Monday, December 17, 2012

गुलामांची मुक्ताई हेरिएट टबमन !

रेड इंडियन माणसांची भूमी आणि त्यावर नीग्रो गुलामानी  फटके खात गाळलेला घाम ,सांडलेले रक्त यामधूनच आजची अमेरिकन श्रीमंती उभी राहिली आहे।श्वेत माणसांचा हा अश्वेत इतिहास आहे.इ.स.१४०० ते १८०० या कालखंडात पश्चिम आफ्रिकेच्या किनारा पट्ट्यातून नीग्रो मानवमेंढरे-स्त्री -पुरुष ,कच्ची बच्ची लेकरेसुद्धा फटके खात ,उपाशी पोटी,ओंडक्याप्रमाणे जहाजात आडवी रचून अमेरिकेत ओतली जाऊ लागली."अनंत अमुची ध्येयासक्ती -अनंत अन आशा "गाणारे कोलंबसाचे गर्वगीत असंख्य निरपराध ,लाचार माणसांच्या थडग्यावर नाचत राहिले .
                                               पण छळाला बळ येतेच.दुःखाला वाचा फुटतेच.अमेरिकेत "Uncle Tom's Cabin"ही अक्षरदाह घेऊन कादंबरी आली.Harriet Stoveच्या घळघळत्या लेखणीमधून.या कादंबरीने गुलामगिरी प्रश्नावर अमेरिकेत 'नागरी युद्ध '-Civil War पेटवले.आजही 'रूट्स 'ही नीग्रो कुटुंबाची मरणगाथा वाचा.Alex या कृष्णवर्णीय लेखकाने लिहिलेली ही ' पापाची मुळे 'वाचलीत तर "जळो जळो जिणे लाजिरवाणे "असे होऊन जाईल .अमृतातेही पैजा जिंकणारी अक्षरे ज्ञानोबानी आणली.मरणातेही खाली मान घालायला लावणारी अक्षरे Alex यांनी जगभरच्या मनाना दाखवली.नीग्रो मनात खदखदणारा  लाव्हा रस जोरदार फवारा टबमन या कृष्णवर्णीय गुलाम स्त्रीच्या रूपाने जमिनीतून वर आला.पण हा लाव्हा जमिन जाळणारा नव्हता.टबमनला "मोझेस 'हा किताब माणसांनी दिलेला.टबमन येशूच्या हाकेने भारावलेली होती.येशूने हिब्रू लोकाना स्वतः  स्वातंत्र्याच्या मुलखात आणले होते. म्हणून येशु होता 'मोझेस'.टबमननेही नीग्रो लोकांच्या असह्य वेदनांना मुक्तीच्या वाटा उघडून दिल्या.म्हणून ती 'मोझेस'.
                                                   टबमन अमेरिकेच्या डॉरचेस्टर परगण्यातील Mary Land मध्ये १८२०या वर्षी जन्माला आली .बाप रिट ग्रीन आणि आई बेन रॉस .दोघेही घनघोर गुलामगिरीत रुतलेले.मालकीण होती मेरी ब्रोडेस .गोरी वतनदारीण ,जमीनदारीण ,लागवडदारीण ,आणि गुलामांची हाडवैरीण!Madison आणि Maryland जवळून वाहते त्या नदीचे नावच पडले 'Black Water' या नदीचा काठ गुलामांच्या रक्त आणि घामात भिजायचा. पाच वर्षांची टबमन एका नर्सच्या हाताखाली तान्ह्या मुलाना सांभाळण्यासाठी नेमलेली.मुले रडू लागली की टबमनच्या पाठीची कातडी काढली जायची.कुठून कुठून चिंध्याचिरगुटे गोळा करून अंगाला लपेटून घ्यायची. एकदा गुदामाजवळून मालकाचे न ऐकता निघून जात होता एक गुलाम.त्याच्या डोक्याचा नेम धरून  मालकाने जड गोळा फेकला.तो लागला टबमनला .डोक्याची कवटी फुटली.मेंदू कायमचा आजारी बनला.फिट्स  यायच्या.बेशुद्ध अवस्थेत छोटी टबमन पडून राहायची.नाही अन्न,नाही दवापाणी !मेंदूच्या दुखण्यातून  टबमनला आकाशातला बाप भेटला.तिला दृष्टांत होऊ लागले.अंधारातून रस्ता दाखवणारा,मानवमुक्तीचे  स्वप्न पेरणारा 'प्रभूचा आवाज'टबमनला जन्माची साथ करीत राहिला.टबमन हाच एक चमत्कार आहे.
