Friday, October 5, 2012

हे भाग्य फक्त शिक्षकाचे !

त्या घटनेचा गंध अजून ताजा आहे. डोळ्यांचे आभाळ भारावले आहे. माणसाच्या जगण्याची थोरवी सांगणारा असा एक क्षण आयुष्यात येतो की आपले चालणे-बोलणे, श्वास घेणेही पंढरीची वाट  चालणे वाटते. तो दिवस असा होता. मला पर्सटाईप पिशवीला चेन बसवून घ्यायची होती. म्हणून एका Paradise नावाच्या गजबज इमारतीत शिरलो. पूर्वीच्या औरस चौरस वाड्याच्या जागी हा नाना प्रकारच्या आर्थिक उलाढालींचा स्वर्ग उभा राहिला आहे. एक गाळा माझ्या परिचयाचा होता. तिथे गेलो. पूर्वीचा मालक तिथे नव्हता. हातात घेऊन वावरायच्या, काखोटीला लावायच्या रंगीबेरंगी, अंगाला लगटून न्यायच्या पिशव्या इकडेतिकडे छानपैकी लावलेल्या. समोरच्या भिंतीवरही काही काही आकर्षणे लटकावून ठेवायची सोय. तिथे शुभ्रकेशी पण खुटखुटीत शरीराचे गाळामालक पिशव्यांशी गुलूगुलू करीत होते. मी त्याना विचारले "चेन लाऊन मिळेल का हो?" शांत स्पष्ट आवाजात उत्तर आले "हो,मिळेल की !" मी त्यांच्याकडे निरखून पाहिले. चेहरेपट्टी ओळखीची होती. एक अवखळ चुणचुणीत शाळकरी मुलगा त्या चेहरेपट्टीवर दफ्तर घेऊन उभा होता. मी म्हटले "तुमची चेहरेपट्टी पाहून तुम्हाला एक विचारायचे आहे.त्याने कुतुहलाने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला "विचारा ना!" "अरे तू पटवर्धन हायस्कूलमध्ये शिकत होतास का?" थेट अरेतुरेने वर्गातला प्रश्न विचारला. तो शुभ्रकेशी, अवखळ नेत्री गाळावाला एकदम चकित! "होय की  हो? पण आपण?" त्याचे डोळे आता काही शोधू लागले. "अरे मला तू ओळखले नाहीस! पण मी तुझा शिक्षक होतो. मराठी शिकवायचो. तू पटवर्धन हायस्कूलच्या पागा चौकात नववीच्या वर्गात होतास. कमानीतून शिरताना लगेचच डाव्या हाताच्या वर्गात! एकदा तू वर्गात खूप दंगा केलास. मी तुला धपाटे घातले. वर्गातून घालवूनही दिले. तू निमूटपणे बाहेर गेलास. पण कधीही तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल राग नसायचा. मलाही अजून तुला धपाटे घातल्याचे, वर्गातून घालवून दिल्याचे दु:ख आहे रे! कारण तुझा चेहरा निष्पाप असायचा. आजही तसाच आहे!!" आता तो शुभ्रकेशी, साठी उलटलेला गाळामालक म्हणून माझ्यापुढे उभा नव्हता. तो टक  लावून माझ्याकडे बघत होता.त्याने जणू शाळेचा युनिफॉर्म अंगावर चढवला होता.आपल्या बाकावर बसून फळ्याकडे पाहात होता. सुरवातीच्या चौकशीच्या वेळातच त्याने सफाईने छानपैकी  चेन माझ्या छोट्या पिशवीवर चढवली होती. मी तरी त्यावेळी कुठे गुरुजीबिरुजी होतो? ऐन तारुण्यातला मी! उच्च शिक्षणासाठी आर्थिक तरतूद म्हणून करायची होती, म्हणून शिक्षक झालेलो! पण कामाशी  बांधिलकी होती!


