Friday, September 14, 2012

निदान पश्चात्ताप तरी हवा!

माणूस आजवर चुकतमाकतच जगत आलाय. मेंदूच्या ज्या मर्यादा त्या माणसाच्या आकलनाच्याही मर्यादा. मग काय झाले? सुख शोधत जाताना आपणच काही अन्याय, यातना निर्माण केल्या. या जगी सर्वात सुंदर आहे ते माणसाचे मन आणि सर्वात कुरूप आहे तेही माणसाचे मनच. भव्य, देखण्या व प्रचंड वास्तू मानवी प्रतिभेची उत्तुंग भरारी दाखवतात. पण प्रत्येक चिरा-वेठबिगारांचे अश्रू, घाम-रक्त यांचे गळणे, पाठफोडू फटके ऐकवत राहतात. स्वातंत्र्यामागे बलिदाने असतात. साम्राज्यामागे शोषण, लूटमार असते. नीग्रो गुलाम आणि रेड इंडियन यांच्या शोषण आणि कत्तलीमधून अमेरिकेची श्रीमंती उभी राहिली आहे.
          
मुद्दा असा की आपण चुका करीत आलो आहोत. जातपात, उच्च -नीच भाव, जवळचा-दूरचा, शत्रू-मित्रभाव या गोष्टी जीवन बकाल करीत आले. माणसातली आई, बाबा, भाऊ, लेकरु, सखासोबती आपणास नेहमीच नाही ओळखू येत! कारण आपण पुरेशा प्रमाणात आपणावरच डोळे नाही रोखत. आपणच आपले बंधू आणि आपणच आपले शत्रू आहोत हे श्रीकृष्ण बजावत असतो.

चुका करणे माणसाच्या रचनेतच आहे. चुकांची जाणीव ठेवणे. त्या पुन्हा होऊ न देणे - प्रसंगी कबुली देणे हे गंगास्नान आहे. पश्चात्ताप, प्रायश्चित्त, कबूली (Confessions) हे धर्ममार्ग अशा अर्थाने की ते माणसाला कात टाकायला लावतात. काही प्रमाणात पश्चात्तापाची, आत्मचिंतनाची, आत्मसुधारणेची ही तळमळ आज मला सर्वत्र दिसतेय का? मला समाज नावाची वस्तू  तरी दिसतेय का?

दूरदर्शनवर आज मराठीतून दोन मालिका चालू  आहेत. अंतर्मुख व्हावे अशा योग्यतेच्या! महादेव गोविन्द रानडे आणि त्यांची रमाबाई यांच्या जीवनावर "उंच माझा झोका" ही मालिका आणि विखेपाटील खानदानाच्या मिशाउगारु जगण्यावर मारझोड दाखवणारी नारीछळ मालिका! दोन्ही तुलना करण्यासारख्या आहेत. न्यायमूर्ती रानडे यांचा काल -- स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाही. पुनर्विवाह, संपत्तीत वाटा  नाही. समान हक्क नाही. विकासाला वाव नाही. ही सनातनी कुबट आणि घुसमट करणारी मालिका पाहताना ब्राह्मण वर्ग अपराधी मनाने, पश्चात्तापाने  वरमलेला असतो. तिकडे विखे  पाटील दरडावून, मुस्कटात मारून, दंडुका वापरून सुनांना, मुलींना, पशूप्रमाणे छळतात, थोर कूळ आणि अस्सल रक्त सांगतात ते पाहून पश्चात्तापाने होरपळणे किती प्रमाणात घडते याचे उत्तर ज्याचे त्यानी मनाशी द्यावे. दलित स्त्रियावरील बलात्कार, घरेदारे जाळणे, जमिनी हिसकावून घेणे वगैरे अपप्रकारातील  बहुजनसमाजाचा मोठा सहभाग मान्य करुन मन खंतावते का? ब्राम्हणेतर चळवळी बद्दल केशवराव जेधे लिहितात "ब्राम्हणेतर चळवळीत राष्ट्रीय वृत्तीला  काही वाव नव्हता. बारा वर्षे मी या चळवळीत काढली पण देशाची सेवा करतो असे मला कधीही वाटले  नाही". माधवराव बागल खंत व्यक्त करतात "आज अस्पृश्यावरचे अन्याय  ब्राम्हण समाजाकडून होत नाहीत. पण आपणच मनुस्मृतीचे पुनर्जीवन करीत आहोत" (भारतीय प्रबोधन ग्रंथ पृष्ठ क्रमांक 221). पश्चात्तापाची  अशी भावना आहे आज कुठे? ब्राम्हण पुरुष कापून काढा. स्त्रियाना भोगा --असा ग्रंथ प्रसिद्ध करणारा  महामराठा पुढारी किती लोकांना पश्चात्ताप आणि शरम वाटायला लावतो?

"पालावरचे  जिणे"  हे गिरीश प्रभुणे यांचे भडभडून आणणारे पुस्तक वाचा. पारधी स्त्रियांचे जीणे  पारधी पुरुषांनीच कसे असह्य करून  सोडलय. मग भटक्या, दलित पुढारलेल्या स्त्री पुरुषांना  अपराधी वाटायला  नको काय? वाटते का तसे?  "आमच्याशी रोटीबेटी व्यवहार करा "असे म्हणणारे लक्ष्मण माने. त्यांची बायको ब्राम्हण  कुटुंबातील! तिचे सासरी स्वागत कसे झाले? बायका म्हणाल्या "लक्ष्मणाच्या +++ कड़े बघून ही या घरात  आली आहे" हे स्वागत लक्ष्मण माने याना शरम आणते का? निगरगट्टपणा पाहून निराश झालेले ना .ग  .गोरे लिहितात "राष्ट्रीय उत्थापनाची आशा बाळगण्याची हिम्मत माझ्या ठिकाणी नाही" (भारतीय प्रबोधन).

" देशाची फाळणी" ही काळजाला  घरे पाडणारी दुर्घटना नाही का? पण कोणालाही पश्चात्ताप वाटत  नाही. पु. भा. भावे  जळत जळत मरुन गेले. "हिंदू मूळचे भ्याड तर मुसलमान गुंड प्रवृत्तीचे" हे मत ठाम पणे सांगणारे गांधीजी मग मुसलमानांच्या नैतिक, शैक्षणिक सुधारणेकडे, त्यांच्या आधुनिकीकरण प्रक्रियेकडे  एवढे सुद्धा ध्यान का देत नाहीत? त्याना गुंड आणि उन्मत्त का राहू दिले? मुसलमानांच्या उद्धाराविषयी  गांधीजीना काही आस्था का म्हणून नव्हती? वाईट वाटायला नको? बलात्कारित हिन्दू स्त्रियांना गांधीजी  म्हणाले "जीभ चावा आणि मरा! आत्महत्त्या करा!!" ज्यू लोकानी सामूहिक आत्महत्त्या करावी  म्हणजे  हिटलरची जगभर निंदा होईल" हे गांधीजी सांगत  होते . याबद्दल काही पश्चात्ताप?

आक्रमक, पिसाटधर्मी वृत्तीच्या लोकांना सुसंस्कृत, राष्ट्रीय वृत्तीचे करण्यासाठी काहीच न  करावे असे व्रत घेणारे गांधीजी अन्त्योदयाची कल्पना मांडतात. ती  मग कशी साकारणार? "एका दिशेचा शोध" घेणारे संदीप वासलेकर याना वाटते की  महात्माजींची अन्त्योदय ही कल्पना आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची  भौतिक शास्त्राविषयीची  निष्ठा यांचे मीलन करून आपल्या देशातील लोक समाधानी, आनंदी होणे  शक्य होते. मग सावरकर का मानवले नाहीत? गांधीजीनी  त्यांचे का ऐकले नाही? आणि आता वासलेकराना  काश्मिरात दहशतवादी तरुण भेटला. वासलेकराना म्हणाला "आमचा मार्ग चुकीचा आहे . मान्य! पण आमची कोंडी झाली आहे. तुमचा मार्ग कोणता? ते  सांगा ना?" गांधीजी कोणता मार्ग सांगणार होते?

