Thursday, October 28, 2010

इडा पिडा टळो

काहीही करा. भय इथले संपत नाही. माणूस भया भया जगतो. आयुष्याचा प्रत्येक क्षण जणू रक्षण मागतो. सॉमरसेट मॉम म्हणतो ``माणसाचे आयुष्य तर वीतभर आहे. निसर्ग तर ठार विरोधात. मग माणूस म्हणजे एक हास्यास्पद बाहुले". भय, चिंता, हताशपण, धास्ती या सर्वांचे प्रतीक म्हणजे माणसाला दिसणारा अंधार. माणूस म्हणतो "माझ्या डोळ्या समोर तर सारा अंधारच आहे." आशा म्हणजे प्रकाशाची तिरीप. हताशा म्हणजे तिमिर. निबिड अंधार. पहाटे भूपाळी फुटते. काळोख दाटला की पिशाच्चे वावरू लागतात. आगी लावायला अंधार आधार पुरवतो. तम सरू दे . उजेड पसरु दे. कारण इथे `अल्प द्युति ,तम बहु` असा प्रकार आहे. अशी ही अंधाराची अरिष्टाशी आणि प्रकाशाची उल्हासाशी कायम गाठ बसली आहे. हे अगदी जगभरचे चित्र आहे. वेदातच उषा सूक्ते आहेत असे नाही. जगभरचे धर्मग्रंथ आणि माणसांची नाचगाणी उजेडाचा उदोउदो करतात. देवालयात समया तेवतात. चर्च मध्ये मेणबत्त्या उजेड करतात. मशिदीत काय अल्ला अंधारात बुडतो? मशाली पेटल्या की पोवाडे डफ वाजवू लागतात. देव हा शब्दही दिवा घेऊन येतो. दिव म्हणजे प्रकाश देणे. दिवा दाखवतो त्यालाच देव म्हणायचे. असा देव नावाचा दिवाच बाल मुखातून बोलायला लागला, उंच पिकातून डोलायला लागला की अंतरी रामेश्वर आणि काशीक्षेत्र प्रकट होते. जगायला आधार देत राहते. येशू म्हणतो ``भिवू नको.मी तुझ्या पाठीशी आहे". ``मी तुला पापमुक्त करीन.शोक करू नकोस.``असे म्हणत श्रीकृष्ण अर्जुनाला अंधारप्रवृत्तीवर नेमका बाण धरायला सांगतात.
 
मला चित्तात धर आणि युद्ध कर हे जगभरच्या मानवाना देवाचे सांगणे आहे अरिष्टाशी झुंज करण्यासाठी, अंधाराला दूर करण्यासाठी सर्वत्र माणसे देवाला शरण जातात. म्हणजे ती काही देवाचे गुलाम ठरत नाहीत. देवाचे बोट धरून जावे म्हणतात. "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती --चालविशी हाती धरुनीया". माणसाला आयुष्यभर आई लागते. बाप पाठीशी उभा लागतो. देव ही माणसाची गरज आहे. म्हणूनच प्रा. शिवाजीराव भोसले सांगायचे "जगात देव नसेलही पण तो माणसाला हवा असतो". केशवसुत अर्ध सत्य सांगून गेले. `देव दानवा नरे निर्मिले` हे पुरते खरे नाही. देवाला माणसाने शोधले . कारण दानव त्याच्या हरघडी मानगुटीवर बसतात. देव हा साक्षात्कार आहे. दानव हा नेहमीचा अनुभव आहे. देव मनात उभा करायचा आणि अंधाराशी लढायचे ही जगभरच्या मानवाची जगण्याची रीत आहे.
 
