Monday, November 5, 2012

कभी अलविदा ना कहना!

माणूस सतत माणसाच्या शोधात असतो.त्याला मित्र हवा असतो.संकटी धावून येतो म्हणून तो मित्र नव्हे.उपाशी मित्राला भरले ताट देणे,सणासुदीला नवीन कपड्यांच्या  घड्या उशापायथ्याशी आणून ठेवणे हा मदतीचा हात झाला.परोपकारातून मैत्री जुळत नाही.द्रौपदीला कृष्ण वस्त्रे पुरवत राहिला.त्याला द्वारकेची बाजारपेठ दाखवायची नव्हती.कृष्ण द्रौपदीचा सखा होता.त्याचे काळीज द्रौपदीच्या आभाळफाटल्या स्थितीने स्वतःच विवस्त्र होऊ पाहत होते.द्रौपदीचे मन तो जाणत होता.तिची हैराणी त्याला पुरती उमगली होती.त्याचे आणि द्रौपदीचे दुःख वेगळे नव्हतेच.एकमेकाना कडकडून भेटणे ,अंतरीचे धागे वस्त्राप्रमाणे घट्ट विणणे हे घडते तेथे मैत्री जुळते.यालाच सामाजिक मानसशास्त्र Social penetration-आतून एकमेकात भरून राहणे ,असे म्हणते.कुणीतरी मला आरपार जाणलंय,मला समजून घेतलय ,माझ्या गुणांबरोबर माझ्या दोषांचाही प्रेमाने स्वीकार केलाय,अशी अंतरी घट्ट गाठ बसली की माणसे प्रसंगी बेशक  धाडधाड भांडतात .अबोला धरतात.प्रचंड संतापाने आपल्या घरच्या कपबशांचा सेट फोडतात आणि दुसरे दिवशी नवीन सेट घेऊन मित्राच्या दारी उभी राहतात.मी आहे तस्सा मला जवळ करणारा कुणीतरी मला हवा असतो.ही काळजाची भूक अन्नाच्या भुकेपेक्षाही मोठी असते.मग मान,प्रतिष्ठा .मतमतांतरे काहीकाही आड येत नाहीत.पु.भा.भावे आणि ग.दि.माडगुळकर वेगळ्या झेंड्यांची माणसे होती.पण एकमेकावाचून त्याना चैन पडायचे नाही.गप्पा मारून एकमेकाना आपापल्या घरी पोचवत राहायचे.एके दिवशी उभयतांचे कडाक्याचे भांडण झाले.भावे तरातरा घरी गेले.दुसरे दिवशी तेच भावे निमूटपणे माडगुळकर यांच्या अंगणात तुळशीवृंदावनापाशी उभे राहिले.आण्णा माडगुळकरसुद्धा खाली मान घालून समोर उभे!भावे पुटपुटले ,"काल माझे चुकले बांडुंगबुवा!"(भावे-माडगुळकर एकमेकाना नव्या नव्या टोप्या घालायचे)माडगुळकर खालच्या सुरात म्हणाले,"मी तरी काही   कमी गाढवपणा केला नाही". एवढे म्हणायचा अवकाश ,दोघांनी शड्डू ठोकून कुस्तीचा पवित्रा घेतला.दुरून माडगुळकर यांची आई भरल्या डोळ्यांनी आशीर्वादपूर्वक हसत होती. रामाला कुणी जिवलग मित्र नव्हता.कृष्ण मात्र जगाचा सखा होता.म्हणून कृष्ण ज्याचा त्याचा मित्र ठरतो.लोकगंगेत कृष्ण      नाचतो.त्याच्या पाठीवर थाप मारून कुणालाही त्याच्याशी बोलता येते.सुदाम्याला पोह्यांची पुरचुंडी घेऊन त्याच्याकडे  जावेसे वाटले.