आता काय करणार? निदान पश्चात्ताप तरी वाटू दे ना? अपयशाची जबाबदारी जे स्वीकारत नाहीत, त्यांना यशातही  भागीदार होता येत नाही. आणि पुढील उन्नतीतही  ते स्वावलंबी होत नाहीत.

पानवाला.

Sunday, September 2, 2012

अरेरे कैनडा विट्ठलू पोचलाच नाही पैलथडी !

कानडा  विट्ठलू  टोरन्टोला उतरु पाहत होता. रुक्मिणीचा त्याला सतत आग्रह! "भक्त थोर ते गेले निघुनी| गेला महिमा तव नामाचा। रहायचे मग इथे कशाला?" देवाला कसला प्रॉब्लेम? सारे देव आकाशमार्गे उडत जातात. तुकोबा विमानाने उडाला. दुसरा भिंत उडवत होता. रामाकडे तर पुष्पक विमान, सारे महामंडळ टोरंटोला अलगद पोचले असते.  या विमान तिकिटाच्या लफड्यात आमचा कैनडा विट्ठलू साहित्यिकू ना. धो. महानोर राहिला की नाही इथेच अजंठा  वेरुळच्या गुंफांमध्येच!  तिकडे टोरन्टो मध्ये भाषण कोण गुंफणार? माइक मिळेल का हो माइक? मंच मिळेल का हो मंच असे गणपतराव बेलवलकर  यांच्या आवाजात महानोरानी म्हणावे का हो? भीमरूपी महारुद्रा एवढे म्हटले असते तरी मारुतीरायाने नाधो आणि राधा याना टोरंटोच्या देवधरे यांच्या समोर उभे करुन  "देवधरे या देवाला धरा बरे" असे म्हटले नसते का? महानोर यांच्या सारखा द्रष्टा कवी जायलाच हवा होता.  पंढरपूर येथे चंद्रभागा तर टोरंटो भवती ईरी सारख्या अथांग सरोवरांचा पसारा. नायगारा धबधब्याला त्यांचे धो धो पाणी. महानोराना उधाण  आले असते की हो! शिवाय याच भूमीने नीग्रो गुलाम जीवाना मुक्तीचा श्वास घेऊ दिला होता. मराठीला तिथे Harriet Tubman भेटली असती.  दलित लेखकानाच नव्हे तर आपणा सर्वाना तेथे बाबासाहेब भेटले असते.

                       मराठी सारस्वताला अमेरिकेच्या आधी जी भूमी भेटली ती Canada हीच! येथेच एकता नावाचे मासिक निघते. अमेरिकेतील मराठी माणसानी लिहिलेल्या मराठी कथांचा संग्रह याच मायमराठी वाल्या लेकरानी प्रकाशित केला. त्यांच्या एकता मासिकात, एरवीच्या पाक्षिकातसुद्धा मराठी मजकुरात एक जरी इंग्रजी शब्द आला तरी अमेरिकन मराठी माणूस आकांत करतो! आणि महामंडल दल दल प्रदेशी पहा! मराठी नाटकांची नावे इंग्रजीत, पुस्तकांची शीर्षके इंग्रजीत, पहिला Science Fiction वर मराठी चित्रपट येतोय! नाव आहे -Welcome to the jungle! कविता तर मड्डम झाली आहे. ओळीपण इंग्रजीत! म्हणजे इंग्लिश झाली बरबाद! स्वत्वाला त्यजुनी गुलाम बनती ते शंख वा शिंपल्या! आता वीणा वादिनी जाते परदेशात!

                             मला कधीच वाटले नव्हते की साहित्यिक अचानक सावरकरांचे ऐकतील आणि लेखणी मोडून बंदूक हाती घेतील म्हणून! गोरा परका हाकलायचा तर बंदूक ठीक पण मराठी माणूस गोरे लोकांच्या देशात नेताना बंदूक कशाला? टोरंटो ला झाशीची राणी  इकडे सुद्धा लक्ष्मीबाई! येऊ तर सारे  नाही तर एकही नाही. वराढ़ निघाले टोरंटोला! मागे पानिपतला मराठे वीर गेले लढायला नाना फडणीस यांची आई गेली तीर्थयात्रेला! मराठी आई  बिचारी ओशाळ वाणी  उभी राहिली!

अमेरिकेतील मराठी माणसाना उद्देशून प्रा रा. ग. जाधव यानी ह्युस्टन च्या स्नेह या वार्षिक अंकात आवाहन केले होते "ही अमेरिकेतील मराठीप्रेमी माणसे म्हणजे दोन भिन्न संस्कृती मधील संपर्क वाहिन्या आहेत. भाषिक तथा  कलासाहित्यातील गुणवत्ता यांची ओळख करून घेणे व दोन भिन्न सांस्कृतिक समाजातील योग्य आदान प्रदान  सुरु करणे हे या संपर्क वाहिन्यांचे काम आहे. प्रथम आपण मराठी भाषा, साहित्य, कला,  प्रथा यांची नीट  माहिती घ्या. अमेरिकेतील भाषा संस्कृती यांची गुणवत्ता जाणा. एक तौलनिक दृष्टी कमवा ती  महाराष्ट्राला द्या. अमेरिकन भाषासंस्कृति पहा. आपली भाषासंस्कृति त्याना समजावून द्या".  तेथील दलितत्व जाणून घ्या.  आपले दलित साहित्य परिचित करा. संवाद घडवा.  एकत्र बसा आणि संवाद घडवा. नुसते पुसी मांजरी  बनू नका! "दुरिताचे तिमिर जावो" हा संदेश विश्व साहित्य सम्मेलनातून जावा हा केवढा व्यापक, मुक्तिदायक  विचार आहे! साहित्य सम्मेलन आयोजकांना, पगडीधारकांना  दे रे सद्बुद्धि माझ्या Canada विट्ठलू साहित्यिका!

पानवाला.

Friday, February 18, 2011

आई न घरी न दारी!