तुमचा वेदांत राहू दे बाजूला. आमचा आकांत कसा शांत करायचा ते सांगा. पीक हवे-भीक नको. दवा द्या -दुवा घ्या. रोग राई नको. धरणी दुभंगायला नको. ढगफूटीमधून मुलांसकट वाहून जायला नको. वीज मस्तकी पडूदे नको. वारे घोंगावत येणे नको. पाण्याकरिता ल्हा ल्हा व्हायला नको. अंधारातली कट कारस्थाने बरबादी पेरू नयेत म्हणजे झाले. "पोरे खातील प्वाटभर मलिदा" असे भरला डोळा जगणे भेटावे म्हणून माणसे जगभर उत्सव करतात .जत्रा भरवतात. विठू रायाच्या भेटीसाठी वारीला जातात. अगदी दगडधोंडे पण पूजतात. शेतात पीक उभे राहिले की नाच गाणी करतात. वाजत गाजत धान्य घरी आणतात. बहुतेक उत्सव पावसा पाण्याची गाणी म्हणत, सुगीचे स्वागत करत येतात. लोकजीवन असा इहलोकीचा देव भजत राहते. दुष्ट जीवांच्या संहाराची नाटके हेच देशो देशीच्या लोक रंगभूमीचे स्वरूप असते. ही लोकोत्सवी रंग भूमी आपण आवर्जून पहायला हवी. ती माणसांची अंगे रंगवते. मुखवटे देते. पिशाच्च होवून मानवाना पिशाच्चांच्या अंगावर जायला सांगते. कोंकण प्रदेशातल्या दशावतार नाटकात प्रथम प्रवेश करतो तो संकासुर. लांब रक्त दाखवणारी जीभ बाहेर काढणारा, ब्रम्हदेवाचे वेद चोरून नेणारा.विष्णु संकासुराचा वध करतो. आणि मगच त्याला जगाचा सांभाळ करणे शक्य होते.
 
ता ३१ ऑक्टोबरला अमेरिकेत सगळीकडे हलोवीन (Halloween) उत्सव नारिंगी रंगाचे भोपळे पोखरुन विक्राळ चेहरा दाखवत येतोय. हाडांचे खोटे खोटे सापळे, भेसूर कवट्या, कभिन्न रंगाचे रोखून बघणारे मांजर, रक्त पिणारी वाघळे, प्रचंड जाळे विणून बसलेले कोळी घराबाहेर उभे आहेत. भूतघरे उभी रहात आहेत. तुम्ही घरात गेलात की कोणीतरी तुमचा खालून पाय ओढणार. तुम्ही घाबरणार. मुखवटे घालून मुलाना घेवून माणसे घरोघर जातात. दारात उभे राहून विचारतात. Trick or treat? काही देणार खायला की भीती दाखवणार? माणसे मुलांना चोक्लेट्स देतात. पैसेही देतात. लोकजीवनात खोडसाळ आणि रासवटवृत्तीपण असते. काही ठिकाणी घरातून एक भुताचा मुखवटा भसकन बाहेर येतो. मुले धावू लागतात अथवा कापू लागतात. याला म्हणायचे ट्रिक. हलोविन हा निधर्मी लोकोत्सव आहे. चर्चमध्ये कोणी जात नाहीत. चर्चमध्ये असतो यावेळी "सकल संतांचा दिवस" All Saints Day. हलोविन उत्सव स्वतः पिशाच्च होवून भूते गाडायला जाणार. प्रकाशाचे दिवस सरत आलेत. आता अंधाराचे दिवस येणार. दिवस लहान. रात्र मोठी होणार. अंधारात भुताखेतांचा त्रास फार. म्हणून हलोविन हेलो हेलो करीत घरोघर धावते. अमेरिकेतील मराठी माणसेही अष्टा गावच्या भावया बघायला जावे तसे मुखवटे बघायला जातात. आपल्या दारातही भूतजग निर्माण करतात.
 
जगभर माणूस नावाचे मन एकाच ऊर्मीचे असते. सांगली जिल्ह्यातले अष्टा हे गाव "भावई" नावाने राक्षस वधांचे नाट्य सडकेवर उभे करते. गावात जगदंबेचा संचार असतो. सांगलीला पूर्वी तडकडताई कशी भयानक मुखवटा घालून ,हातात सूप घेऊन रस्ताभर धावायची. "तडकडताई भुताची आई -नाकात कवडी बाजार दौडी" म्हणत माणसे नाचत राहायची. तडकडताई हातातल्या सुपाने ज्याला त्याला झोडपत राहायची. जणू गावातली अरिष्ते हाकलत न्यायची. गावाबाहेर महारवाड्यातल्या मोठ्या झाडाखाली तडकडताईचे लग्न व्हायचे. नवराही लोकांच्या पायात बोरीचे काटे मोडत यायचा. तडकडताईला आणखी कुठल्या गावाने पसार करू नये म्हणून जोगन्या नावाचे दाढीवाले चांदीची वाटी हातात घ्यायचे. दोन तलवार धारी वाटी रक्षण करायचे. आता हे सारे काय म्हणायचे?
 