                                             अशक्त ,आजारी टबमन काय कामाची ?तिची विक्री करण्याची धडपड सुरू झाली.१८४९ मधील गोष्ट.टबमनने  ठरवले की आपण पळून जायचे.स्वातंत्र्याच्या मुलखात पोचायचे.दोन भावाना घेऊन रात्रीचे  तिने केलेले पलायन फसले .भाऊ कच खाऊन गुलामगिरीत परतले.पळून गेलेल्या गुलामाना  पकडून आणण्यासाठी गुंडांच्या टोळ्या मागे लागत आणि बक्षिसे कमावत.भयंकर शिकारी कुत्री हुंगत हुंगत  झाडाझुडपातून त्तपास करायची. टबमनच्या स्वातंत्र्याच्या ध्यासाने अमेरिकेत एक विलक्षण मुक्तिमार्ग  तयार केला होता.
                                        भूमिगत  रेल्वेचे अचाट जाळे (Underground Railroad). देवकीनंदन कंसाच्या तावडीतून  सोडवण्यासाठी यमुनेने रस्ता खुला केला.यशोदेच्या कुशीत गोपाळाला पोचवले.तसेच गुलामीच्या नरकयातना  भोगणारे गुलाम अभागी जीव याना विशेषतः दक्षिण अमेरिकेतील टेनेसी वगैरे कर्दनकाळ मुलखामधून  लपतछपत ,ओसाड पडक्या घरातून ,गोठ्यातून एका रात्रीचा मुक्काम करत ,अर्धपोटी ,पायाच्या  चिंध्या करीत  कॅनडा देशाच्या मुक्त प्रदेशात पोचवणारी एक अनौपचारिक संघटना होती.तिलाच म्हणायचे 'भूमिगत रेल्वेमार्ग'  काही धनिक,उदारमतवादी गोरे धाडसी नागरिक आपला भक्कम आधारही उभा करायचे.त्याना म्हणत  Quacks. एरवी या शब्दाचा अर्थ आहे दांभिक वैद्य.पण तो शब्द दाम्भिकाविरुध्द उठणारा  असा अर्थगौरव घेऊन उठला.पसार झालेले गुलाम पकडले गेले तर हातपाय तुटणे ,प्रसंगी शिरच्छेद्सुद्धा ! नायगरा धबधबा ,बफेलो शहर ,ईरी कालव्याभवतालचे लॉकपोर्ट  येथेही आजही भूमिगत रेल्वेमार्गाचा  इतिहास बोलला जातो,लिहिला जातो.
                                         या भूमिगत रेलमार्गाने टबमन मुक्तियात्रेला  निघाली.पूर्ण खबरदारीने. Delaware मार्गे  उत्तरेला पेन्सिल्वानिया ,फिलाडेल्फिया  वगैरे गुलामी बेकायदेशीर मानणारा नव्वद मैल दूरवरचा प्रदेश गाठण्यासाठी  टबमनने तीन आठवड्यांची तंगडतोड केली.वाटेत निबिड अंधार.वरून केवळ उत्तरेची  तारका करणार  दिशेचे मार्गदर्शन!चिडीचिप जायचे.पुढेही गप्पच राहायचे.फिलाडेल्फियात टबमन येऊन पोचली.प्रभूचा बळकट  हात पाठीवर होता!
                                             आता कुटुंबीय ,परिवार आणि गुलामीत खितपत पडणारा नीग्रो माणूस याना स्वातन्त्र्याचा  प्रकाश भेटवायचा होता.पेनसिल्वानिया,फिलाडेल्फिया वगैरे गुलामी बेकायदेशीर मानणारा  प्रदेशही  '१८५०चा फरारी गुलामांच्या अटकेचा कायदा'उगारून ऊग्र झाला.फरारी नीग्रो गुलाम पकडून देणे हे सरकारी अधिकारीपदाचे  कर्तव्य ठरले.अंधार गडद झाला.टबमनची हिम्मत खचली नाही.
                                         सतत अकरा वर्षे टबमन वारंवार Marylandच्या भागात येत राहिली.तेरा मोहिमामधून  तिने ७०गुलामाना मुक्तिधाम मिळवून दिले.विलक्षण व्यवहारचातुर्य अंगी!धैर्य अपार!!.हातात पिस्तुलही  असायचे.गुंडांच्या टोळ्या,शिकारी कुत्री यांच्यासाठी ते पिस्तुल होते.कचखाऊ गुलामाना प्रसंगी प्राणांची  भीती घालून टबमनने कॅनडात पोचविले.जॉन ब्राऊन  या सशस्त्र क्रांतिकारक मानवताभक्ताच्या बाजूने टबमन उभी राहिली.जॉन ब्राऊन रण हरला.फासावर चढला.