                                       हातचे राखून मैत्री होत नाही. अंतःकरणाचा कौल घ्यायचा असतो.भौगोलिक अंतर पडले  तरी आंतरिक नाते सुकत नाही. 'मित्र कसे मिळवावेत आणि त्यांच्यावर प्रभाव कसा टाकावा?'यावर पुस्तके आहेत. पण पोथ्या वाचून कोणी आजवर कुणावर जीवापाड प्रेम केलेले नाही. माझा सावंतवाडीचा परममित्र  रमेश चिटणीस आनंदमार्गाचा पराकोटीचा भक्त.पण मला कधीही दीक्षा द्यायला पाणी घेऊन नाही आला. कवटीनाच त्याच्या मार्गात होता म्हणे!मला कधी दिसला नाही.आनंदमार्गावर त्याने भाषणे ठेवली.आपण बोलला. एकदा मी भरसभेत त्याची टिंगलटवाळी केली."काखेतले आणि नाकातले केस काढायचे नाहीत म्हणे! कलकत्त्याला जाऊन आनंदमूर्तींकडून वेताच्या छड्या अंगभर खायच्या म्हणे!काय रे तुमचा हा आनंदमार्ग ?"मी म्हणालो.पण मित्र रागावला नाही.समारोपात माझ्याकडे वळून म्हणाला "माझ्याकडे बटाटेवडा  नव्हता म्हणून!नाहीतर याच्या तोंडात कोंबून त्याचे भाषण बंद पाडले असते!"कलकत्त्याच्या बाबांच्या  छड्या खाऊन परत येताना माझ्यासाठी मित्राने रसगुल्ले आणले.आमच्यात गैरसमजाला वावच नव्हता. मी सावंतवाडी सोडून सांगलीस कायमचा  परतण्याचा निर्णय  घेतला.माझ्याकडे मित्राने डोळ्याचे डोह करून  खूप वेळ पाहिले.स्वस्थ राहिला.घायकुतीला आला नाही.निरोप घेऊन दूर गेल्याने मैत्रीला गंज येत नाही. खलिल जिब्रान यांचा प्रेषित (Prophet)सांगतो-"तुमचा जिवलग मित्र तुमच्यापासून दूर अंतरी जातो तेव्हा  शोक करायचा नाही.उलट तुमचे त्याच्यातील ज्या गुणावर अतिशय प्रेम आहे त्या प्रेमगाभ्याचे स्वरूप तुम्हाला विरहातच  अधिक स्पष्ट दिसू लागते.पर्वतारोहण करणारा जो त्याला तो पर्वत तळातल्या सपाट मुलखातूनच चांगला स्पष्ट आणि एकसंध दिसतो!शब्दावाचुन   कळते सारे शब्दांच्या पलिकडले !
                                                    मैत्रीचे गणित नसते.कुणाशी किती  काळात,कोणत्या प्रसंगात मैत्री जुळेल याचा  मंत्र नाही.ती एक ईश्वरी देणगी आहे.तुमचे भाग्य आहे. प्रसन्नता बाळगल्याचा तो प्रसाद आहे.राजाराम महाविद्यालयात  तात्पुरत्या नेमणुकीने मी आलो होतो.पुढची खात्री नव्हती.सरकारी महाविद्यालय!त्यामुळे नेमणुकीनंतर  पगाराचा आदेशकागद कचेरीत कधी पोचणार  याची हमी नाही. पैशावाचून कसा राहणार?संसाराला  लागलो होतो.कोणी तसा ओळखीचा नव्हतां.माझ्या चेहरा पाहून माझी चिंता एका तरुण गोखले- बापट यासारख्या आडनावाच्या प्राध्यापकाने जाणली.मी मित्रप्रेम शोधतो हे त्या देवदत्त मित्राने ताडले असणार.तो माझ्याकडे आला. त्याचा पगार नुकताच झाला होता.पगाराचे अख्खे पाकीट त्याने माझ्या हातात दिले. खांद्यावर हात ठेवला."तुझा पगार होईल तेव्हा रक्कम परत कर.संसाराची काळजी घे!"एवढेच बोलून तो निघून गेला. मी नंतर पैसे परत केले.मित्राने कधीही वाच्यता केली नाही.आज तो कुठे आहे ते मला ठाऊक नाही.या मित्राला मी कसा विसरू?
                                                     परवाच मला अचानक एक फोन आला.चाळीस वर्षांपूर्वीच्या माझ्या  कॉलेज मित्राने दणकेबाज आवाजाने जणू माझे कान धरले!"भाव्या,साल्या मला विसरलास?इथे माझ्या शेतातल्या ओल्या शेंगा तुझी आठवण काढून वाळून जाताहेत.तुझा पत्ता नाही.पंढरपूरला ये.मी तिथे  आहे  .
