Friday, October 15, 2010

`पुसी` नावाच्या मांजराची गोष्ट

अमेरिकेतल्या मोक्याच्या ठिकाणी का होईना पण आता मराठी माणसाची बरीच गजबज आली आहे.सायबर जगातला हा त्याचा संचार केवळ पोट भरण्यापुरता सीमित राहिलेला नाही. संशोधनाच्या दिशेनेही तो धावतो आहे. मुले डे केयरमध्ये जातील पण संगणक मात्र मांडीवर लाडावून बसलेला आहे. बॅंक व्यवहार, बिले भरणे हा उद्योग इन्टरनेट वरूनच होतो. विमानाची तिकिटे, लॉजेसची आगावू नोंदणी मांडलिक लडिवाळ करतो. घरी बसूनच ऑफिसची कामे होतात. आतातर मराठी माणसाला व्हर्चुअल वर्ल्ड म्हणजे खुणा करणारे एक नवे अजब जगच भेटले आहे. ते शक्यता सांगते. त्रिमितियुक्त जगात काय काय उतरवता येईल ते कानात बोलते . या नव्या संगणक तंत्राने काय काय करायचे आता बाकी ठेवले आहे ते सांगा. मागे कवी गडकरी मराठी कवितेवर खुश होवून म्हणाले होते की मराठी कवितेने जे आहे ते वर्णन केले आहे. जे नाही तेपण वर्णन केले आहे. अगदी नाही नाही ते ते केले आहे. आता नाही नाही ते करायला निघालेल्या या व्हर्चुअल दुनियेमध्ये हाती ब्रश घेवून, रंगात बुडवून चित्र रेखाटन नको. संगणकच खुद्द रंग रेखानी अपर सृष्टी डोळयापुढे उभी करतो. स्वररचना पुरवतो. तुम्ही बोलायचे की झाले! पुढचा संगणक आपसुक तुमचे वक्तव्य लिपिबद्ध करुन ठेवणार. त्या ओल्ड गणपती ऐवजी व्यासाना हा नवा संगणक पति समोर लाभला असता तर व्यासानी तोंड खोलायाच्या आधीच त्या संगणक रायाने व्यासांच्या मनातले महाभारत ओळखून ते मांडीसंगणकावर उतरवले असते. क्षणात जगभर महाभारताच्या प्रती फॉरवर्ड झाल्या असत्या. अल्विन टोफ्लर यानी पुस्तकात लिहिलेले भविष्यकालातले धक्के आत्ताच बसू लागलेत. सांगायचा हेतू असा की अमेरिकेतील मराठी माणसापुढे आता प्रश्न केवळ पोटाचा नाही. उपजीविका सापडली की माणसाला जीविकाही सापडावी लागते. जीविका म्हणजे जगण्याचा हेतू. तो घ्यानी घेणे. आपल्या सर्जन शक्तीला नवे आविष्कार पुरवणे. आपला चेहरा आपल्याला पुरती ओळख देणारा दिसणे. या जीविकेच्या संदर्भात ज्येष्ठ समीक्षक रा. . जाधव यानी अमेरिकेतील मराठी बन्धूना २००४ मध्ये विज्ञापना लिहून ठेवली होती. त्यांचे म्हणणे असे की अमेरिकेच्या वंडरभूमीत येऊन विमानांची आकाश रेखाटने, चाकांचे गरगर फिरणे, नायगरा धडा धडा कोसळत राहणे, लास वेगासच्या जुगार ठाण्यात मशगुल होत राहणे, पिज्झा आणि बर्गर खाण्याच्या जागा सांगणे, एवढेच करू नये. मराठी माणसाने या देशातली आपल्या पुढची आव्हाने हेरली पाहिजेत. भविष्य साकार करणे याचा अमेरिकेचा नागरिक म्हणून विचारही करायला हवा. पुसी मांजराची एक कविता आहे. ही पुसी मांजरी गेली इंग्लंडमध्ये राणी पहायला. परत आल्यावर तिला विचारले `राणी पाहिलीस का? कशी दिसली राणी?तिचा दरबार? ` मांजरी यावर काही बोलेच ना. राणीच्या आसनाखाली उंदीर होता. मी त्याला धरायला कशी धावले तेच मांजरी सांगत राहिली. आपली पुसी मांजरी नको व्हायला.

