावे असे व्रत घेणारे गांधीजी अन्त्योदयाची कल्पना मांडतात. ती  मग कशी साकारणार? "एका दिशेचा शोध" घेणारे संदीप वासलेकर याना वाटते की  महात्माजींची अन्त्योदय ही कल्पना आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची  भौतिक शास्त्राविषयीची  निष्ठा यांचे मीलन करून आपल्या देशातील लोक समाधानी, आनंदी होणे  शक्य होते. मग सावरकर का मानवले नाहीत? गांधीजीनी  त्यांचे का ऐकले नाही? आणि आता वासलेकराना  काश्मिरात दहशतवादी तरुण भेटला. वासलेकराना म्हणाला "आमचा मार्ग चुकीचा आहे . मान्य! पण आमची कोंडी झाली आहे. तुमचा मार्ग कोणता? ते  सांगा ना?" गांधीजी कोणता मार्ग सांगणार होते?

आता काय करणार? निदान पश्चात्ताप तरी वाटू दे ना? अपयशाची जबाबदारी जे स्वीकारत नाहीत, त्यांना यशातही  भागीदार होता येत नाही. आणि पुढील उन्नतीतही  ते स्वावलंबी होत नाहीत.

पानवाला.

Sunday, September 2, 2012

अरेरे कैनडा विट्ठलू पोचलाच नाही पैलथडी !

कानडा  विट्ठलू  टोरन्टोला उतरु पाहत होता. रुक्मिणीचा त्याला सतत आग्रह! "भक्त थोर ते गेले निघुनी| गेला महिमा तव नामाचा। रहायचे मग इथे कशाला?" देवाला कसला प्रॉब्लेम? सारे देव आकाशमार्गे उडत जातात. तुकोबा विमानाने उडाला. दुसरा भिंत उडवत होता. रामाकडे तर पुष्पक विमान, सारे महामंडळ टोरंटोला अलगद पोचले असते.  या विमान तिकिटाच्या लफड्यात आमचा कैनडा विट्ठलू साहित्यिकू ना. धो. महानोर राहिला की नाही इथेच अजंठा  वेरुळच्या गुंफांमध्येच!  तिकडे टोरन्टो मध्ये भाषण कोण गुंफणार? माइक मिळेल का हो माइक? मंच मिळेल का हो मंच असे गणपतराव बेलवलकर  यांच्या आवाजात महानोरानी म्हणावे का हो? भीमरूपी महारुद्रा एवढे म्हटले असते तरी मारुतीरायाने नाधो आणि राधा याना टोरंटोच्या देवधरे यांच्या समोर उभे करुन  "देवधरे या देवाला धरा बरे" असे म्हटले नसते का? महानोर यांच्या सारखा द्रष्टा कवी जायलाच हवा होता.  पंढरपूर येथे चंद्रभागा तर टोरंटो भवती ईरी सारख्या अथांग सरोवरांचा पसारा. नायगारा धबधब्याला त्यांचे धो धो पाणी. महानोराना उधाण  आले असते की हो! शिवाय याच भूमीने नीग्रो गुलाम जीवाना मुक्तीचा श्वास घेऊ दिला होता. मराठीला तिथे Harriet Tubman भेटली असती.  दलित लेखकानाच नव्हे तर आपणा सर्वाना तेथे बाबासाहेब भेटले असते.

                       मराठी सारस्वताला अमेरिकेच्या आधी जी भूमी भेटली ती Canada हीच! येथेच एकता नावाचे मासिक निघते. अमेरिकेतील मराठी माणसानी लिहिलेल्या मराठी कथांचा संग्रह याच मायमराठी वाल्या लेकरानी प्रकाशित केला. त्यांच्या एकता मासिकात, एरवीच्या पाक्षिकातसुद्धा मराठी मजकुरात एक जरी इंग्रजी शब्द आला तरी अमेरिकन मराठी माणूस आकांत करतो! आणि महामंडल दल दल प्रदेशी पहा! मराठी नाटकांची नावे इंग्रजीत, पुस्तकांची शीर्षके इंग्रजीत, पहिला Science Fiction वर मराठी चित्रपट येतोय! नाव आहे -Welcome to the jungle! कविता तर मड्डम झाली आहे. ओळीपण इंग्रजीत! म्हणजे इंग्लिश झाली बरबाद! स्वत्वाला त्यजुनी गुलाम बनती ते शंख वा शिंपल्या! आता वीणा वादिनी जाते परदेशात!

                             मला कधीच वाटले नव्हते की साहित्यिक अचानक सावरकरांचे ऐकतील आणि लेखणी मोडून बंदूक हाती घेतील म्हणून! गोरा परका हाकलायचा तर बंदूक ठीक पण मराठी माणूस गोरे लोकांच्या देशात नेताना बंदूक कशाला? टोरंटो ला झाशीची राणी  इकडे सुद्धा लक्ष्मीबाई! येऊ तर सारे  नाही तर एकही नाही. वराढ़ निघाले टोरंटोला! मागे पानिपतला मराठे वीर गेले लढायला नाना फडणीस यांची आई गेली तीर्थयात्रेला! मराठी आई  बिचारी ओशाळ वाणी  उभी राहिली!

अमेरिकेतील मराठी माणसाना उद्देशून प्रा रा. ग. जाधव यानी ह्युस्टन च्या स्नेह या वार्षिक अंकात आवाहन केले होते "ही अमेरिकेतील मराठीप्रेमी माणसे म्हणजे दोन भिन्न संस्कृती मधील संपर्क वाहिन्या आहेत. भाषिक तथा  कलासाहित्यातील गुणवत्ता यांची ओळख करून घेणे व दोन भिन्न सांस्कृतिक समाजातील योग्य आदान प्रदान  सुरु करणे हे या संपर्क वाहिन्यांचे काम आहे. प्रथम आपण मराठी भाषा, साहित्य, कला,  प्रथा यांची नीट  माहिती घ्या. अमेरिकेतील भाषा संस्कृती यांची गुणवत्ता जाणा. एक तौलनिक दृष्टी कमवा ती  महाराष्ट्राला द्या. अमेरिकन भाषासंस्कृति पहा. आपली भाषासंस्कृति त्याना समजावून द्या".  तेथील दलितत्व जाणून घ्या.  आपले दलित साहित्य परिचित करा. संवाद घडवा.  एकत्र बसा आणि संवाद घडवा. नुसते पुसी मांजरी  बनू नका! "दुरिताचे तिमिर जावो" हा संदेश विश्व साहित्य सम्मेलनातून जावा हा केवढा व्यापक, मुक्तिदायक  विचार आहे! साहित्य सम्मेलन आयोजकांना, पगडीधारकांना  दे रे सद्बुद्धि माझ्या Canada विट्ठलू साहित्यिका!

पानवाला.