मी आता Paradise मध्ये उभा होतो माझ्या विद्यार्थ्यापुढे! पुढे किती शिकलास? हा व्यवसाय  तुझ्या वडिलांकडून मिळाला का? शेती वगैरे आहे काय तुझी? मुलेबाळे किती? बायकोपण दंगा करून करून मिळवलीस  काय? किती किती प्रश्न मी विचारलेले? पूर्वीचा दंगेखोर चेहरा मी आलो त्यावेळी होता. पण आता तोच चेहरा  श्यामलवर्ण मेघासारखा झाला होता. तो बोलला "सर,कुठलं शिक्षण? दहावी झालो. वडिलांचा एक स्थिर  उद्योग असेल तर ना? गावभागात एवढ्याश्या जागेत राहणारे आम्ही कर्नाटकातून आलेलो! वडिलांकडून व्यवसाय वगैरे  काही मिळाले नाही. माझा मी प्राप्तीची साधने शोधू लागलो. सर्वत्र लक्ष्य असायचे. व्यवसाय कौशल्ये आत्मसात करण्यात मी खूप चटपटीत आहे सर! पण गुंतवणुकीला पैसा होता कुठे? छोटीछोटी  कामे करीत पण नेकीने संसार रेटत, पसारा वाढवत आज पासष्टी गाठलेला उद्योगी माणूस म्हणून मी तुमच्यापुढे  उभा आहे. मुलगे आहेत. मुली आहेत. त्या सासरी गेल्यात. मला नातवंडे पण झालीत सर!" मला त्याचे नाव आठवत नव्हते पण चेहरा चित्तात कायम कोरलेला! मी भरभरून बोलत राहिलो. आत्मीयतेने  चौकशी करीत राहिलो. पुन्हा त्याला शाळेतल्या बाकावर बसवत राहिलो. तोही कंटाळला वा उबगला नाही. इतक्या वर्षानंतर आपले सर आपल्याला आपणहून भेटत आहेत. कदाचित हजेरीपटावरचा  आपला नंबरही सांगतील. मी बोलत होतो. तो नुसते ऐकत राहिला. चेहरा बालसुलभ झाला. डोळे पाणावले आणि एकाएकी तो  हमसाहमशी रडू लागला. मी त्याच्या मस्तकावरून हात फिरवला. "तुझे अश्रू पवित्र आहेत" म्हणालो! पासष्टी गाठू पाहणारा माझा एके काळचा विद्यार्थी भावाकुल होऊन माझ्यापुढे रडत होता. मला काय करावे ते सुचेना!


आपले कर्तबगारीचे आयुष्य स्वतः कोरून, तासून उभे करणारा माझा विद्यार्थी केवळ लहानपणातील  आठवणीमुळे रडू लागला असेल काय? सरांनी आपली आठवण ठेवली. मला ते प्रेमाने भेटले. याबद्दलची ती कृतज्ञता असेल काय? शाळेतल्या आठवणी जागवण्याने एरवी आनंदच वाटला असता. माझ्या विद्यार्थ्याचे अश्रू खोटे  नव्हते. पण ते आणखी एक वेगळी कथा सांगत असावेत. त्या माझ्या विद्यार्थ्याने एकाकी  धडपडीने संसार उभवला. सर्वाना आधार दिला. पण आपण केलेले कुणाला बोलून न दाखवण्याचा त्याचा स्वभाव असणार. शक्यता अशी आहे की कोणी कधी त्याची चौकशीच केलेली नाही. मुलांनी आणि मुलीनीही कधी बाबांच्या थकल्या पायाना तेल चोळले नसेल. बायकांनी कधी नवरा म्हणून त्याच्याशी आपल्या  आयुष्याबद्दल बोलायचे नाही, असा जुना रिवाज होता. मित्र उणेदुणे तेवढे काढत बसणारे  असू शकतात. जे राबणारे त्यांनी राबत जावे. त्यांच्यापासून इतरांनी घेत जावे. अशाच एकाला विद्यार्थीदशेत रानावनातून काटेकुटे  तुडवत शहराकडे शाळेत जावे लागले. माधुकरी मागावी लागली. हेटाळणी ऐकावी लागली. पुढे कुणीही या वनवासाबद्दल विचारलेही नाही. त्याला कुणीतरी विचारले तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी आले. असेच माझ्या विद्यार्थ्याच्या बाबतीत  झाले असेल काय?


असेल असेच वाटते.कारण मी त्याला वर्गात वि.स.खांडेकरांच्या कवितेतील ओळी  ऐकवल्या होत्या.

"फुलासारखे केवळ कोमल देऊ नको रे मन मज देवा!
                                     असती सुंदर हसरी सुमने ,जग आहे परि जळता लाव्हा "

या कविता ओळीनी त्याला हलवून टाकले असणार. मला माझ्या कॉलेज जीवनात  अभ्यासलेले  My ideas of University 'विद्यापीठासंबंधीच्या माझ्या कल्पना' हे न्यूमन यांनी लिहिलेले पुस्तक आठवले. न्यूमन म्हणतात "Teacher is a living voice".  शिक्षक हा एक जिवंत आवाज आहे. त्याचा परिणाम आयुष्याची साथ करतो. Henry Adams या लेखकानेही लिहिले आहे की  शिक्षकालाच आपल्या बोलण्या शिकवण्याचे परिणाम दीर्घ काळ टिकून राहणारे असतात  याची कल्पना नसते. दोन व्यक्तित्वे जो अन्तःसंवाद करतात तो मला  ऐकायला मिळाला. मी शब्दांतून बोलत होतो. माझा पासष्ट वर्षांचा विद्यार्थी आपल्या अश्रूमधून  आपले मनोगत मांडत होता!

पानवाला.