Thursday, October 28, 2010

इडा पिडा टळो

काहीही करा. भय इथले संपत नाही. माणूस भया भया जगतो. आयुष्याचा प्रत्येक क्षण जणू रक्षण मागतो. सॉमरसेट मॉम म्हणतो ``माणसाचे आयुष्य तर वीतभर आहे. निसर्ग तर ठार विरोधात. मग माणूस म्हणजे एक हास्यास्पद बाहुले". भय, चिंता, हताशपण, धास्ती या सर्वांचे प्रतीक म्हणजे माणसाला दिसणारा अंधार. माणूस म्हणतो "माझ्या डोळ्या समोर तर सारा अंधारच आहे." आशा म्हणजे प्रकाशाची तिरीप. हताशा म्हणजे तिमिर. निबिड अंधार. पहाटे भूपाळी फुटते. काळोख दाटला की पिशाच्चे वावरू लागतात. आगी लावायला अंधार आधार पुरवतो. तम सरू दे . उजेड पसरु दे. कारण इथे `अल्प द्युति ,तम बहु` असा प्रकार आहे. अशी ही अंधाराची अरिष्टाशी आणि प्रकाशाची उल्हासाशी कायम गाठ बसली आहे. हे अगदी जगभरचे चित्र आहे. वेदातच उषा सूक्ते आहेत असे नाही. जगभरचे धर्मग्रंथ आणि माणसांची नाचगाणी उजेडाचा उदोउदो करतात. देवालयात समया तेवतात. चर्च मध्ये मेणबत्त्या उजेड करतात. मशिदीत काय अल्ला अंधारात बुडतो? मशाली पेटल्या की पोवाडे डफ वाजवू लागतात. देव हा शब्दही दिवा घेऊन येतो. दिव म्हणजे प्रकाश देणे. दिवा दाखवतो त्यालाच देव म्हणायचे. असा देव नावाचा दिवाच बाल मुखातून बोलायला लागला, उंच पिकातून डोलायला लागला की अंतरी रामेश्वर आणि काशीक्षेत्र प्रकट होते. जगायला आधार देत राहते. येशू म्हणतो ``भिवू नको.मी तुझ्या पाठीशी आहे". ``मी तुला पापमुक्त करीन.शोक करू नकोस.``असे म्हणत श्रीकृष्ण अर्जुनाला अंधारप्रवृत्तीवर नेमका बाण धरायला सांगतात.
 
मला चित्तात धर आणि युद्ध कर हे जगभरच्या मानवाना देवाचे सांगणे आहे अरिष्टाशी झुंज करण्यासाठी, अंधाराला दूर करण्यासाठी सर्वत्र माणसे देवाला शरण जातात. म्हणजे ती काही देवाचे गुलाम ठरत नाहीत. देवाचे बोट धरून जावे म्हणतात. "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती --चालविशी हाती धरुनीया". माणसाला आयुष्यभर आई लागते. बाप पाठीशी उभा लागतो. देव ही माणसाची गरज आहे. म्हणूनच प्रा. शिवाजीराव भोसले सांगायचे "जगात देव नसेलही पण तो माणसाला हवा असतो". केशवसुत अर्ध सत्य सांगून गेले. `देव दानवा नरे निर्मिले` हे पुरते खरे नाही. देवाला माणसाने शोधले . कारण दानव त्याच्या हरघडी मानगुटीवर बसतात. देव हा साक्षात्कार आहे. दानव हा नेहमीचा अनुभव आहे. देव मनात उभा करायचा आणि अंधाराशी लढायचे ही जगभरच्या मानवाची जगण्याची रीत आहे.
 
तुमचा वेदांत राहू दे बाजूला. आमचा आकांत कसा शांत करायचा ते सांगा. पीक हवे-भीक नको. दवा द्या -दुवा घ्या. रोग राई नको. धरणी दुभंगायला नको. ढगफूटीमधून मुलांसकट वाहून जायला नको. वीज मस्तकी पडूदे नको. वारे घोंगावत येणे नको. पाण्याकरिता ल्हा ल्हा व्हायला नको. अंधारातली कट कारस्थाने बरबादी पेरू नयेत म्हणजे झाले. "पोरे खातील प्वाटभर मलिदा" असे भरला डोळा जगणे भेटावे म्हणून माणसे जगभर उत्सव करतात .जत्रा भरवतात. विठू रायाच्या भेटीसाठी वारीला जातात. अगदी दगडधोंडे पण पूजतात. शेतात पीक उभे राहिले की नाच गाणी करतात. वाजत गाजत धान्य घरी आणतात. बहुतेक उत्सव पावसा पाण्याची गाणी म्हणत, सुगीचे स्वागत करत येतात. लोकजीवन असा इहलोकीचा देव भजत राहते. दुष्ट जीवांच्या संहाराची नाटके हेच देशो देशीच्या लोक रंगभूमीचे स्वरूप असते. ही लोकोत्सवी रंग भूमी आपण आवर्जून पहायला हवी. ती माणसांची अंगे रंगवते. मुखवटे देते. पिशाच्च होवून मानवाना पिशाच्चांच्या अंगावर जायला सांगते. कोंकण प्रदेशातल्या दशावतार नाटकात प्रथम प्रवेश करतो तो संकासुर. लांब रक्त दाखवणारी जीभ बाहेर काढणारा, ब्रम्हदेवाचे वेद चोरून नेणारा.विष्णु संकासुराचा वध करतो. आणि मगच त्याला जगाचा सांभाळ करणे शक्य होते.
 