 आईला मारून तिचे काळीज आपल्या प्रेयसीला द्यायला धावत निघालेल्या मुलाची कथा सानेगुरुजीना सुचली.ठेच लागून खाली पडलेल्या मुलाला आईच्या काळजाने "बाळ, लागले का रे तुला?"असे काळजीने विचारलेले गुरुजीनी ऐकले.कवी यशवंतानी तिन्ही जगाचा स्वामी आईविना भिकारी आहे, असे सांगून कित्येकान्च्या डोळ्याला पाणी आणले.या आईचे महात्म्य किती किती प्रकारानी जगभरच्या माणसानी गावे हो?विंदा करंदीकर यानी तर सत्ययुगाच्या अखेरची एक गोष्टच कवितेत आणली.ते म्हणाले" सत्ययुगाच्या अखेरीस प्रेम आणि द्वेष यांच्यात लढाई झाली.द्वेष विजयी झाला आणि प्रेम आईच्या हृदयी लपून बसले."आई आपल्या मैत्रिणीच्या मुलालाही अंगावर पाजते.मैत्रिणीला पान्हा फुटत नाही म्हणून!राजस्थानच्या विष्णोई जमातीचे साऱ्या चराचर सृष्टीवर प्रेम.आईविना पोरक्या झालेल्या तान्ह्या हरीणपाडसाला स्तनपान देणारी विष्णोई माता मी फोटोत पाहिली.मूल घाबरले की 'बाप रे!'असे म्हणते.वेदनानी कासावीस झाले की 'आई ग!' म्हणते.बाप कथित असतो.आई एक तथ्य असते.Mother is a fact. Father is a fiction.शुक्रपेशी फलित झाली की बापाचा सम्बन्ध संपला,असे एका कथालेखकाने म्हटले आहे.गे आई,थोर तुझे उपकार!
                    यशवंतांच्या नंतर मराठीतील आई कुठे गेली?असा प्रश्न कुसुमाग्रजाना पडला.मलाही वाटू लागते की कुठे जाते ही आई काही काही वेळा?सांगली महापालिकेने नुकताच झोपड़पट्टी हटाव कार्यक्रम घाव घालत राबवला.झोपड्या उडवून लावल्या. सामान रस्त्यावर फेकले.झोपडी उध्वस्त!संतप्त! शिव्या,दगडफेक  हे समजता येते.पण एका मातेने काय करावे?तिनेआपले दोन वर्षांचे मूल कडेवरून उचलले आणि दाणदिशी दगडावर आपटले.मुलाने डोळे फिरवले .बेशुद्ध झाले.रक्ताने भिजले.सुरक्षा दलातल्या दोन तरुण स्त्रिया पुढे आल्या मुलाला उचलले.औषधपाणी केले.त्या पोलिस बाईनी तान्ह्याला उचलले.सख्ख्या आईने आपटले.मुलाची ती आई तेव्हा कुठे गेली असेल हो?प्रश्न आपण  जिवंत राहण्याचा असेल तर माणसाना कठोर व्हावे लागते हे मला ठावूक आहे. कित्येक वन्य जमाती अन्नाला महाग झाल्या,वैराण वाळवंटी वा बर्फमय प्रदेशातून कित्येक महिने हाय हाय करीत जावे लागणार म्हटले की म्हातारी माणसे बिनदिक्कत मारून टाकावी लागतात ,हे मी वाचलेआहे.पण आजच पेपरात मी वाचले की आईचे बापाशी नाते तुटले आणि कुठे तरी नवीन जमले.आई मग उठली.मोका साधला.आठ वर्षांच्या आपल्याच मुलीचे नाक आणि तोंड दाबून धरले.भल्या पहाटेच्या अंधारात ती आई लेकीचे प्रेत कुठेतरी फेकायला निघाली.लोकांना दिसली आणि फसली.
                                            सानेगुरूजी या आईला काय म्हणणार?त्याना कधी ही आई दिसलीच नव्हती.माकडीण नाकातोंडात पाणी जाऊ लागले की पिल्लाला आपल्या पायाखाली घेते. ही माणसाने लिहिलेली कथा आहे.पण परवाच डिस्कव्हरी वाहिनीवर पाहिले की मरून पडलेल्या आपल्या पिल्लाजवल माकडमाता शोकाने जाते.त्याला नाना प्रकारे तपासते.परिवाराला बोलावते .सर्वजण येतात. पिल्लाची बारीक पाहणी करतात.माता मग ज़रा दूर जाते.डोळे पंजाने पुसत राहते.दुष्काळ पडणार.खायला कमी असणार .लेकरानी जगावे म्हणून वानरी झाडाच्या ढोलीत ,धान्य आणि फळजाती चावून चावून बनवलेले लाडू    ठेवते आणि मग नरमादी दोघेही लाकडाच्या खोडावर प्राण सोडतात.मारुती चितमपल्ली यानीच हे लिहिलय!माणसाची मादी मग काही वेळा आपल्याच पिलांचा प्राण का घेते?तिचे स्तन्य पार आटून का जाते?
                                                मला सरोगेट आईबद्दल आज तरी काही म्हणायचे नाही.पण सरेंडर -Surrender-आईचे मात्र काही कळत नाहीसे होते आहे.चार दोन वर्षांच्या कराराने तरुण तरुणी एकत्र येऊ पाहत आहेत.ती नर आणि मादी म्हणून राहतात.बाप आणि आई म्हणून नाही.सोविएत रशियाचा मार्ग ठीक होता.मुले सरकारने आपले धन म्हणून वाढ करायला न्यावीत.पुढे श्रमिक शक्ति हाताशी येते.आता गर्भाशय जिथे विकायला बाजारात येते,तिथे मूल ही क्रयवस्तू बनणार हे निश्चित!पण बैंड  लावून ,भटजी बोलावून ,पंक्ती उठवून ,मंगलाष्टक म्हणून ,अग्निसाक्ष विवाह होतात.मधुचंद्र धुंद होतो.ट्याहा होते.आजोबा आजी डोळ्यातून निरांजने दाखवतात.पुढे रान सुकते.विवाहाला तडा जातो. मग भटजी जोड़ी बदलून मंत्राला आणतात.सप्तपदी पुन्हा एकदा साता जन्मांची आण घेऊन येते.आधीचे मूल मात्र कोठेतरी लांब भेदरून,गुदमरून उभे राहते.बन्सीधराला आई मिळते तर बाप परागंदा होतो.बाप जवळ तर आई नव्या संसाराला लागलेली.बन्सीधराने  आता कोठे जावे?श्री.म.माटे यानी लिहिलेली कथा आठवत राहते.परवा दोन डोहाळजेवणप्रकार पहायला मिळाले.कुठे बारशांचे थाट उडालेले ऐकले.अंगाई गीते म्हटली गेली."कित्ती क्यूट आहे बाळ!"म्हणून कौतुक करीत पोक्त मंडळी गोड तोंडाने घरी परतली.पहिल्या लग्नाची मुले भेदरल्या ,हरवल्या डोळ्यानी कुठेतरी एकाकी जगत होती.त्याना आता कोण जवळ घेणार?आईची माया त्याना कुठून मिळणार? मला खरच प्रश्न पडतो .पहिली आई दुसरे आईपण भोगायला बोहल्यावर चढते.डोहाळ जेवण उखाणे घेऊन सजवते.जुनी आई नव्या बापाला घेऊन नव्या संसारात नव्या मुलाच्या कौतुकाला लागते ,तेव्हा तिला पहिल्या मुलाची एवढीतरी आठवण येत असेल का?मला बापाबद्दल काही प्रश्न विचारायचे नाहीतच.शुक्रबीजाच्या फलनापासून त्याचा सम्बंधच तुटलेला असतो.पण आईचे काय? एका मुला-मुलीची आई नव्या गर्भाधानाची नवलाई मिरवत राहते,तेव्हा तिच्या आधीच्या लेकराच्या डोळ्यातले आसू काही म्हणजे काहीसुद्धा तिला दिसत नसतील का?
                                                          घटस्फोट कोर्टात सहीशिक्क्यानी पक्के होतात.पोटगी म्हणून बाईला रक्कम मिळते.मुलाच्या शिक्षणासाठी,पोषणखर्च म्हणूनसुद्धा पैसे मागितले जातात."मरू दे तिकडे ब्याद" म्हणून पैसे फेकले जातात.पण परित्यक्त आईनेच दुसरा घरोबा केला तर मुलाला कोण शिकवणार?कोण त्याला ठेवून घेणार?आजोबा आणि आजीच  वृद्धाश्रमात गेले तर?
                                  माझ्या दारी सकाळच्या कोवळ्या उन्हात एक गोड चेहरा असणारा गुबगुबीत मुलगा काखेला रामदासी झोळी लावून 'जय जय रघुवीर समर्थ'पुकारत आला.मुलगा वात्सल्य जागे करणारा होता.चेहरा कोमल ,बालसुलभ भाव सांगणारा.नरसोबावाडीतून आलो म्हणाला.तेथेही कुठूनतरी आलेला.आईबाप आठवायचे.देवाच्या हवाली केले म्हणाला.वाडीला ओवरीत राहतो ,भिक्षा मागतो.अन्न छत्रात जेवतो.लोक कपडे देतात.मला हुंदका फुटला.मुलगा मात्र स्थिर चेहरा घेऊन उभा.त्याला खाऊ घातले.नवे धोतर दिले.पैसे दिले.पुन्हा ये म्हटले.मुलगा 'जय जय रघुवीर समर्थ'म्हणत पुढे गेला.पुन्हा आला नाही.वाडीत चौकशी केली.उत्तर आले."येथे असा एक चांगल्या घरचा मुलगा आलेला खरा.पण आता कुठे ते ठाऊक नाही.अशी मुले येतच राहतात"या मुलांच्या आया कुठे असतील बरे?जगभर माणसांची गुलामगिरी वाढत आहे.भारतात गरीबी आहे.गरीबी तिथे मुले भारम्भार!"तुमच्या मुलाना कामाला लावतो.शिकवतो"असे सांगून काही पैसेही घेऊन मुले नेली जातात.परदेशात त्यांची विक्री होते.भारतातसुद्धा गुलामांचे जगणे कमी संख्येने नाही.
                                             अरबस्थानात उंटाच्या मानेला बांधलेले मूल जीवाच्या आकांताने ओरडत राहते.ऊंट आवाजाला घाबरून जोराने धावत सुटतो.त्याचा शर्यतीत नंबर लागतो.बक्षीस मिळते.उंटाच्या मानेला बांधलेले मूल कोणत्या आईने पाठवलेले असेल?त्याची आई त्यावेळी कोठे असेल?ती कुणाच्या दारी आणि कुणाच्या घरी संसार करीत असेल बरे?
    पानवाला.