 मराठी माणसाला आपल्या मराठी भाषेची , कला परंपरेची , चाली रीती यांची अगदी मनापासून ओढ़ आहे. ती ओढ़ केवळ एक नोस्टाल्जिया म्हणजे भूतप्रेम राहू नये. गोठत चाललेल्या वाटा साफ करणे एवढ्या साठी म्हणून मराठी माणसानी अमेरिकेत आपल्या उत्सव सण यांचे साजरीकरण ठेवू नये. `खेळ मांडियेला' नावाचा मराठी काव्य- नाट्य-नृत्य-लोक संस्कृति यांचे सादरीकरण करणारा एक सुंदर कार्यक्रम १९९९ मध्ये सॅन होजे येथे मराठी अधिवेशनात झाला होता. तो मराठी जगण्याचा गाभा शोधणारा होता. आणखी पुढे जायला हवे. अमेरिकेतील मराठी मनाला मराठी भाषा, साहित्य, कला, इतिहास यासारख्या क्षेत्रातील गुणवत्ता यांची माहिती असायला हवी. माझा मराठाची बोलू कवतुके अमृतातेही पैजा कोणत्या गुणांच्या जोरावर जिंके हे सांगणारी संतांची दृष्टी येथील मराठी मनाला यायला हवी.

त्याचबरोबर अमेरिकेतील भाषा, साहित्य, उत्सव, अमेरिकेची अस्मिता या विषयातील गुण कौशल्याचा मराठी मनाने जरुर शोध घ्यायला हवा.मराठी माणसाने या विशाल, उदारमनस्क देशात `आपण एक बेट`-इन्शुलर म्हणून राहता कामा नये. उपरेपण नको. अमेरिकेतील रंगभूमी, तिचे विविध आविष्कार यांच्याशी संपर्क साधून ते समजून घ्यायला हवेत. मेक्सिकन (स्पॅनिश), फ्रेंच, जपानी, चिनी कितीतरी संस्कृत्या आपले कलाविष्कार जपत अमेरिकेत वावरतात. त्यांच्याशी संवाद नको का करायला? चिनी माणूस अमेरिकेत जितका रमलाय, तितका भारतीय माणूस नाही. परवा अमेरिकेतीलच एका भारतीय शास्त्रीय संगीत मैफिलीत एक अमेरिकन गोरा गोरा पिट्ट माणूस मंचावर गेला. त्याने तंबोरा नीट सुरात लावून दिला. मग आम्ही सॅन फ्रॅन्सिस्को येथे ऑपेरे बघायला का जाऊ नये? शेक्सपीयरची नाटके अमेरिकन विद्यापीठातून होतात.महाविद्यालयातून येथे Performing Arts Theatres असतात. तिथे मराठी माणसाने का बरे वर्दळ ठेवू नये? अमेरिकन आदिवासींची नृत्ये आहेत. सामूहिक गाणी आहेत . लोककथा आहेत. त्यामधून आपलेही आदिवासी आपणाला समजतील की नाही? मराठी दलित साहित्य, स्त्री-वादी साहित्य अमेरिकेतील आफ्रिकन-अमेरिकन लेखकांना सांगावे. स्त्री-वादी चळवळीला भेटवावे. असे केले तर तौलनिक दृष्टिकोण आपणालाच प्राप्त होईल. अमेरिकेतील माणसाचे मन आपल्या जवळ येईल.

मुख्य म्हणजे भाषिक आणि सांस्कृतिक देवाण घेवाण झाली की मराठी माणसालाच एक आत्मविश्वास भरून येईल. आपली नेमकी ओळखच आपणाला कित्येकदा नसते. आपण मराठी माणूस आहोत म्हणजे काय? भारतीय चेहरा कसा जाणायचा? मराठीच काय, पण भारतीय माणसालाही आपला नेमका चेहरा आज ठाऊक नाही. म्हणूनच परकीय संस्क्रुतीबरोबर आपण समानतेचे एक विधायक नाते जोडू शकत नाही. मराठी माणसाने अमेरिकेत फक्त राहू नये. अमेरिकेत खोल उतरावे.

- पानवाला

No comments:

Post a Comment