Sunday, September 23, 2012

बाप्पा मोरया ,यावे ताराया !

          विठूरायाला उराउरी भेटायला माणसे पंढरीला जातात. गणरायाला मात्र  कडेखांद्यावरून नाचत बागडत घरी आणतात. विठूरायाची वारी तशी गणरायाची सुद्धा वारीच! वारे घेऊन वारी निघते. विठूराया आणि गणराया हे दोघेही उंच पिकातून डोलत असतात. पेरणीचा हंगाम आणि सुगीचा हंगाम विठूरायाच्या भेटीला नेतो. श्रावणाने राने हिरवी हिरवी गार केलेली असतात. ही फुललेली राने वने पर्णसंभार घेऊन गणरायाला भेटायला येतात. गणपती बसतो त्यावेळी त्याला मधुमालती, माका, बेल, धोत्रा, आघाडा, पिंपळ, जाई, केवडा सारे सारे येतात भेटायला! कोकणात माटव नावाची चौकट असते गणरायापुढ़े! त्यावर नारळ, बेडे तर असतातच पण त्याहीपेक्षा लडिवाळपणे येतात ती हरणे नावाची नाजुक पिवळी पिवळी गवतफुले! हिरव्या हिरव्या गवत पानासह! कोकणात पूर्वी पिवळी, लाल रंगाची मातीही मिळायची. रंगीत मातीतून गणराया प्रकट व्हायचा. हिरवा रंग हवा ना? कारल्याची हिरवीचार पाने पायरीवर वरवंटा घेऊन वाटायची. वाटीत रस भरायचा. भिंतीवरील चित्रामध्ये, गणरायाच्या गात्रावर हरितसृष्टी खुलायची. रानातून, मातीतून गणराया येणार. विसर्जन जलप्रवाहात! गणपतीचे नाते भूमीशी, मातीत राबतात त्या दोन्ही हातांशी, गाळला जातो त्या घामाशी!! पार्वतीने अंगावरील मळ थोपटून गणेशबालक जन्माला घातले. घामावर मातीचा थर जमतो तेव्हा मळ तयार होतो. गणपतीचा उल्लेख गणपती अथर्वशीर्षामध्ये व्रातपती असा येतो. नमः व्रातपतये । व्रात म्हणजे अंगमेहनतीने उदरनिर्वाह करणारा समुदाय! भूमी पिकवणारे, घाम गाळणारे. या श्रमवीरांचा म्हणजे व्रातीनांचा प्रमुख तो गणपतीराया!

                  विठोबा आणि गणोबा  हे अवतार नव्हेत. त्यांची जीवनगाथा नसते. ते नित्य असणे, सर्वत्र वसणे आहे. उराउरी भेटणे आहे. श्रमाला नित्य भेटतात ते विठोबा आणि   गणोबा! खेड्यात बघा, पुरुष माणसे एकमेकाना बहुधा विठोबा आणि गणोबा असे हाकारतात. मारुतराया, विठूराया आणि गणूराया ही लोकप्रतिभेतून उत्पन्न झालेली विलक्षण महाकाव्ये आहेत. ती मिथके -Myths आहेत. किती त्यांची दर्शने म्हणावीत? मूर्तीकार, चित्रकार, कवी यांना गणोबा - विठोबा म्हणजे एक अखंड प्रेरणा आहे. अरुण दाभोळकरानी गणरायाची हजारो विविध दर्शने  कुंचल्यातून साकारली आहेत. विठुराया - गणरायाचे अद्वैत अरुण दाभोळकर यांच्या प्रतिभेला खुणावू लागले आणि मग विठू-गणरायाचे विलक्षण रंग रेखावतरण झाले. विठू म्हणून ध्यान कटीवर हात ठेवून उभे तर त्या ध्यानाचे मस्तक आहे गणरायाचे. नीलवर्णी मुख .डोळे खोल चिंतनात उतरलेले - जणू डोहच! सोंडेला शेवटी पीळ घातलेला. मस्तकावर अर्धचंद्राकृती अरुणरंगी  चन्दन लेपी तृतीय नेत्र! कुंचल्याची पूजाच करावी!! भारतीय मनाला सुचलेले गणपती हे जे भावप्रतिक आहे, जी एक archetypal मिथक निर्मितीची प्रतिभाशक्ती आहे, ती  आपण सतत समजून घ्यावी असा आग्रह प्रा .रा .ग .जाधव यानी धरला आहे.