Monday, February 7, 2011

कविता वेचत जाणारा एक वेडा चकोर!

मला कधीतरी अचानक पंचवीस पैशांचे कार्ड पोस्टातून येते. पत्ता लिहिण्याच्या बाजूला भारत सरकारच्या कल्याण मंत्रालयाचा गुलाबी छापील संदेश असतो. मागील कोऱ्या बाजूवर मात्र वेड्यावाकड्या ओळीमधून शब्दांची उभी आडवी पाखरेच पाखरे असतात. एका वेड्या कविताप्रेमी जीवाने चोच भरून जमा केलेल्या कविता माझ्यापुढे मांडलेल्या असतात. खिडकीसमोरच्या फांदीवर नाचरा पक्षी शेपटीचा पंखा फुलारून कधी बसेल याची खात्री नसते. मात्र तो आला की चोच इकडे तिकडे फिरवेल, मानेचा नखरा दाखवेल. तालात काय नाचेल. तसाच हा कलंदर कविता-संकलक आपल्या उरावरच्या रेघा किती किती प्रकारे मला दाखवेल याची आधी दाद लागत नाही. तो तशी दाद लागू देणारही नाही. पण दाद मागत मात्र राहणार. या भन्नाट माणसाने प्रथमच मला लिहिले होते ,"काव्याला दोन गोष्टी मारक ठरतात. एक-जाण नसते त्याची मिळत राहणारी दाद आणि दोन-जाणकाराचे मौन! तुम्ही मौन सोडले आहे ना?"

या लोकविलक्षण कवितावेड्याच्या एका पायावरून आणि उजव्या हातावरून वारे गेले आहे. पण डाव्या हातात संचार भरलाय. असे वारे गेले म्हणून काय झाले? कवितेचा श्वास वारा अंगभर घुमतोय ना? बोलणे कमी. बघणे हेच बोलणे. डोळे सदोदित कविता शोधणारे. कुणाकुणाला कविता धाडत राहणारे. फायलीच फायली अवती भवती. त्यात कविता गरम गरम श्वास टाकत असतात. या कविता त्याने कुठून आणल्या? कुण्या कवीच्या त्या आहेत?कधी त्या भेटल्या? हे असले कधीही त्याला विचारायचे नाही. भुंगा पुढे आला तर त्याला कुणी विचारते का  की बाबा तू कोण, कोणत्या फुलामधून मध जमा केलास म्हणून? त्याला तरी ते सांगता येणार का? तो काय म्हणेल? तो म्हणेल,"मधुकर माझे नाव असे. जिथे जिथे रसगंध उमलती तिथे तिथे मम गाव वसे!" या कवितावेड्या संकलकाने पहिल्याच पत्रात मला लिहिले होते-"मी पाठवलेल्या कविता हा माझा आनंदाचा ठेवा आहे.या कवितामधून मी आई वडीलाना शोधत असतो. ते मला दिसतात. संग्रहित कवितामधून आपल्याला झाडे, चिमणी पाखरे, शेत एवढी प्रकर्षाने भेटतील. कृपया यांचे कवी कोण एवढे विचारू नका. मी लिहीत नाही." "मी लिहीत नाही म्हणजे मी कविता लिहिणारा नाही", की "याबाबत मी काही लिहिणार नाही" या संदिग्धतेचा मीही कधी बाऊ केलेला नाही. आयुष्याचे शेत, आई-वडिलांची झाडे आणि फांद्या-फुलांचा निवारा करणारी जिवाची पाखरे एवढा संदर्भ मला पुरेसा आहे. पाखरू आयुष्याच्या संध्यासमयी काळजात कविता जपून आहे हेसुद्धा मला ठाउक आहे. मला पाखराचे पंख मोजायचे नाहीत. त्याच्या उरातली कविता वाचायची आहे.

कविता हे खरोखरीच वेड आहे. मग हे वेड कसे आणि का बरे लागत असावे? कविता ही तरी काय चीज आहे? लिहिली म्हणून ती कविता असते का? गायले गेले म्हणून गीत गाणे बनते काय? उच्चारला गेला तरच तो शब्द असतो का? तसे असेल तर मग आत्मसंवादच गेला. 'शब्दाविन संवादिजे'असे माऊली  का बरे म्हणाली असेल? तरीसुद्धा शब्द हवाच असतो. शब्दांच्या पलीकडे जे काही असते ते सांगायलासुद्धा शब्दानाच यावे लागते. शब्द हे साक्षात ब्रह्म आहे.कविता म्हणजे तुम्हाला सांगतो, एक यड ताक आहे.कविता हा माणसाचा श्वासवारा आहे. माणूस जन्माला येतो आणि मग त्याला श्वास मिळतो हे खरे नाही. श्वासवाराच माणसाच्या रूपाने आईच्या उदरात, घरट्या मधील पिलासारखे ऊर वरखाली करीत राहतो. मग बाहेर येतो. श्वासवाराच डोळे उघडतो. त्याला गंध भेटतो. रसवेदन खुलवते. श्वासवाराच नादब्रह्माचा अवतार! असा हा श्वासवारा मग जीवाला ऊन, पाऊस, नाजुक पाऊले आणि कठोर रपाटे यांची विलक्षण दुनिया दाखवत राहतो. कविता माणसाला उपरी नसते. ती त्याच्या रक्तात, हृदयाच्या ठोक्यात असते. 'सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे. प्रीतिसारिकेचे गीत तियेचे ऐकावे कानी - आणि मग बनवावे मन धुंद रंगुनी काव्यसुधापानी' हे वेड बालकवीना  गुरुजीनी लावले काय? 'स्वयं नाद्ब्रह्मात गुंग  होणारा, शब्दजगताचा चतुर विधाता तो - जगन्मोहन या खगापरी गातो' अशी ग्वाही चंद्रशेखर कवीनी दिलीय ना?

