Wednesday, November 3, 2010

आपली दु:खे तर किडुक-मिडुक

"सुख पाहता जवापाडे - दु:ख पर्वता एवढे" असे तुकोबा म्हणाले. त्यांचे ठीक आहे. तुका आकाशा एवढा होता. त्याला दु:खाच्या पर्वताकडे आभाळ भरून बघता येत होते. पण आपले काय? आपली दु:खे पर्वता एवढी आहेत काय? राईचा पर्वत करण्याची तर आपली आदत! केशवसुत सांगतच होते. "विश्वाचा विस्तार केवढा? ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा". पावसाळ्यात ओढा भरला तरी आम्हाला वाटणार की जगबुडी आली. चार दिवस खिसा रिता राहिला तर अठराविश्वे दारिद्र्याच्या यातना सोसल्यासारखा आपला चेहरा होणार. कुणीतरी `नाही` असे म्हणाली की आपल्या जीवाचे स्मशान होणार. कुणी टाकून बोलले की अंगाचा तिळपापड होतो. प्रमोशन नाही मिळाले, मंदी आली म्हणून सेवामुक्ती चेहरा दाखवू लागली तर दाही दिशा अंधारून जातात. बाजारात भाजीची पेंडी इतरांच्या मानाने पन्नास पैशानी महाग पडली तर "धिक् धर्माला, धिक् रूढीला, धिक् तेहतीस कोटी देवाना"! "साध्याही विषयात विषाद किती हा मोठा मनी दाटला ". आजोबा म्हणायचे, "लेको,तुमचे कसे आहे सांगू का? मुंगीला मुताचा प्रलय. एवढासा ओघळ आला तरी मुंगी वाहून जाणार".

पण मागे पानशेतचे धरण फुटले. पुण्यात राक्षसा प्रमाणे पाणी घुसले. संसार वाहून गेले. माणसे बुडाली. पु.भा.भावे यानी या जलप्रलयाचे अंगावर काटा उभा करणारे वर्णन लिहिलय.या घटनेनंतर काही दिवसानी माझ्या वडीलाना एक आठ-दहा वर्षांचा निराधार मुलगा पाय ओढत नरसोबावाडीच्या दिशेने जाताना दिसला. खांदे पडलेले. चेहरा भकास, भेदरलेला. वडिल जवळ गेले. पाठीवर हात ठेवला. मुलाला नीट सांगताही येईना. कसेतरी एवढच म्हणाला,"पाण्यातून माझे कुणीच वाचले नाही. मी कुठे जाऊ?. एक म्हणाला - नरसोबाच्या वाडीला जा. तिथे जेवायला मिळेल. झोपायला ओवरी मिळेल. मी मग चालत निघालो." वडीलाना हुंदका फुटला. पर्वता एवढे दु:ख म्हणतात ते हे. दाही दिशा मज भिंगुळवाणे. अंधारालाही घरे पाडणारे हे दु:ख माणसाच्या नियतीला स्पर्श करणारे होते.

आम्हाला खरे तर दु:खाचा चेहराच ठाऊक नसतो. सुख हे साऱ्या जगण्याचे अंतिम मागणे असते. अजरत्व हवे. अमरत्व हवे. प्रकाशाचा मुलुख भेटावा. भूमीचा मखमली गालिचा बनावा. पण सुखाची मागणी दु:खाची सोबतसुद्धा घेऊन येते. सुखाचा अंत आपणाला जाणवतो पण दु:खे कधीच संपणारी नसतात. दु:ख हा नियतीचा शाप वाटावा असे दु:ख, एक अंधार, माणसाच्या जगण्यात आरपार भरलेला आहे. हा जीवनाला आरपार वेढा देणारा दु:खाचा किट्ट अंधार जी. .कुलकर्णी याना दिसला असावा. त्यातूनच मृत्यूचे सत्य अंधाराच्या शाईने आपल्या कथामधून त्यानी लिहिले असावे. सुखाला शेवट असेल तरच दु:खाला शेवट असू शकतो. सुखान्त नको असेल तर दु:खान्तही मिळणार नाही. दु:खाचे असे हे रुतलेपन मनाला घेरून टाकते तेव्हा मग एका उर्दू कवीला चिरंतन सुखाचाही वीट येतो.