                                       नागरी युद्धात  उतरली रणरागिणी !
                      गुलामीच्या प्रश्नातूनच  अमेरिकेत नागरी युद्ध पेटले.दक्षिणेकडील राज्ये गुलामगिरीची कडवी समर्थक होती. अमेरिकेची एकात्म संघराज्याची मागणी अब्राहम लिंकनच्या नेतृत्वाखाली झालेली होती.गुलामीच्या  निर्मूलनाला कटिबद्ध झालेल्या अब्राहम युनियन आघाडीच्या बाजूने ताठ उभी राहिली टबमन !पोर्ट रॉयल येथे शुश्रूषा केंद्रात सेवाभावी काम करू लागली.युद्धहेर  म्हणून तिचा वावर असायचा.भुयारी मार्गांनी  टबमन सर्वत्र फिरलेली होती.नागरी युद्धात रणांगणी वावरणारी टबमन ही  पहिलीच स्त्री! कुम्बी नदीवरील हल्ल्यात टबमनच्या सहभागाने सातशेहून अधिक गुलामांची मुक्तता साधली.नागरीयुद्ध नागरी स्वातंत्र्याच्या  बाजूनेच संपले.टबमन शांतपणे Auburnला  एका छोट्या गावातील छोट्या निवासात परतली.
                        पण छळ  संपला नव्हता.नागरी युद्ध लढून रेल्वेने न्यूयॉर्कला परत जात होती रणरागिणी!पण उन्मत्त  रेल्वे कंडक्टरने  तिच्या दंडाला धरून तिला बाजूच्या भंगार डब्यात फेकून दिले.हाड मोडले.युद्धकाळात  तिला  नियमित पगारही मिळायचा नाही. १८९९पर्यंत पेन्शनचा सुद्धा पत्ता नव्हता.निग्रोद्वेष  रोमारोमात भिनलेली  गोरी माणसे सर्वत्र असायची.
                          Auburnला इवलेसे स्वतःचे घर होते.निर्वाहाला पैसे कुठून आणणार ?आयुष्यभर कफल्लक!मग टबमन हलकीसलकी कामे करू लागली.दोन संभावितानी सोन्याच्या लगडीचे आमिष दाखवून उसने  पैसे उभे करायला टबमनला लावले.टबमनने उधारउसनवार केली.पैसे लुबाडून ,टबमनला बेशुद्ध होईपर्यंत  मारझोड करून संभावित पळून गेले.संध्याछाया उतरू लागल्या.टबमनने स्त्री-पुरुष समानतेचे व्रत घेतले.परिषदांना  जायचे तर रेल्वेला पैसे नसायचे.एकदा आपली गाय विकून तिकिटाला पैसे उभे केले.पण हातपाय  गाळले नाहीत.
                     आपले घर चर्चला टबमनने देऊन टाकले."निर्धन काळ्या वृद्धाना राहायला जागा द्या"ही अटही चर्चने  मानली नाही.१९११मध्ये टबमनचे थकलेले शरीर विश्रामधामात ठेवले."एका व्याधिग्रस्त आणि कफल्लक  टबमनला मदत करा"हे वृत्तपत्रांचे पब्लिकला आवाहन!
                  न्यूमोनियाने ग्रासले. काही मित्र आणि कुटुंबीय यांच्या साक्षीने १० मार्च १९१३ रोजी टबमनने प्रभूच्या मुक्तिधामाचा  रस्ता धरला! "मी तुमच्याकरिता एक जागा मोकळी करून जात आहे"हे शेवटचे शब्द होते!  १० मार्च १९१३ रोजी टबमन गेली.म्हणजे १० मार्च २०१२पासून तिची पुण्याशताब्दी सुरु झाली आहे.
                                            येथे कर माझे जुळती!
             पानवाला.

Sunday, December 9, 2012

एसटीची रंगभूमी!