जेव्हा तुम्ही कविता समरसून वाचता, तेव्हा तुम्ही स्वतः कवीच असता. प्रा.रमेश तेंडुलकरानी १९९७च्या अधिष्ठान या दिवाळी अंकात लिहिलय,"एके काळी प्रत्येक आदिमानव हा कवी होता. वस्तूना शब्द देणे  हीच स्फूर्ति होती. एकेकाळी जग कसे ताजेतवाने, गरमगरम, अगदी फ्रेश होते. अशा वेळी बोलणे म्हणजेच कविता करणे. म्हणून तर साहित्याला वाणीमय - वाणीरूप असे म्हणायचे ना? आणि पुन्हा असे की कवींची नावे विचारण्याची आपली परंपरा नाही. लोकगीते कोण लिहिते? ती सर्वांची असतात. रानात सीता प्रसूत होते. कशी? लोकगीत आपणाला सांगते-

                              'एवढ्या वनामंदी कोण रडते ऐका--
                               सीतेला समजाया बोरीबाभली नायिका'

लोकगीत गायले जाते ते ऐकायचे. कुणी लिहिले, उच्चारिले ते विचारायचे नाही. माझा वेडा चकोर कविता संकलक मला कार्डामधून उरीचे उसासे कळवतो.

   'उगवायच म्हटल काहीही तरी--जमिनीसारख मन थोड़े तरी --सुपीक असायला हवे'
   'बकुळी म्हणते सावळ्या रंगान हिरमुसायचे नसते --गुण गंधाने सर्वाना जिंकायचे असते'
   'मी झाडाला चिमण्या पाखरांशी आणि चिमण्या पाखराना झाडांशी बोलताना पाहिलय,
   'आणि मीही माझे एकटेपण जपत--आईला तुलशी रोपाशी बोलताना कैकदा पाहिलय'   
   'सबंध अंगभर दाटीवाटीने फांद्या खोचून घेतल्या--तेव्हा कुठे मी झाडासारखा दिसू लागलो,
   'वेदना रुतल्या नाहीत--फान्द्याना पाने होती, फान्द्याना फुले होती,
    'चिमण्या पाखरांची खूप खूप वाट पाहिली --हात पसरले पण पाखरे काही परतली नाहीत'  

माझ्या वेड्या कवितावेचू मित्राचे शेत कधीच अंधारून गेले आहे मग ----
           "शिवारात आता बैल दिसत न्हाईत --का कुणाची बी --
             माज्या s s राजा, माज्या s s सर्जा  अशी साद येत न्हाई--
             सार शिवार आता मुकं झालय"

असे शिवार मुके होते तेव्हा कविताही मुकी  होते. आणि मग मुकेपण स्वतःच कविता बनते!

- पानवाला.

Sunday, December 5, 2010

कॉमन सेन्सला श्रद्धांजली!

कॉमन सेन्स म्हणजेच व्यावहारिक शहाणपण. ते मेले आहे म्हणून त्याला लंडन टाईम्सने श्रद्धांजली वाहिली होती म्हणे. कित्येक वर्षे हे व्यावहारिक शहाणपण आपल्या संगे जगले होते. इतका काळ आपली साथसंगत केली की ते व्यावहारिक शहाणपण किती वयाचे होते ते सांगता येणार नाही. शिवाय नोकरशाही दफ्तरखान्याने कॉमन सेन्सची फाईल कधीच गहाळ केली आहे. सकाळी लवकर घरट्यातून बाहेर पडणारे पक्षी अधिक भक्ष्य खातात. आपले जगणे नेहमीच न्यायाने चाललेले नसते. कदाचित आपलाच काही दोष असेल. हे व असेच काही धडे त्या शहाणपणाने आपणाला शिकवले होते. कमाईच्या हिशेबाने खर्च करावा. पोराटोरामच्या हाती नव्हे तर प्रौढ पोक्त माणसांच्या स्वाधीन सत्ता करावी. या तत्वाच्या आधारे कॉमन सेन्स जिवंत होता. धर्माचा बाजार झाला. बळी गेलेल्यापेक्षा गुन्हेगारानाच सवलती वारेमाप मिळू लागल्या. तेव्हा कॉमन सेन्सने अंथरुण धरले. दरवडेखोरापासून बचाव करण्याचे स्वातंत्र्य निघून गेले. उलट घरलुटारूच घरमालकावर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करू लागला, तेव्हा कॉमन सेन्सने आपला प्राण सोडला. त्या आधी कॉमन सेन्सचे आई वडील "सत्य आणि विश्वास" मेलेले आहेत. कॉमन सेन्सची बायको "दूरदृष्टी" परलोकी गेली आहे. "जबाबदारी" नावाची मुलगी नजरेसमोर मरण पावली आणि "बुद्धी" नावाच्या पोटच्या मुलाने आपला श्वास थांबवला आहे. कॉमन सेन्सची सावत्र भावंडे कब्जा करुन आहेत. त्यांची नावे अशी--

१. मला माझे हक्क पक्के ठाऊक आहेत.
२. ते मला लगेच मिळाले पाहिजेत.
३. दुसराच कुणीतरी दोषाचा धनी मानावा.
४. सगळ्यानी मिळून माझा बकरा केला आहे.

कॉमन सेन्स मेले याची वार्ताच नसल्याने अगदी मोजकी माणसे मर्तिकाला हजर होती.

थॉमस फ्रीडमन हे अमेरिकेतील भारी विचारवंत पत्रकार आहेत. त्यानी अलीकडेच अमेरिकेत तिसरा शहाणा राजकीय पक्ष पुढे यायला हवा असे आग्रहाने म्हटले आहे. गुंतलेल्या हितासंबंधाना आधार देण्यात रिपब्लिकन आणि डेमोक्रटिक पक्ष पुरते रुतले आहेत. खाजगी गुंतवणदार, नफा-तोटा, निवडून यायचे आणि सत्ता- धन कमावायचे, यातच अडकून पडलेल्या सट्टे बाजारी पक्षाना डच्चू द्यावा आणि देशाला ग्रासून राहिलेल्या संकटामधून बेधड़क बाहेर येण्याची हाक देणारा, जे ऐकायला हवे आहे तेच नेमके ऐकवणारा असा हिम्मतबाज राजकीय पक्ष अमेरिकेला हवा आहे.

वॉशिंग्टन, लिंकन, केनेडी अशी राष्ट्राला सर्वांगानी उठून उभे रहा असा दिव्य मंत्र देणारी माणसे हवीत. आज सारा देश खुज्या माणसांचा झाला आहे. चिनी स्पर्धकांशी अमेरिकन धावपटू स्पर्धा करणार होता. चिनी स्पर्धक म्हणाला,"मीच स्पर्धा जिंकणार" आणि त्यानेच स्पर्धा जिंकली. अमेरिकन धावपटू मोठा बर्गर खात होता. बुदगुल्या धावपटूला धावता कसे येणार? अमेरिकेच्या स्वावलंबी सामर्थ्याबद्दल टिप्पणी वाचा. स्वातंत्र्यामधून समृद्धी येते. सारे मुबलक झाले की माणसे स्वार्थी बनतात. स्वार्थातून आत्मसंतुष्टपणा येतो. जे आत्मसंतुष्ट असतात ते इतराबद्दल उदासीन,बेपर्वा राहतात. ही बेपर्वाई परावलंबनाकडे नेते. परावलंबन म्हणजेच परतंत्र होणे.