`तेरे आजाद बन्दोंकी ये दुनिया वो दुनिया,
यहाँ मरने की पाबंदी, वहा जीनेकी पाबंदी `

इथले जीवन तर कैदच पण ते पलीकडील चिर सौख्याचे जीवनही कैदखानाच. आपली गोड गोड गाणी असह्य दर्द कहाणी सांगत असतात. `सर्वं दु:खं !` हे सांगत जाणारा गौतम बुद्ध दु:खाचा साक्षात्कार झालेलाच असणार. होय! दु:खाचाही साक्षात्कार असू शकतो. नाही तर मुक्तीचे मार्ग सांगत वरदायी देवमाणसे कशाला सर्वत्र फिरली असती?

आता हे दु:खपुराण का म्हणून लावायचे? कारणे दोन आहेत. एक कारण असे-- आपल्या किडुक मिडुक दु:खांचे लाड आपण करू नयेत. त्यांची मिजास कुणाला सांगू नये. दु:ख ही क्षुद्र चीज नाही. ती एक आकाशभेदी आकांत वेदना आहे. हे जाणून माणसाने क्षुल्लक बाबीना क्षुल्लक म्हणून ताब्यात ठेवावे. "साठलेले सांड पाणी, त्यात तुमची रास न्हाणी". सांड पाण्यातील रास न्हाणी आपल्या जगण्यात नकोत. आपण हे विसरत चाललोय. आपले रडत बसणे, विव्हळणेसुद्धा खानदान हरवत जात आहे. `टाहो`चे वजन नीट ध्यानात असेल तर जुगार हरतो तो टाहो फोडायला धजावत नाही. आपण जीवनात क्षुद्रता गोंजारत बसतो. दु:खालाही कमीपणा आणणारे रुदन कुंथन चालू ठेवतो. ते आपण तात्काळ आवरले पाहिजे.
 कारण नंबर दोन--दु:खाला त्याच्या दिल कुरतडू रूपात नीट पाहता यावे. अगदी जाणीवपूर्वक आपण दु:खाच्या डोळ्याला डोळा भिडवावा. असा निर्धारच हवा. हताश होण्या साठी नव्हे. आपल्या चित्तशुद्धिसाठी आणि माणसाची बहुतेक दु:खे माणसानीच निर्माण केलेली आहेत, हे स्वतःला खडसावून सांगण्या साठी. जगातील सर्वात सुंदर वस्तू म्हणजे माणसाचे मन आणि सर्वात कुरूप, भयानक वस्तू म्हणजे सुद्धा माणसाचे मनच. `नरेचि केला हीन किती नर` हे उदगार फ्रेंच राज्य क्रांतीच्या भेसूर स्वरुपाकडे पाहुनच निघाले.

