“विसरा तो जुना घोष, नवी पुस्तके छापा छापा”--- ई-बुकांच्या राशीमधुनी येतो आहे गणपतीबाप्पा! ई-बुके म्हणजे डिजिटल पुस्तके. त्याना कव्हर नको. छपाई नको. घट्ट बांधणी नको. पाने नकोत. ती उलटणे किंवा दुमडणे नको. पुस्तकातला ताव गेला. (मग तावदारणे कशाला?) काचेवर अक्षरांची चित्रे येणार. काचेवर बोटे फिरवा. हवा तो मजकूर मिळवा. पूर्वी पुस्तकांचे किती ते लाड? पाण्या पासून वाचवा. तेलापासून जपा. ढिले पडू देऊ नका. मग पाण्यात पडूनही तुकोबांचे अभंग तगले कसे? तुकारामांची गाथा हे मराठीतले पहिले ई-बुक असले पाहिजे. कागदावर लेखणीने अक्षरे काढणे म्हणजे साक्षरता नव्हे. आता इंटरनेट साक्षरता आलीय. ती जगभर, शाळाभर, गल्लीभर (आणि गल्लाभर सुद्धा) पसरली आहे. ई-बुके सर्वाना माहिती पुरवणार.. डिजिटल हे जागतिकीकरण अर्थशास्त्रातच आहे असे नाही तर “शब्द आणि त्यांचे अर्थ” या शास्त्रातही घोंगावत आहे.
हे डिजिटल वारे या आधीच छपाईक्षेत्रात घुसले आहे. संगणकावर मजकूर येतो. त्याच्या प्रती निघतात. कागद मात्र शाबूत. बांधणी चालूच. घडी, सुरळी अगदी सुरक्षित. पण गुटेनबर्गच्या प्रेसची दाबादाबी, छापाछापी कुठे राहिली? चाके फिरतात पण प्रेस नावाचा दाबाचा पट्टा कुठे आहे? मग `प्रेस` ला प्रेस असं का म्हणायचं? तुम्हाला ठाऊक आहे? पहिली ई-बुके गुटेनबर्गचे नाव सांगतच १९७१ मध्ये आली. मायकेल हार्ट नावाच्या इसमाने गुटेनबर्ग प्रोजेक्ट तयार केला आणि ई-बुकांची उलाढाल सुरु केली. आपली छपाई उडवली. अक्षरांच्या आकृत्या उमटवल्या म्हणून गुटेनबर्गचा आत्मा कासाविस झाला असेल का? मुळीच नाही. त्याच्या आत्म्याला मुक्तीच मिळाली असणार. गुटेनबर्गने कात टाकली. कात टाकली की फणा काढून पुढे धावता येते. छपाई आली तेव्हा हस्तलिखितांचा, पोथ्यांचा काळ संपला. माहितीचे क्षेत्र खुले झाले. छपाई मधून काहीही छपून राहत नाही. हे ध्यानी आल्यावर मक्तेदारानी काय कमी आरडाओरड केली असेल?
परवा 'हरिश्चंद्राची फैक्टरी ' हा चित्रपट पाहत होतो. चित्रपटाची फिल्म तयार करायची. प्रोजेक्टरमधून पुढील पडद्यावर हालचाल करणारी चित्रे दाखवायची याचा ध्यास घेतलेल्या दादासाहेब फाळके याना समाजाने मनोरुग्णालयात नेले. हरिश्चंद्र आणि तारामती यांचे आख्यान नाटकामधून लागत नाही का? मग सरकती चित्रे कशाला हवीत? अशी आरडाओरड दादासाहेब फाळके यांच्या "अयोध्येचा राजा"विरुद्ध रंगभूमीवरील हरिश्चंद्र तारामतीनी सुद्धा केली असणार. आजचे रंगभूमीवरचे नट आणि नट्या नाटकाचा पडदा वर जाण्याआधीच चित्रपटाच्या पडद्यावर पोचलेल्या असतात. अखिल भारतीय, जागतिक अशा पुरस्कारांची धन्यता चित्रपटाना मिळणे हा रंगभूमीचा विस्तार म्हणायचा की विसर समजायचा? थांबला तो संपला---धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे!