मेलेल्या प्राणीदेहावर तुटून पडायला गिधाडे जमावीत तसे भारतात राजकीय पक्ष जमा झालेले आहेत. कुणाला जातीची, कुणाला प्रदेशाची, कुणाला भाषेची, स्विस बँकेतील गुप्त धनाची नखे आणि चोची फुटल्या आहेत. अमेरिकेतील रेड इंडियन जमाती एकमेकांशी लढून नष्ट झाल्या. ज्या उरल्या त्यांच्या जमिनी गेल्या. सत्ता गेली. व्यवसाय गेले. धर्म गेला. त्यांच्यातले काही धनदांडगे बनून नेवाडा राज्यात जुगार महाल खोलून बसले. तसेच भारतातील इंडियन्स करीत आहेत. परस्परांचे लचके तोडावेत, एकमेकाना अडचणीत गाठावे. कशाचेतरी भांडवल करुन निवडणुका जिंकाव्यात. त्यातून सत्ता,पैसा सारे काही! पुन्हा त्यातून इलेक्ट्रोनिक्स नावाच्या महाशक्तीने लबाडी, शोषण याना प्रचंड बळ पुरवले आहे. नेहरू, सावरकर, विवेकानंद, आंबेडकर यांची स्वप्ने, मायभूमीची भक्ती, दीनदलितांची खरी कळकळ, सकलहिताची दृष्टी कुठे आहे? डोके घट्ट बांधून बायकी आवाजात स्फुंदत स्फुंदत पंतप्रधान बोलतात. भर दिवसा आम्हा दिसू लागते रात!

सकल राष्ट्राला सामर्थ्य पुरवणारे नेतृत्व या देशात नाही. एक देश म्हणून जगावे ही इच्छाशक्ति हवी, असा कुठेतरी कॉमन सेन्स जागा होतोसुद्धा. श्री.वसंतराव पळशीकर यानी २००२ मध्ये वर्धा येथे विचारवेध संमेलनात सांगितले,"जागतिकीकरण, उदारीकरण यांच्या आव्हानाना यशस्वीपणे तोंड द्यायचे तर राष्ट्रात ऐक्य हवे. राज्य बलशाली हवे. परिवर्तनवादी आंदोलनाने स्वतःला प्रश्न विचारायला हवा की त्याची राष्ट्रवादी बैठक कोणती? "भारताची इतिहासपरंपरा अमुका तमुकाची आहे. आमची नाही. आम्ही कधी एक समाज, एक लोक नव्हतो. तेव्हा हे राष्ट्र आमचे नाही". असेच म्हणायचे तर राष्ट्रवादाच्या उभारणीसाठी आम्हाला पायाच सापडणार नाही.

कॉमन सेन्स तर आता मेलाय! मग कसे करणार?

पानवाला....

Tuesday, November 30, 2010

म्हातारपण गात्रांना असते. स्वप्नांना नाही!

ज्यांची उपयुक्तता संपते त्यांचे रानातले फक्त तण बनते. तृण सर्वाना हवे असते. तण नकोसे होते. आज म्हातारी माणसे घरोघरी नकोशी होताहेत. ओझी बनताहेत. जेथे अजून मोठी कुटुंबे आहेत, तिथेही संसार अलग होताहेत. म्हातारा म्हातारी झालेल्या माणसाना औषधपाणी कुणी करायचे? तस्त कुणी आणून द्यायचे? 'दुखणाईत हा जळे दिवा -- खोकत खोकत काजळ ओकत - कुबट करी ही दमट हवा'! खाण्याची बडदास्त कशी ठेवायची? गावातल्या गावातही महिनाअखेर बिस्तरा घेऊन दुसरा उंबरा चढ़ावा लागतो. नाहीतर वृद्धाश्रमामध्ये रवानगी! ते तर रुग्णालय! ' 'टोकावाचुन चालू मरणे- ते त्याचे होते जगणे'. ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या बैठकीमधूनही ज्येष्ठाना जगण्याचा मार्ग सापडत नाही. कीर्तने पेंग आणतात. परदेशी मुलांकडे जावे. ग्रीनकार्ड प्रथम. मग परदेशी नागरिकत्व. हा उड्डाणउतारासुद्धा विफलतेच्या घसरतीला लागलेला.

'पैलतीर" नावाचा चित्रपट व्ही.सी. डी.वर बघता येतो. योगेश सोमणने लिहिला. अरुण नलावडे, रमा जोशी यानी Canada मधील ज्येष्ठांचे वृद्धावसान दाखवले. मग 'मातीची चूल' पिक्चर पाहण्याची हिम्मत उरत नाही. तक्रारी त्याच. उबग येणे. हुंदके देणेही तेच. आढ्याकड़े डोळे! अमेरिकेतील वृद्धांसाठी हिरव्या कंच बागांची, श्रीमंत, गरम पाण्याची कुंडे असणारी अलिशान घरे आहेत. महिना खर्च तीन हजार डॉलर्स. अलिशान शीतपेटी, प्रशस्त खड्डा यांचे आगाऊ बुकिंग. अमेरिकेत जन्माला आलेल्या गौरकायाना जन्माच्या क्षणापासून वेगळ्या खोलीत झोपणे, कुमार अवस्था गाठली की अलग निवास, अलग कमाई यांची सवय असते. ' 'माझ्या नशिबाचा मी स्वामी ' म्हणून ही माणसे आपल्या कारमधून वावरतात. सहलीना जातात. पण त्यांच्या डोळ्यातील पार गोठलेपणा लपत नाही. नेवाडा राज्यातून Death Valley कडे म्हणजे मरणाची दरी नावाच्या भयाण मुलुखाकडे रस्ता जातो. मोहावे नावाच्या वैराण प्रदेशातून सारा प्रवास. Death Valley च्या तोंडाशीच एक कोरडे रखरखीत, विशाल कुंपण लागते. आत वापरामधून काढून टाकलेली हजारो विमाने जणू वृद्धाश्रमात टाकलेली आहेत. एकेकाळी आकाशी झेप घेणारी निळ्या स्वप्नांची ही विमाने Death Valley कडे पाहत आता कायमची उभी आहेत. त्याना पाहिले की पोटात खड्डा पडतो. तोही लगेच बुजवायला हवा. नाही तर कुणासाठी तरी वापरला जाईल.

प्रश्न सोपा नाही. निकडीचा मात्र आहे. हा प्रश्न श्रावणबालकाला सोडवता येणार नाही. कावडीत बसलेल्या अंध आई बाबानाच आपली कावड सोडून बाहेर यावे लागेल. काशीयात्रेचे पुण्य जोडायचे म्हणून श्रावणबालकाचे तारुण्य वाया घालवायचे पाप जोडायचे का? याचा विचार श्रावणबालकाच्या आईबाबानी करायला हवा. मुक्या माणसालाही वाचा फुटू शकते. पंगू माणूससुद्धा डोंगर ओलांडून जातो. अंध माणसाच्या गात्राना डोळे लाभू शकतात. दोन्ही पाय गुडघ्यातून गेलेल्या तरुणाने परवा तुफान कसरतीचे नृत्य एका स्पर्धेत हजारोंच्या समोर करुन दाखवले. वृद्धांनी आपण वृद्ध म्हणजे समृद्ध आहोत, या उभारीने 'उठा उठा बांधा कमरा' असे म्हणत खरेच उभे राहिले पाहिजे.