                      सीता ही भूमिकन्या. गणपती हा भूमिपुत्र. पाण्यात डुम्बणारा. नदीत उतरलेला हत्ती बाहेर यायला बघत नाही. उत्सवमूर्ती म्हणून पाण्यातच विसर्जन होते. भूमीवरील सकल जगण्यावर, अंकुरण्यावर आभाळमाया पांघरत येणारा गणराया मग विघ्नकर्ता का असावा? गणपती मूळचा विघ्नकर्ता मग त्याच्या सोंडेला बिलगून, त्याच्या पायघडया उरावर घेऊन त्याला विघ्नहर्ता बनविला. गणेश पुराणात कथा आहे. पार्वतीने गुणेश  नावाच्या पुत्राला जन्म दिला. शिवाने त्याला वैनायक नावाच्या गणांचे आधिपत्य देऊन जगावर विघ्न आणायला मोकाट सोडला. विघ्नकर्ता हा त्याचा मूळ स्वभाव. विघ्नहर्ता ही माणसाने केलेली प्रार्थना!

                     आपल्याच दैवताची विघ्नकर्ता म्हणून  पूजा करणारा, त्याचे दर्शन घेणारा आणखी कुठला मानव समूह जगात नसावा.  देव जर विश्वनिर्माता आहे, विश्वचालक आहे, आणि विश्वसंहारकही आहे, तर माणसाला  भोगाव्या लागतात त्या आपत्ती, क्लेश, फरफट, उपासमार, पारतंत्र्य त्यानेच आणले असणार हे उघड  आहे की नाही? विघ्ने तर येतातच. शोक, निराशा, हताशा यांचे अस्तित्व कुणी नाकारलेले नाही.  सारे क्षणिक आहे. शोकपूर्ण आहे. असे भगवान् बुद्ध सांगत फिरले. उपाय सांगत  राहिले. ' सुख पाहता जवापाड़े - दु:ख पर्वताएवढे ' असे तुकोबा सांगत होतेच की! जगभरची धर्म संस्थापक मंडळी माणसातूनच  फिरली. विव्हळ माणसाच्या जगण्यावर उपाय शोधायला निघाली. भ्रमण करीत निघालेल्या समर्थांचा जीव सैरभैर झाला. विवेकानंद स्वामींचा प्रवास हाल, यातना यांचे त्याना दर्शन घडवणारा होता. 'बुडती जन न देखवे डोळा ' म्हणूनच कळ सोसणारे थोर आपल्या जगण्याचे रान करीत राहतात.  इतरांच्या जगण्याचे ओझे हलके करतात. आपली गोड  गोड गाणी शोकाची विराणी असतात. शेवटी दु:ख म्हणजे तरी काय? आपल्या धडपडीला, इच्छा वासनांना, सुखाच्या निवासाला, पोटभर खाण्याला, निवांत लोळण्याला सुरुंग लागणे म्हणजे दु:ख ना? शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापना करू देणे म्हणजे औरंगजेबावर विघ्ने आणणे  होते की नाही? आपल्याला हवे ते मिळत नाही म्हटले की माणसाला संकटे आल्यासारखे वाटते.