चि. वि. जोशीनी विनोद म्हणून महार वाड्यातील एका तरुण स्त्रीचे महाभारतावरील कीर्तन सांगितले. राजसूय यज्ञ्न याग चालू आहे. आणि "धुरपती माता अक्षी धा रुपाय्चं जरीचं पाताळ नेसून समद्या बाम्नास्नी तेल्ची आन पापड्या वाढत हुती. तिनं कोपरा पत्तूर चांदीच्या बांगड्या घातल्या हुत्या" आता हे वाचून हसू येता आसू यायला हवेत. चांदीच्या बांगड्या ही द्रौपदीची श्रीमंती ज्या मनाला अप्रूप वाटते तिने गरीबी कशी भोगली असेल? गिरीश प्रभुणे यांचे "पालावरचे जिणे" पुस्तक वाचा. नवरा सुद्धा झाड़ा बुडी बलात्कार करतो, मग झोडपून बेशुद्ध पाडतो, पोलिस चौकीत पण वस्त्रे फेडली जातात. हे दु:ख पारधी बाई सांगते. आन्नाभाऊ साठे स्मशानात पुरलेल्या प्रेताच्या तोंडामधील सोन्याचा दात उपटून नेणारा माणूस कथेत दाखवतात. अन्नाला महाग झालेला हा माणूस. पण कंदील घेउन गावकरी येताहेत म्हटल्यावर तो माणूस झटक्यात हात बाहेर घेऊ लागतो तर प्रेताचा जबडा हातावर गच्च बसतो. अशीच एक गोपाल भोरपी समाजाची चित्तरकथा. गावकरी काठ्या घेऊन येताहेत म्हटल्यावर धावपळ उडते. मरून पडलेल्या म्हातारबाबाला कसातरी मातीत अर्धा मुर्धा पुरून रानोमाळ धावत सुटलेल्या गोपाल भोरपी समाजाच्या जनाबाई गिर्हे बाईंची मरण कहाणी वाचा. दु:ख आपले ऊर फोडू लागेल. .मो. मराठे यांचे बालकांड हे आत्मकथन वाचा. झोळंबे नावाच्या कोकण भागातील गावच्या गच्च पण भकास एकाकी रानात विना अन्न, विना आसरा लहान मुलगा एकटाच कित्येक दिवस पाडाचे आंबे खाऊन, सापांच्या सरपट कोंडाळ्यात राहतो. दिवस रात्र एकटा. या गरीबीला जातपात असते का? गांधीहत्येनंतर मुला लेकरासह काही ब्राम्हण कुटुंबे घर पेटवून जाळून टाकली. हे दु:ख मानव जातीचे नाही का?

आज जगातली गुलामगिरी संपली आहे का? नायगारा धबधबा बघायला जातात, त्यानी नायगारा, बफेलो भागातील भूमिगत रेलमार्गाची--Underground Railroad कार्याची कहाणी समजून घ्यावी. हजारो कृष्ण वर्णी गुलाम नायगरा प्रपाता जवळून जीव मुठीत धरून Canada या देशात पळत होते. Harriet Tubman या कृष्ण वर्णीय मातेचे आक्रंदन ऐकावे. जगभर आजही गुलामी पिसाट पणे धावते आहे. खेड्या पाड्यामधून गरीबांची मुले मुली चांगल्या काम धंद्याची लालूच दाखवून नेली जातात. त्याबद्दल पैसेही उचलतात. मुली जगभरच्या कुंटणखान्यात जातात. लहान लहान मुले वेठबिगार म्हणून राबविली जाताहेत. अरबी मुलुखात ऊंट शर्यती होतात. लहान मुलाना उंटावर म्हणजे मानेवर लोम्बत ठेवतात. त्यांच्या आक्रोशाचा परिणाम म्हणून ऊंट जोरात धावतात. अमेरिका या समृद्ध, उदार देशात सुद्धा जगभरातील मुली दोन चार नाणी पदरात पडावीत म्हणून दिवसा कारखाने -हॉटेल येथे राबवल्या जातात. रात्री देह विक्री केलीच पाहिजे. पासपोर्ट नाही. पैसा नाही. पिस्तुले रोखलेली. सुदान हा आफ्रिकन देश म्हणजे यातना घर. उत्तरेकडे अरब मुसलमानांचे थैमान. दक्षिणेकडे ख्रिश्चन आफ्रिकन. १९५६ मध्ये सुदानला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले. आणि त्यांच्या जीवनात नरक पसरला. उत्तरेकडील अरब राज्यवाले वन्य जमातीना फूस देतात. साउथ सुदान मधील ख्रिश्चन जनतेला पकडून गुलाम बनवतात. बायका मुले जगभर विक्रीसाठी पाठवतात. त्यांच्या तेल विहिरी उडवून देतात. हे आजच्या क्षणाचे वर्तमान आहे. हे दु:ख किती जणांच्या मेंदूला घरे पाडत आहे? मग आपली किडुक मिडुक दु:खे कोणत्या निरांजनानी गोंजारायची?

- पानवाला

  

No comments:

Post a Comment