दक्षिण कोकणात तर बघायलाच नको.सर्वत्र वेताळाचा संचार. देसरूढ़ नावाची एक लोकजीवनातील रूढी येथे मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी भागात आहे. शिमग्यानंतर एक दिवस गावच्या प्रमुख महाराने सूर्योदयाबरोबर ढोलाचा ताल धरायचा. गावातली जाणकार मंडळी घरोघर जावून अन्न एकत्र करणार. दिवस बुडला की नदीपार जावून खड्डा काढणार आणि त्यात अन्न पुरणार. म्हणजे गावातली सगळी भुते गाडली गेली. गाव आता निर्भय! पण हे सारे यथासांग होईतो महाराने ढोल थांबवायचा नाही. ढोल थांबला की भुते मोकाट सुटणार. एक म्हातारा महार ढोल वाजवता वाजवता काळजात कळ येऊन खाली पडला. त्याचा ढोल मुलाने सावरला. काळजाचा ठोका थांबला, पण ढोलाचा ठोका चालू राहिला. "इडा पिडा टलो. लेकरा वासराना उदंड आयुष्य मिळो" हा लोकांचा टाहो ऐकतच `दुरिताचे तिमिर जावो `ही वाणी आळंदीच्या ओवीला फुटली असावी.
 
पानवाला.

Saturday, October 23, 2010

जी.ए. यांचा स्वामी रंगमंचावर

माणूस नाटक का पाहतो? या प्रश्नाचे उत्तर `माणूस आरशात का बघतो?` या प्रश्नाच्या उत्तरात असावे. मी येथे ` आहे`असे म्हणता,`असावे`असे म्हणतो. कारण मला नेहमी प्रश्नच उत्तरापेक्षा जास्त महत्वाचे वाटतात. माणसाला आयुष्यात चांगले चांगले प्रश्न स्वतःला विचारता यायला हवेत. प्रश्न कायमचे असतात. उत्तरे तात्पुरती राहतात. तर नाटक हा प्रकार सगळ्या जगण्याला व्यापून पुन्हा रंगमंचावरही नाना प्रकारे खेळ करुन दाखवतो. पण नाटक म्हणजे खोटे खोटे असणे नव्हे. ते जगण्याला शोधत जाणे असते. माणूस हाच माणसासमोरचा सर्वात मोठ्या उत्सुकतेचा पण अतिगहन प्रश्न आहे आणि म्हणुनच मला परत परत भरतमुनि आठवतात. भिन्न अभिरुचीच्या लोकांचे एकमेव `समाराधन `म्हणजे नाटक. कारण ते त्रिगुण विश्वामधुन निर्माण झालेल्या लोकचरिताचे नाना रस, नाना रंग, नाना ढंग उलगडून दाखवते. माणसाच्या जगण्यात सत्व, रज, तम असे भोगणे आणि भोग कालवलेले आहेत. जीवनाचे रंग-ढंग देवालाही पुरते आकलन होत नाहीत. आणि म्हणूनच तो अवतार घेतो. माणूस म्हणून जगण्यात त्याचा पार अवतार होऊन जातो.