                       तरीपण हे बाप्पा गणराया, जे अन्यायी आहेत, शोषक आहेत त्यांच्यावर तू जरुर  संकटे आण. पण पापभीरू, सज्जन जीवांना, हे विघ्नहर्त्या,  तू विघ्ने आणून का बरे छळतोस? सारे कोकण गणरायाच्या उपासनेत गढ़लेले आहे. गणरायाच्या भक्तिसागराला तेथे उधाण येते. मग त्याच दक्षिण कोकणात तू रानातून, गावातून, केळीच्या लागवडीतून रानटी हत्तींची फ़ौज का म्हणून सोडलीस? असेच पिसाळलेले सत्यानाशी रानटी हत्ती सर्व भारतभर राजकारणात, उद्योगकांडात, शिक्षण खाणीत का म्हणून घुसवलेस? खाणीतला कोळसा स्विस बँका भरायला का पाठवत आहेस? श्रीखंड, आम्रखंड सोडून तू ज्याला त्याला भूखण्ड का म्हणून खायला  घालतोस? सतत रस्ते खोदून रस्त्यांची बारमाही शेती तूच सांगितलीस ना? दलितांच्या स्त्रियांना विवस्त्र करून  त्यांच्या मातृत्वाची अशी विटंबना तुला बघवते कशी? दुष्काळ पडून माणसे मरतात. कसाबाला कोट्यवधी  रुपयांचा मलिदा मिळतो. सहकारमहर्षी, शिक्षणसम्राट, धोतर फिटलेले पुढारी लक्षावधी रुपयांच्या वाढदिवस पुरवण्या काढतात. खदा खदा हसत राहतात. तुला कसे चालते हे?

                      यावर गणरायाचे  उत्तर ऐका! सुख, चैनीने माणसाला गुंगी येते. दारूची झिंग चढते. माणसे गटारीत लोळत राहतात. दारुची झिंग उतरायची तर  दु:ख यातना यांचा उतारा हवाच. दु:ख माणसाला जागृत, सतर्क, क्रियाशील बनवते. रानात तण  मी वाढवतो कारण मग शेतकरी ते तण जाळतो. काटेकुटे नष्ट करतो. ढेकूळ  दगड फोडतो. नांगर मारतो. त्यातून शेती फुलते. मीच जपानला भूकंपाचे धक्के दिले. सारे बरबाद करून  टाकले. पण त्या विघ्नातून जपानी माणसाचा पुरुषार्थ जागा झाला. पूर्वीपेक्षा समर्थ, सुंदर जपान उभा करायला सज्ज  झाला. कष्टाच्या जपानेच जपान देश मोठा झाला. हे जगणे माझ्या विघ्नकर्तेपणाचे एक वरदान आहे.

                   मी विघ्ने आणतो  कारण संकटानेच माणसे एकत्र येतात. संकट माणसाना आणते निकट!मग ती संकटाशी  सामना करतात. नव्या जीवनाची स्वप्ने पाहतात. कळ येणे म्हणजे कळणे आणि वळ उठणे म्हणजे वळणे. असे असते माणसाचे कळवळणे. संकटे माणसाला संकुचितपणातून, कोंझेपणातून बाहेर काढतात. आपल्या जगण्याचा सतत विचार करू लागतात. 'एकमेका सहाय्य करू -अवघे धरु सुपंथ' हे विघ्नकर्ता  मी तुम्हाला आवाहन करीत असतो. "एका आम्रतरूतळी' काय झाले?तुफान वादळ, विजांचा कडकडाट, भुई थरथरणे  रानभर उठले. एक भक्कम विशाल आम्रवृक्ष होता. त्या आम्रवृक्षाखाली हरिण, वाघ, सिंह, लांडगे, ससे, कोल्हे सारे निमूटपणे, शांतपणे एकत्र आले. विघ्नाला तोंड देवू लागले.

                        बाप्पा! आम्ही दक्ष राहू.  संकटप्रसंगी ठाम उभे राहू. पण विघ्नानी हद्द ओलांडली आहे!दैत्य तुझीच सोंड कापून टाकण्याच्या ताकदीचे आग्यावेताळ  झालेत रे! परशू घेऊन ये. जगावर जरुर विघ्ने आण . .आग  ओत. पण हे सारे संहारकार्य तिमिरासुरांचे कर. दुष्टांचा विघ्नकर्ता हो! सुष्टांचा विघ्नहर्ता हो!!

             पानवाला .

No comments:

Post a Comment