महाराष्ट्रातील परिवहन मंडळाने एसटी गाडयांच्या  माध्यमातून एक अभूतपूर्व संपर्कपर्व  घडवून आणले आहे.एक सामाजिक ,राजकीय,सांस्कृतिक अभिसरण आंदोलन उभे केले आहे.याची विचारवंतानी ,लेखकांनी फारशी दखल घेतलेली आढळत नाही.आज एसटी गाडया म्हणजे जणू देहातील मज्जासंस्था वा नससंस्था बनल्या आहेत.देहातील लक्षावधी पेशी जाणिवांचे दळणवळण  घडवतात.मेंदूकडे वार्ता पुरवतात.मेंदूचे संदेश गात्राना सांगतात.देहाचे स्वास्थ्य ,अस्वास्थ्य माणसाला कळत  राहते.महाराष्ट्रातील सर्व माणूसवस्त्या बहुतांशी एसटीने जोडल्यात.माणसे एकमेकाना जोडलीत.भेटवली  आहेत.उपजीविकांच्या जागा त्याना दाखवल्या आहेत.तिकडे नेले आहे.परत आणले आहे.पाठीवरची ओझी उतरून घेतलीत.यामधून कितीतरी आनंद ,धन्यता ,दुःख -दैन्य  सांगत कथा खुल्या होतात.कथा,कादंबरी,नाटक याना कथानके उपलब्ध झालीत.
                  एसटी गाडी ही  गरिबांचे प्रवाससाधन आहे. साहजिकच एसटी रंगभूमी ही  श्रमिक ,कष्टकरी ,गरीब माणसाची लोकरंगभूमी आहे.घरोघरी भरपूर स्वास्थ्य ,खुळखुळाट असणारी माणसे आज दारी दोन किंवा तीन चारचाकी वाहने बाळगून आहेत.आरामशीर,प्रचंड भाडेदर असणारी गाडी लीलया अंगाखाली घेऊन गुबगुबीत माणसे सहली,मौजमजा करायला जातात.वातानुकूल खाजगी शयनगृहे घेऊन चक्रवर्ती अप्सरा धावतात.श्रीमंतापरी गरिबा कोठे दरवळ तो सुखवितो?कच्चीबच्ची ,थाळी-चिरगुट यांच्यासह बाहेर पडतात त्याना महाराष्ट्रात फक्त एसटी गाड्यांच  कुशीत घेतात."जेथे जेथे काबाडकष्टी -तेथे तेथे धावे एष्टी "हे गरिबाचे वाहन एसटी रंगभूमीने नित्य  न्याहाळून घेतले पाहिजे.त्यामधून स्वतःची नाटके रंगभूमीला मिळतील.विषयानुसार सादरीकरणाचे आकृतिबंध (Forms)उभे करावे लागतील.रंगभूमी नित्य परिवर्तनशील ,लवचिक असते.साहित्य स्वतःचा आकृतिबंध घेऊन जन्माला येते.यासाठी एसटी श्रमिक रंगभूमीने (तिला लोकनागर रंगभूमी असेही म्हणता येईल.)एकूण लोकरंगभूमीशी गहिरे नाते जोडावे.भावना,आवेग त्यांच्या पायाखालच्या मातीची भाषा बोलतात.पूर्वीचे वग  वाचावेत.जात्यावरच्या ओव्या ऐकाव्यात.श्रावणातल्या कथा समजून घ्याव्यात.आठवडी बाजारातील घासाघीस ऐकावी.फुक्कट चौकश्या करून चालू लागलेल्या इष्टुरफाकड्याकडे  बघत पाटीवाली म्हणते "खिशात न्हाई आना  आणि म्हने पाटील म्हना !" याने एकूण मराठी रंगभूमीचाच  कायापालट होईल.
                          आज मला एसटी नावाचा जो लोकजागर दिसतोय,ऐकायला येतोय ,वृत्तपत्रातून पोचतोय त्याच्या  आधारे मराठी नाटकासाठी दोन आग्रही विषय  मला जाणवत आहेत.
                 १. कालचक्र सतत फिरते तसे महाराष्ट्राचे  दैनंदिन जीवनचक्र एसटीच्या रूपाने सतत फिरत आहे.एसटी बंद  की  महाराष्ट्रही एकदम बंद होतो.हे ध्यानात घेऊन सारे आंदोलक महाराष्ट्र बंद पाडण्यासाठी एसटी गाड्या  प्रथम बंद पाडतात.आंदोलक लगोलग बसेस फोडतात,तोडतात ,आगी लावतात.गेल्या काही महिन्यात  किती एसटी गाड्या जाळून टाकल्यात याचा हिशेब करावा.कुचंबलेली ,भ्यालेली,होरपळलेली अश्राप  माणसे डोळ्यासमोर आणावीत.महाराष्ट्रातील ही  एक सार्वजनिक शोकांतिका वरील सर्व हिंसक घटनांच्या  संवेदनशील,सूक्ष्म ,साक्षेपी ,निःस्पृह विश्लेषणातून एसटी रंगभूमीला "अग्निदाह ","अग्निदिव्य" किंवा "दाह"नावाचे ताकदीचे नाटक देऊ शकते.