मी असा एकदम विवरात गेलो. कारण जी.. कुलकर्णी यानी विवरात नेलेल्या एका कथेबद्दल `मला काही सांगायच` आहे. जी. . यांची `स्वामी` ही कथा वाचण्यापूर्वी दव्याची गोळी घ्या. छाती दडपून जाईल. श्वास कोंडेल. एका आडगावात केवळ आपले मूळ गाव म्हणून उतरलेला तरुण शेवटची बस चुकली म्हणून हताश मुद्रेने उभा असतो. प्रदेश बिनचेहरा असणारा. एकही माणूस ओळख दाखवायला तयार नाही. काय करावे? कोठे जावे? कसे रहावे? एका कफनीवाल्या महंताचा हात खांद्यावर पडतो. तो त्या तरुणाला काय करावे? कोठे जावे? कसे रहावे? कुठवर राहावे? या प्रश्नांची उत्तरे पुरवायला मठात घेऊन जातो. आश्रम जमिनीखाली खोल खोल भुयारात असतो. कफनी चढवून तरुण त्या महंतामागे जातो. आत जाणारा कोणी परत मागे येणार नसतो. तरुण जीवालाच स्वामी बनून आता लालबुंद प्रकाशात शेवटच्या श्वासापर्यंत तेथे रहायचे असते. मखमली शय्या, चांदीच्या ताटातून दोन्ही वेळा सुग्रास भोजन. गरम पाणी स्नानाला. स्नानाच्या वेळीच केवळ उभे राहता येणार. एरवी फक्त रांगत जाणे. `उरग` असा जी. ` यांचा शब्द आहे. आधीच्या तीन स्वामींचे आता फक्त लोंबणारे हाडांचे भेसूर हास्य बंद कप्प्यात असते. ते तरुण स्वामीला भेडसावत राहते. भक्कम चिरे कपारीतुनसुद्धा बाहेर आलेला वेलीचा नाजुक कोंब हवा पुरवठा करायच्या नलिकेतून वरच्या जमिनीत फुलावा म्हणून सारून नवा स्वामी खाचीत मखमली शय्येवर अगदी निश्चल होतो. जीर्ण कपडे उतरून आत्मा नवी वस्त्रे धारण करायला निघतो.

ही श्वास कोंडलेली जिवंत समाधीची कथा १७ ऑक्टोबरला अमेरिकेच्या बे एरियातील कला नावाच्या संस्थेने रंगमंचावर आणली. स्वामीना आणि महंतालासुद्धा फ्रीमौंट (Fremont) कम्युनिटी सेंटरमध्ये बाहेर काढले. जणू एक कबरच फ्री श्वास घ्यायला बाहेर आली. अमोल लेले यानी महंत उभा केला. रोहित पोतनीस यानी स्वामींचा कोंडलेला श्वास ऐकवला. हेमांगी वाडेकर यानी प्रभावी संकलन आणि निवेदन केले. मनोज वाडेकर दिग्दर्शक बनून नुसत्या स्वामीनाच नव्हे तर मराठी रंगभूमीच्या पुढील प्रवासाला दिशा सुचवत राहिले. प्रेक्षक अवाक , थकक झाले. जगण्याच्या बुडाशी आपण गेलोत असा त्याना तो अनुभव होता.जी. . यांची स्वामी ही कथा फार वर्षापूर्वी मी वाचली होती.चार दिवस दबल्या छातीने मग मी वावरलो होतो.जी. . नी असे हे अजब भूत बोकांडी का बसवावे? एवढी भयकथा त्याना का सुचावी? ही वेदना का म्हणून? महंत कोणताही मठ-पंथ -अगदी अघोरी पंथसुद्धा सांगत नाही. त्याला अवतारी पुरुषाची कामना नाही.तपस्या ,उपासनामार्ग, यांचे भाकड त्याला रुचत नाही.मग स्वामीनी काय करावे? महंत वाट चुकलेल्याला कोणत्या वाटेला लावतात म्हणावे?ही कथा नशा देते की बधीरता भरते? गडकरी कवीनी पूर्वी इश्काचा जहरी प्याला दाखवून ,त्या प्याल्याने झाडाला `टोकाविन चालू मरणे ते त्याचे होते जगणे, असे सांगितले होते.पण झाड इश्काच्या जहरी प्याल्यात तरी बुडाले होते. महन्ताच्या आश्रमात कुठला इश्क? येथे फक्त श्वास कोंडणे -- स्वामींचे आणि वाचकांचे. मला स्वामी कथेचा हेतुच समजला नव्हता. अजूनही उमगलाय असे वाटत नाही.