कासवीण बनून तिच्या नजरेने नव्या उमलत्या पिढीकड़े पाहिले पाहिजे. कासवीण दुरून आपल्या पिल्लांकडे मायेने पाहते. पिलांचे रक्षण, पोषण तिच्या नजरेतून होते. पुत्ररूपाने आपण जगायचे, जिवंत राहायचे तर मुला-मुलींच्या फुलत्या, उमलत्या, फोफावत्या संसाराना भरल्या तृप्त डोळ्यानी आशीर्वाद आपण द्यायला हवा. आपली स्वतःची फ़ालतू चिंता नको. स्वतःला विसरा. मुलांची काळजी करा. आपली मुलेसुद्धा प्रौढ़त्वाची पायरी वेगाने पार करीत आहेत. त्यांचेही वार्धक्य त्याना लवकर भीती घालेल, भेटत राहील. त्यानाही संध्याछाया भिववू लागतील. आपणाप्रमाणेच आपल्या मुलानी त्यांच्या मुलांसमोर लाचार, हतबल होता नये. जे तुम्ही आज तुमच्या मुलापुढे म्हणाल, तेच तुमची मुले पुढच्या पिढीपुढे कदाचित मांडतील. खलील जिब्रान यानी एक मार्मिक कथा लिहिलीय. पिकलेली पाने भराभरा खाली पडत होती. आवाज करीत होती. खालचे गवत त्रासले. " "काय ही कटकट?आम्हाला झोपू पण देत नाही तुम्ही?" पिकली पाने रागावली. " "क्षुद्रानो! कधी वर आलात काय? भव्य स्वप्ने पाहिलीत काय?" पुढे खाली पडलेली पानेच गवत झाली. पुढच्या पानझडीच्या समयी झाडावरुन खाली पडलेल्या पानाना नावे ठेवू लागली. हे असे आपल्या बाबतीत व्हायला नको.

स्वतः मधून निसटला त्याला मोक्ष भेटला. आम्ही मुलाना वाढवले. मग आम्हाला नको का त्यानी आधार द्यायला? हा विचार लाजिरवाणा आहे. मुलानी आपल्या आयुष्यात येणे, रांगत रांगत सारे घर सोन्याचे करणे, दफ्तर घेऊन शाळेत जाताना मुले दिसली की आपल्या डोळ्यांची पाखरे होणे-- हे सारे आपले श्वासोच्छ्वास आहेत. मुलांसाठी आपण खाल्लेल्या खस्तांचे बिल शून्य आहे असे आई मुलाच्या उशाशी लिहून ठेवते. आचार्य अत्रे यानी लिहिलेला हा धडा आमच्या पुस्तकात होता.
वृद्धानी समाजाचे धन बनावे. कर्ज बनू नये. जे उपयुक्त आहे, दो हातानी वाटून टाकणारे आहे, त्याकडे माणसे यांचे देणे लागतो अशा नजरेने पाहतात. वन्य जमातीमधले वृद्ध जमातीचे प्रमुख असतात. ते शहाणपण देतात. लढावे कसे? शिकार कशी करावी? औषधे कोणती? एकजूट कशी राखावी? हे सांगून जगणे जागवतात. तरुण पिढी आदर राखून राहते. आज वैद्यकशास्त्राने आयुर्मर्यादा वाढवली. माणसे नको एवढी जगू लागलीत. एकत्र कुटुंबे विसर्जित होताहेत. खेड्यातल्या जुन्या ग्रामव्यवस्था मोडीत निघाल्यात. आजीचा बटवा कुणाला हवा? आजोबानी शिकवावे असे काही उरलेले नाही. एकूण कुटुंब या सामाजिक संस्थेची कामे शाळा, पुस्तके, दवाखाने, लॉजिस, होटेल वगैरे नव्या सोयीनी बळकावली आहेत. आजोबा कोणता इतिहास, कोणता भूगोल सांगणार? त्यानाच टी. व्ही.चा सत्तेचाळीस बटने असणारा रिमोट नातवाकडून समजावून घ्यावा लागतो. नातू संगणक पकडून असतो.

आजोबा, आजी ही माहिती पुरवणारी साधने राहिलेली नाहीत. पण व्यावहारिक समजशक्ति वयाबरोबर वाढायला हवी. वाढत जाते सुद्धा. ७०व्या वर्षी जे आकलन होते ते २५व्या वर्षी आकलनात येत नाही. वय ही वाढ आहे. क्षय नव्हे. मग आता कुटुंबाची जुनी कामे ज्या संस्थांकडे त्या कामांच्या विकासासाठी त्या त्या संस्थांकडे आजोबांनी जायला काय हरकत आहे? कितीतरी सामाजिक कार्ये आत्मीयतेची भुकेली आहेत. संशोधनाच्या दिशा वाट पाहत आहेत. मग असा धरी छंद -जाय तुटोनी हा भवबंध! वार्धक्याची उंची दूरवरचे दाखवते.

बाबा आमटे याना कुठे म्हातारपण छळत राहिले? ग.प्र.प्रधान आपले घर साधना साप्ताहिकाच्या स्वाधीन करून आपण वानप्रस्थी झाले. पण लेखन, कार्यकर्त्याना मार्गदर्शन चालूच ठेवले. गो.नी. दांडेकर गड चढत राहिले. बायको निधन पावली होती. एकुलता कर्ता मुलगा डोळ्यासमोर मरण पावला. एकटे एकटे राहिलेले माधवराव राणे नावाचे संशोधन तपस्वी सिंधुदुर्गातल्या माणगाव ग्रामी टेम्ब्ये स्वामींच्या सावलीखाली पोथ्या पुराणे, इतिहास ग्रंथ, लोककथा अभ्यासत राहिले. वय वर्षे ८४. स्वतःच आमटी भात शिजवून खाणार. तब्येत चांगली .घंटा वाजू लागली. बिस्तरा उचलला.कुडाळशेजारी आपल्या रानातल्या घरात एकटेच राहिले. शांतपणे एक दिवस उगवत्या सूर्याबरोबर आयुष्याच्या समाप्तीला निघून गेले. या माधवाने जगण्याचा अभंग केला.

अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे मी एक जराजर्जर बाई शाळा सुटायच्या सुमारास STOP असा बावटा घेउन रस्त्यात उभी राहिलेली पाहिली. शाळा सुटल्यावर घरी जाणारी चिमुरडी बिनधास्त रस्ता ओलांडून जावीत ही तिच्या जिवाची धडपड होती. मला त्या माऊलीचे पाय धरावेसे वाटले. पण तिच्या हातात माझ्यासाठी STOP हा बावटा होता.
पानवाला

Tuesday, November 23, 2010

ई-बुकांचे डिजिटल वादळ!

विसरा तो जुना घोष, नवी पुस्तके छापा छापा--- -बुकांच्या राशीमधुनी येतो आहे गणपतीबाप्पा! -बुके म्हणजे डिजिटल पुस्तके. त्याना कव्हर नको. छपाई नको. घट्ट बांधणी नको. पाने नकोत. ती उलटणे किंवा दुमडणे नको. पुस्तकातला ताव गेला. (मग तावदारणे कशाला?) काचेवर अक्षरांची चित्रे येणार. काचेवर बोटे फिरवा. हवा तो मजकूर मिळवा. पूर्वी पुस्तकांचे किती ते लाड? पाण्या पासून वाचवा. तेलापासून जपा. ढिले पडू देऊ नका. मग पाण्यात पडूनही तुकोबांचे अभंग तगले कसे? तुकारामांची गाथा हे मराठीतले पहिले ई-बुक असले पाहिजे. कागदावर लेखणीने अक्षरे काढणे म्हणजे साक्षरता नव्हे. आता इंटरनेट साक्षरता आलीय. ती जगभर, शाळाभर, गल्लीभर (आणि गल्लाभर सुद्धा) पसरली आहे. -बुके सर्वाना माहिती पुरवणार.. डिजिटल हे जागतिकीकरण अर्थशास्त्रातच आहे असे नाही तरशब्द आणि त्यांचे अर्थया शास्त्रातही घोंगावत आहे.