ता ३१ ऑक्टोबरला अमेरिकेत सगळीकडे हलोवीन (Halloween) उत्सव नारिंगी रंगाचे भोपळे पोखरुन विक्राळ चेहरा दाखवत येतोय. हाडांचे खोटे खोटे सापळे, भेसूर कवट्या, कभिन्न रंगाचे रोखून बघणारे मांजर, रक्त पिणारी वाघळे, प्रचंड जाळे विणून बसलेले कोळी घराबाहेर उभे आहेत. भूतघरे उभी रहात आहेत. तुम्ही घरात गेलात की कोणीतरी तुमचा खालून पाय ओढणार. तुम्ही घाबरणार. मुखवटे घालून मुलाना घेवून माणसे घरोघर जातात. दारात उभे राहून विचारतात. Trick or treat? काही देणार खायला की भीती दाखवणार? माणसे मुलांना चोक्लेट्स देतात. पैसेही देतात. लोकजीवनात खोडसाळ आणि रासवटवृत्तीपण असते. काही ठिकाणी घरातून एक भुताचा मुखवटा भसकन बाहेर येतो. मुले धावू लागतात अथवा कापू लागतात. याला म्हणायचे ट्रिक. हलोविन हा निधर्मी लोकोत्सव आहे. चर्चमध्ये कोणी जात नाहीत. चर्चमध्ये असतो यावेळी "सकल संतांचा दिवस" All Saints Day. हलोविन उत्सव स्वतः पिशाच्च होवून भूते गाडायला जाणार. प्रकाशाचे दिवस सरत आलेत. आता अंधाराचे दिवस येणार. दिवस लहान. रात्र मोठी होणार. अंधारात भुताखेतांचा त्रास फार. म्हणून हलोविन हेलो हेलो करीत घरोघर धावते. अमेरिकेतील मराठी माणसेही अष्टा गावच्या भावया बघायला जावे तसे मुखवटे बघायला जातात. आपल्या दारातही भूतजग निर्माण करतात.
 
जगभर माणूस नावाचे मन एकाच ऊर्मीचे असते. सांगली जिल्ह्यातले अष्टा हे गाव "भावई" नावाने राक्षस वधांचे नाट्य सडकेवर उभे करते. गावात जगदंबेचा संचार असतो. सांगलीला पूर्वी तडकडताई कशी भयानक मुखवटा घालून ,हातात सूप घेऊन रस्ताभर धावायची. "तडकडताई भुताची आई -नाकात कवडी बाजार दौडी" म्हणत माणसे नाचत राहायची. तडकडताई हातातल्या सुपाने ज्याला त्याला झोडपत राहायची. जणू गावातली अरिष्ते हाकलत न्यायची. गावाबाहेर महारवाड्यातल्या मोठ्या झाडाखाली तडकडताईचे लग्न व्हायचे. नवराही लोकांच्या पायात बोरीचे काटे मोडत यायचा. तडकडताईला आणखी कुठल्या गावाने पसार करू नये म्हणून जोगन्या नावाचे दाढीवाले चांदीची वाटी हातात घ्यायचे. दोन तलवार धारी वाटी रक्षण करायचे. आता हे सारे काय म्हणायचे?
 
दक्षिण कोकणात तर बघायलाच नको.सर्वत्र वेताळाचा संचार. देसरूढ़ नावाची एक लोकजीवनातील रूढी येथे मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी भागात आहे. शिमग्यानंतर एक दिवस गावच्या प्रमुख महाराने सूर्योदयाबरोबर ढोलाचा ताल धरायचा. गावातली जाणकार मंडळी घरोघर जावून अन्न एकत्र करणार. दिवस बुडला की नदीपार जावून खड्डा काढणार आणि त्यात अन्न पुरणार. म्हणजे गावातली सगळी भुते गाडली गेली. गाव आता निर्भय! पण हे सारे यथासांग होईतो महाराने ढोल थांबवायचा नाही. ढोल थांबला की भुते मोकाट सुटणार. एक म्हातारा महार ढोल वाजवता वाजवता काळजात कळ येऊन खाली पडला. त्याचा ढोल मुलाने सावरला. काळजाचा ठोका थांबला, पण ढोलाचा ठोका चालू राहिला. "इडा पिडा टलो. लेकरा वासराना उदंड आयुष्य मिळो" हा लोकांचा टाहो ऐकतच `दुरिताचे तिमिर जावो `ही वाणी आळंदीच्या ओवीला फुटली असावी.
 
पानवाला.

No comments:

Post a Comment