पण `स्वामी` रंगमंचावर आल्यापासून अनेक खिडक्या किलकिल्या होताहेत असे वाटू लागले. `स्वामी`कथा स्टेजवर उभी करणे हा तद्दन वेडेपणा आहे, असे वाटत असताना आता मात्र माझे मत खूप बदलले आहे. मी प्रयोग पाहिला .शब्द बाजूला करून कविता वाचावी तसे शब्द बाजूला करुन मी कथा पाहिली. आणि नाथांचे भारुड आठवू लागले. अध्यात्म रंगमंचावर येते हे समजले. तर्क फारसा भरवशाचा नसतो.स्मृति ग्रंथ एक काही धड सांगत नाहीत. दोन मुनीना प्रमाण मानावे तर एकाचेही सांगणे फायनल नसते. शेवटी धर्माचे रहस्य गुहेतच हरवले आहे. बरी माणसे जगतात तसे आपणही जगावे झाले. धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम! हे सांगणारा कोणीतरी मला `स्वामी` कथेत कुठेतरी दिसतोय असे वाटू लागलय. हे केवळ `गुहा` या शब्दाखातर नाही. लायब्नीज नावाच्या जर्मन तत्त्व चिन्तकाने हे सारे विश्व मोनाड म्हणजे चेतनायुक्त अणु यांची वसाहत आहे असे म्हटले आहे. प्रत्येक मोनाड स्वतन्त्र व्यक्तिमत्वाचा, अजिबात खिडकी नसलेला. पण त्याच्या ठायी अवघ्या जगाचे प्रतिबिम्ब असते. हा बिन खिडकीचा मोनाड पुन्हा नीट तपासावा, असेही वाटू लागलय. ही प्रेरणा मला `स्वामी` कथेच्या नाट्य प्रयोगातून मिळतेआहे. `जग हे बंदीशाला`, `जो तो पथ चुकलेला` हे गीत मला `स्वामी` कथेचा अर्थ सांगेल काय असे माझे मनच मला विचारू लागले आहे. मनुष्याने चांगले प्रश्न शोधावेत. त्यांच्या नेमक्या उत्तरासाठी जीव मुठीत धरु नये. हे चांगले प्रश्न नाट्यप्रयोगानी उभे करायचे असतात. उपदेश, मुक्ति, दास्यनिवारण अशी पखालवाल्याची कामे तेवढी नाटकावर लादू नयेत. भोगाचे एक भोग म्हणून साक्षात् दर्शन घडले तर `अजि म्या ब्रम्ह पाहिले`असे का मानू नये?

`स्वामी`कथेच्या नाट्यरूप दर्शनाने मराठीतल्या अनेक कथाना रंगमंच खुला होणार आहे असे मला वाटते. तंत्रे सुचत जातात. कथावस्तुमध्ये ती असतात. ती निरखता यायला मात्र हवीत. जी. . यांच्या इतर कितीतरी गूढ़ कथा रंगमंचाची वाट बघतील. दुर्बोध ठरलेल्या पण मनावर गारुड आहे अशा मराठी कवितांचे सुद्धा नाट्य रूप रंगमंचावर दाखवता येणार नाही का? अनेक कठीण पण ताकदवान कथा रंगमंचावर उतरु शकतील. सांगलीचे श्रीरंग विष्णु जोशी यानी `वीज` नावाची मुक्ता बाईच्या मुक्तीचा क्षण जिवंत करणारी कथा नुकतीच प्रसिद्ध केली आहे. ही `वीज`रंगप्रेमी कलाकारानी जरूर रंगमंचावर पसरली पाहिजे. असे कितीतरी श्रीरंग रंगभूमीला नवीन रंग देण्याकरिता आपले कुंचले पुरवतील. जी. . यांच्या `स्वामी` कथेच्या रंगभूमीवरील अवतारा मध्ये मला हे सारे नवे नवे अवतार आज खुणावत आहेत.

पानवाला.