                      २.एसटी कर्मचारीही श्रमिक वर्गातील आहेत.येथे पेशा महत्त्वाचा .जात ही  महत्त्वाची नाही.
     शारीरिक कष्ट करणारा बसचालक (ड्रायव्हर )हा घटक एक उदाहरण आहे.या चालकाचे गाडी चालवणे,दुरुस्त करणे, एकाग्रचित्त राहणे,मुक्काम करणे, आसरा-अन्न,संसारापासून सतत दूर राहणे,बायकापोरांची  काळजी,मुख्य म्हणजे शारीरिक आरोग्य हा विलक्षण अस्वस्थ करणारा विषय आहे.वाहनचालकाच्या  आरोग्यविषयक समस्यांचा गंभीरपणे विचार आयुर्वेदाचार्य श्री.बालाजी तांबे यांनी नुकताच  दै.सकाळच्या आरोग्य पुरवणीमधून मांडला आहे. तर या चक्रधरांच्या संसार कथा नाटकाना आशय पुरवतील. एसटी कर्मचारी कलाकार,कथाकार म्हणूनही प्रवेश करतील.पहाडी आवाजात पोवाडे ऐकवणारा एक कंडक्टर मला मिरज-बोरीवली  बसमध्ये भेटला होता.आजरा -पंढरपूर बसमध्ये माणुसकीचा गहिवर आणून सगळ्या  प्रवाशाना सांभाळत नेणारा कंडक्टर मी देखिला .बसची पंढरी झाली.या विठोबाला आणाना  रंगभूमीवर!
                         कला क्रीडा क्षेत्रात स्पर्धा घुमू लागल्यात. तिथेही जागतिकीकरण येते आहे.जागतिक पातळीवरची सुवर्ण, रजत पदके मोह घालीत आहेत.लोककलांचे श्वास घुसमटत आहेत.मातीशी नाते तुटत आहे.आईचे दूध  बाटलीत भरले जात आहे.अखिल भारतीय मेळाव्यात आमचे डफ ,झांज,तुणतुणे शहरी सोंग बनले.स्वयं  नादब्रह्मात गुंगून जाणारा जो  खग त्याला पक्षीप्रदर्शनात कंठ फुटत नाही.नाटक हे कलाकार व प्रेक्षक यांनी एकमेकाना भेटणे आहे. लोककलांमध्ये प्रेक्षकसुद्धा रंगभूमीचा एक भाग असतात.नाटक म्हणजे आपण आपल्याला  पाहणे असते. दाखवणे  कमी असते.स्पर्धा या चुरस,द्वेष, संशय वाढवतात.तडजोडी करायला लावतात.मग नाटकावरचे लक्ष उडते.कलाकाराना चिंब होता येत नाही.म्हणून स्पर्धांच्या आहारी जाणे नको. नाटकाने स्वतःची रबरी गादीवरची कबड्डी होऊ देऊ नये!महाभारतापासून कबड्डी हा सामूहिक व्यायामप्रकार  ठरला आहे. अभिमन्यू,अर्जुन कबड्डीपटू होते.कबड्डीचा सूर हा प्राणायाम आहे.शिवरायांनी मल्लखांबासारख्या व्यायामप्रकाराना खास प्रोत्साहन दिले.मातीतली कबड्डी गावोगावी आणली.गावाच्या वेशीवर मारुतीचे देऊळ आणि गावात तालीम आली की सशक्त तरुण वर्ग गावाचे रक्षण करू शकतो.रामदासाना  ही  दृष्टी होती.कबड्डी रबरी गादीवर वर मर्यादित झाली  तर छोट्या छोट्या तालमीनी काय करावे?क्रीडा संस्थांनी महागडी रबरी  गाद्या  कोठून आणाव्यात ?कबड्डी, नाटक हे बहुजनांचे जगणे आहे.तो एक जागर आहे.या दृष्टीने  स्पर्धा जरूर  करावी पण ती स्वतःशी!आपणच आपणाला सतत मागे टाकत जावे.नाटक हा प्रयोग असतो. आवृत्ती काढणे नसते.प्रत्येक प्रयोगात नाटक कलाकारांना नव्याने कळत जाते.स्पर्धांच्या जल्लोषात नाटकांचे  हे प्रयोगपण हरवणार नाही,हे आपण जरूर जरूर पाहिले पाहिजे!
 पानवाला !