हे डिजिटल वारे या आधीच छपाईक्षेत्रात घुसले आहे. संगणकावर मजकूर येतो. त्याच्या प्रती निघतात. कागद मात्र शाबूत. बांधणी चालूच. घडी, सुरळी अगदी सुरक्षित. पण गुटेनबर्गच्या प्रेसची दाबादाबी, छापाछापी कुठे राहिली? चाके फिरतात पण प्रेस नावाचा दाबाचा पट्टा कुठे आहे? मग `प्रेस` ला प्रेस असं का म्हणायचं?  तुम्हाला ठाऊक आहे? पहिली -बुके गुटेनबर्गचे नाव सांगतच १९७१ मध्ये आली. मायकेल हार्ट नावाच्या इसमाने गुटेनबर्ग प्रोजेक्ट तयार केला आणि ई-बुकांची उलाढाल सुरु केली. आपली छपाई उडवली. अक्षरांच्या आकृत्या उमटवल्या म्हणून गुटेनबर्गचा आत्मा कासाविस झाला असेल का? मुळीच नाही. त्याच्या आत्म्याला मुक्तीच मिळाली असणार. गुटेनबर्गने कात टाकली. कात टाकली की फणा काढून पुढे धावता येते. छपाई आली तेव्हा हस्तलिखितांचा, पोथ्यांचा काळ संपला. माहितीचे क्षेत्र खुले झाले. छपाई मधून काहीही छपून राहत नाही. हे ध्यानी आल्यावर मक्तेदारानी काय कमी आरडाओरड केली असेल?

परवा 'हरिश्चंद्राची फैक्टरी ' हा चित्रपट पाहत होतो. चित्रपटाची फिल्म तयार करायची. प्रोजेक्टरमधून पुढील पडद्यावर हालचाल करणारी चित्रे दाखवायची याचा ध्यास घेतलेल्या दादासाहेब फाळके  याना समाजाने         मनोरुग्णालयात नेले. हरिश्चंद्र आणि तारामती यांचे आख्यान नाटकामधून लागत नाही का? मग सरकती चित्रे कशाला हवीत? अशी आरडाओरड दादासाहेब फाळके यांच्या "अयोध्येचा राजा"विरुद्ध रंगभूमीवरील हरिश्चंद्र तारामतीनी सुद्धा केली असणार. आजचे रंगभूमीवरचे नट आणि नट्या नाटकाचा पडदा वर जाण्याआधीच चित्रपटाच्या पडद्यावर पोचलेल्या असतात. अखिल भारतीय, जागतिक अशा पुरस्कारांची धन्यता चित्रपटाना मिळणे हा रंगभूमीचा विस्तार म्हणायचा की विसर समजायचा? थांबला तो संपला---धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे!

आता इलेक्ट्रोनिक नावाचे टॉनिक माध्यमाना मिळाले आहे. संगणकावर ई-मेल आली. ही इलेक्ट्रोनिक डाक क्षणभरात जगभरात धावते. संक्षेपातचि आणतो कथा सारी! ऑरकुट काय, फेसबुक काय - माणसे दूर दूर समुद्राच्या पैलतीरी राहूनही गप्पा मारायला लागलीत. कंपन्यांच्या मोठ मोठ्या बैठका, वाटाघाटी, व्यवहार मोठ्या पडद्यावर येऊन एकमेकांकडे बघत होताहेत. आपापल्या घरट्यात जो तो आपल्या ह्याच्यात. पण दिसतात मात्र सारे एकमेका पुढे कोचात. Future Shocks नावाच्या पुस्तकात भाकित केल्या प्रमाणे माणसे आज मोठ्या प्रमाणावर घरी बसूनच ऑफिसची कामे करताहेत. अर्थात रस्त्यावरची वाहनांची गर्दी हटली नाही. मॉलकड़े माल खरेदीसाठी गाड्या धावतच राहणार. ते असो! पण डिजिटल, संगणक, इंटरनेट वगैरे संचारानी माणसाचे काय काय करुन ठेवले आहे, हे नुसते पाहिले तरी जीव गडबडून आणि गलबलूनही जायला होतय! ग्लोबलायजेशनला कुणीतरी (मला वाटते मीच!) गलबलाय्जेशन असे म्हटले आहेच मुळी!

डिजिटल नावाच्या "भानामतीने" पुस्तक लिहिणे, वाचकांना ते डाउन लोड करुन देणे, लेखकानी ई-बुके लिहिणे, प्रकाशित करणे याबाबत जी काही अजब उलाढाल आणली आहे तिचा मती भानावर ठेऊन पुस्तक जगातल्या माणसानी विचार करायला हवा, म्हणुनच मी डिजिटल विद्येला "भानामती"असे म्हटले आहे. ई-बुके आल्यावर वा येत असताना एकूणच साहित्य या प्रकाराचे वजन, उंची, वाचनाचा मूळ हेतू, साहित्याचे भवितव्य, साहित्य प्रकारांची पडझड वा नवे धुमारे यांच्या बाबत आजतरी साहित्यिक मंडळी काही म्हणजे काही बोलत नाहीत. साहित्यात नवरस आहेत. त्यांच्या मध्ये इंटरनेट वरुन एखादा व्हायरस शिरेल काय याची कुणालाही चिंता का बरे नाही? एकाही मराठी साहित्य संमेलनात ई-बुका बद्दल चर्चा नाही. परिसंवाद सोडाच. मराठी मधील विज्ञान साहित्यालाही मराठी बुजुर्गांच्या हिशेबी फारशी जागा नाही. सायन्सकथांना कोणी विचारत नाही म्हणून हताश होउन  नारायण धारपांनी भय कथा लिहायला घेतली. धारप यानीच हे लिहून ठेवलेआहे. डॉ.बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, डॉ.जयंत नारळीकर अशा विज्ञान साहित्यिकानीच आता मराठीत येत असलेल्या डिजिटल साहित्य प्रकाराबाबत सांगायला हवे.

मराठीत -बुके आलीत म्हणतात. दवबिंदू नावाची मराठी वेबसाईट आहे. नेट भेट नावाच्या मासिक वेब साईट वर एकट्या अनिकेत समुद्र यानी सात बुके लिहिलीत. मराठी ब्लॉग कट्टा वावरत आहे. पण बुके वाचण्यासाठी खास उपकरणे उदा. Apple ची Ipads वगैरे काचेवर बोटे फिरवायची सामग्री लागते. ती ई-मराठी बुकांसाठी येणार का? अमेरिकेत ही सामग्री दिसते. खाजगी वापरातसुद्धा दिसते. मराठीचिये नगरी काय घडणार?

ते काही असो. टाळी द्या मित्रानो! रान मुक्त आहे .पु..देशपांडे यांनीजो जे वांछील तो ते लिहो'' असे म्हणून पिकात गुरे सोडली आहेत. मला पेपरवाले सदरे देत नाहीत, प्रकाशक नाही म्हणतात. काय करावे? कोठे लिहावे?”  अशा वेळी ई-बुक तसेच ब्लॉग कामास येतो. जगी ज्यास कोणी नाही, त्यास ब्लॉग आहे. तिथे जा आणि आपल्या उत्कट भावना विचारांचा निचरा करा. लिहिणे स्वान्त: सुखाय असते ना? मग जा ब्लॉग मध्ये. रिकामा सुतार काहीतरी ताशी --तशी तुमची माझी ही खर्डेघाशी! हलके हलके वाट्ल्याशी कारण!

आणि तसच काही नाही बर का? गुगलवर टिचकी मारा. ब्लॉग लेखांचे ढीग हाती लागतील. वाचणार कोण? लिहिणारा जो कोणी त्याने लिहीत जावे. ब्लॉगवर उमटत यावे. ब्लॉग म्हणजे रामघळी आहे. रामदासानी आपला दासबोध रामगुहेतच लिहिला. पण कधीतरी आलाच की नाही बाहेर?

पानवाला.