चंद्रभागेच्या वाळूत बसू..एकमेकाच्या अंगावर पाणी उडवू.शेंगा खाऊ"मला आता गोपाळ  देशमुखाची मूर्ती लख्ख दिसू लागली.कॉलेजच्या होस्टेलवर तो राहायचा.गावाहून शेंगांचे टिक्के म्हणजेच मोठे बोचके आणलेले असायचे. मी गोपाळाला  कॉटवरून उठवायचो आणि खुर्चीवर अभ्यासाला बसवायचो .आणि मग त्याच्या
कॉटवर बसून मनसोक्त शेंगा खायचो.गोपाळ प्राध्यापकांचा लाडका होता.या ना त्या समितीवर जायचा.मी म्हणायचो,"गोप्या एकदिवस तू त्या मास्तरची पोरगी पळवणार बघ ."गोप्या म्हणायचा ,"तेवढे मला  जमत नाही रे !तुला नक्की जमेल. तू अस कर.मी दाखवतो त्या मुलीवर लाईन मार!प्रेम जमव .पुरेसे प्रेम जमले की ते माझ्या  खात्यावर ट्रान्स्फर कर .शेंगा देईन खायला!" हा गोपाळ मला येथून असां बन्सीधर  दिसतोय .त्याला येथूनच मिठी मारू की  प्रत्यक्ष  भेटायला जाऊ?याचा विचार करतोय.त्यावेळचा गोपाळ मला भेटेल का?
                                                   आता पंढरी कुठली?मित्र जगभर विखुरलेत.पण त्यांनी मैत्रीचा हात उबदारपणे  जवळ केलाय.वीस पंचवीस वर्षांपूर्वी दहावीच्या वर्गातून शिकून हायस्कूलमधून बाहेर  पडलेली मुले  आणि मुली मेळावा ठरवतात.त्यांच्याकडे मोबाईल नंबर्स असतात.अमेरिकेतून मुलगा भारतात येतो.कोकणातल्या  शाळेत मित्र मैत्रिणीना भरल्या डोळ्यांनी भेटतो.गप्पा करतो.गाणी म्हणतो.समूहाचां फोटो  काळजाशी धरून रुद्ध कंठाने अमेरिकेच्या उद्योगाला परततो .काळीज झाडावर असते.उड्या  जगभर चालू राहतात.शाळेत असताना मुलींना मित्रांशी मोकळेपणाने बोलता यायचे नाही.आता त्या संसारी असतात.मैत्री आता  खळखळून निकोपपणे बोलू लागते.चार दिवसांसाठी मुलगा सातासमुद्रापलीकडून येतो.भराभरा गावातले  शाळकरी मित्र गोळा होतात .गप्पा,जेवण,आईस्क्रीम यांनी रातराणीचा गंध दरवळून जातो!कुठे संपते मैत्री? मैत्रीला अंत नाही.आपला अंत झाला तरी आपले गुण  चिरंजीव झालेले असतात.मित्रांनी त्यांना खोल  कप्प्यात जपलेले असते.लाँगफेलोची कविता सांगते--"मी एक बाण जोराने हवेत सोडला--कुठे पडला ते दिसले नाही  मी एक आर्त गाणे हवेत फेकले--कुठे गेले कळले नाही!  दिवस उलटला आणि बाण झाडाच्या खोडात रुतलेला  आढळला .आणि गाणे मात्र मला मित्राच्या काळजातून ऐकू येऊ लागले "
                                  मित्रांनी कधीही एकमेकांची रजा घ्यायची नाही..अलविदा म्हणायचे नाही .
                           दर्द जितना सह जाये उतना सहना
                            दिलको लग जाये वो बात न कहना
                            मिलते  है हमारे दोस्त बहोत कम
                            इस लिये कभी अलविदा ना कहना  !
   पानवाला
                                        

1 comment:

  1. रामाचा आदर्श असावा व कृष्णासारखा सखा असावा.आणि आपल्यासारखे,चिटणिससरांसारखे गुरु जन्मोजन्मी मिळावेत. ओगले.

    ReplyDelete