आता इलेक्ट्रोनिक नावाचे टॉनिक माध्यमाना मिळाले आहे. संगणकावर ई-मेल आली. ही इलेक्ट्रोनिक डाक क्षणभरात जगभरात धावते. “संक्षेपातचि आणतो कथा सारी”! ऑरकुट काय, फेसबुक काय - माणसे दूर दूर समुद्राच्या पैलतीरी राहूनही गप्पा मारायला लागलीत. कंपन्यांच्या मोठ मोठ्या बैठका, वाटाघाटी, व्यवहार मोठ्या पडद्यावर येऊन एकमेकांकडे बघत होताहेत. आपापल्या घरट्यात जो तो आपल्या ह्याच्यात. पण दिसतात मात्र सारे एकमेका पुढे कोचात. Future Shocks नावाच्या पुस्तकात भाकित केल्या प्रमाणे माणसे आज मोठ्या प्रमाणावर घरी बसूनच ऑफिसची कामे करताहेत. अर्थात रस्त्यावरची वाहनांची गर्दी हटली नाही. मॉलकड़े माल खरेदीसाठी गाड्या धावतच राहणार. ते असो! पण डिजिटल, संगणक, इंटरनेट वगैरे संचारानी माणसाचे काय काय करुन ठेवले आहे, हे नुसते पाहिले तरी जीव गडबडून आणि गलबलूनही जायला होतय! ग्लोबलायजेशनला कुणीतरी (मला वाटते मीच!) गलबलाय्जेशन असे म्हटले आहेच मुळी!
डिजिटल नावाच्या "भानामतीने" पुस्तक लिहिणे, वाचकांना ते डाउन लोड करुन देणे, लेखकानी ई-बुके लिहिणे, प्रकाशित करणे याबाबत जी काही अजब उलाढाल आणली आहे तिचा मती भानावर ठेऊन पुस्तक जगातल्या माणसानी विचार करायला हवा, म्हणुनच मी डिजिटल विद्येला "भानामती"असे म्हटले आहे. ई-बुके आल्यावर वा येत असताना एकूणच साहित्य या प्रकाराचे वजन, उंची, वाचनाचा मूळ हेतू, साहित्याचे भवितव्य, साहित्य प्रकारांची पडझड वा नवे धुमारे यांच्या बाबत आजतरी साहित्यिक मंडळी काही म्हणजे काही बोलत नाहीत. साहित्यात नवरस आहेत. त्यांच्या मध्ये इंटरनेट वरुन एखादा व्हायरस शिरेल काय याची कुणालाही चिंता का बरे नाही? एकाही मराठी साहित्य संमेलनात ई-बुका बद्दल चर्चा नाही. परिसंवाद सोडाच. मराठी मधील विज्ञान साहित्यालाही मराठी बुजुर्गांच्या हिशेबी फारशी जागा नाही. सायन्सकथांना कोणी विचारत नाही म्हणून हताश होउन नारायण धारपांनी भय कथा लिहायला घेतली. धारप यानीच हे लिहून ठेवलेआहे. डॉ.बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, डॉ.जयंत नारळीकर अशा विज्ञान साहित्यिकानीच आता मराठीत येत असलेल्या डिजिटल साहित्य प्रकाराबाबत सांगायला हवे.
मराठीत इ-बुके आलीत म्हणतात. दवबिंदू नावाची मराठी वेबसाईट आहे. नेट भेट नावाच्या ई मासिक वेब साईट वर एकट्या अनिकेत समुद्र यानी सात इ बुके लिहिलीत. मराठी ब्लॉग कट्टा वावरत आहे. पण ई बुके वाचण्यासाठी खास उपकरणे उदा. Apple ची Ipads वगैरे काचेवर बोटे फिरवायची सामग्री लागते. ती ई-मराठी बुकांसाठी येणार का? अमेरिकेत ही सामग्री दिसते. खाजगी वापरातसुद्धा दिसते. मराठीचिये नगरी काय घडणार?
ते काही असो. टाळी द्या मित्रानो! रान मुक्त आहे .पु.ल.देशपांडे यांनी “जो जे वांछील तो ते लिहो'' असे म्हणून पिकात गुरे सोडली आहेत. “मला पेपरवाले सदरे देत नाहीत, प्रकाशक नाही म्हणतात. काय करावे? कोठे लिहावे?” अशा वेळी ई-बुक तसेच ब्लॉग कामास येतो. जगी ज्यास कोणी नाही, त्यास ब्लॉग आहे. तिथे जा आणि आपल्या उत्कट भावना विचारांचा निचरा करा. लिहिणे स्वान्त: सुखाय असते ना? मग जा ब्लॉग मध्ये. रिकामा सुतार काहीतरी ताशी --तशी तुमची माझी ही खर्डेघाशी! हलके हलके वाट्ल्याशी कारण!
आणि तसच काही नाही बर का? गुगलवर टिचकी मारा. ब्लॉग लेखांचे ढीग हाती लागतील. वाचणार कोण? लिहिणारा जो कोणी त्याने लिहीत जावे. ब्लॉगवर उमटत यावे. ब्लॉग म्हणजे रामघळी आहे. रामदासानी आपला दासबोध रामगुहेतच लिहिला. पण कधीतरी आलाच की नाही बाहेर?
पानवाला.
No comments:
Post a Comment